नीट पेपरफुटी, परीक्षा गैरव्यवहार आणि दिल्लीतील लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ हजारोंचा तिरंगा मोर्चा
पुण्यात शुक्रवारी नीट-यूजी परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत हा मोर्चा लाल महाल येथून सुरू होऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. जोरदार पाऊस सुरू असतानाही मोठ्या संख्येने विद्यार्थी या आंदोलनात सहभागी झाले होते.
पुणे, ता. २४ : नीट परीक्षेतील कथित पेपरफुटी, वारंवार होणारे परीक्षा गैरव्यवहार आणि दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील पोलिस लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ पुण्यात शुक्रवारी हजारो विद्यार्थी, तरुण-तरुणी रस्त्यावर उतरले. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत लाल महाल ते जिल्हाधिकारी कार्यालय अशी भव्य तिरंगा पदयात्रा काढण्यात आली. मुसळधार पावसाची तमा न बाळगता विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी करत सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त केला.
मोर्चामध्ये विद्यार्थ्यांच्या हातात तिरंगा आणि भारतीय संविधानाच्या प्रती दिसत होत्या. ‘भारत माता की जय’, ‘इन्कलाब जिंदाबाद’, ‘पेपर लीक की ये सरकार, नहीं चलेगी’, ‘नरेंद्र-धर्मेंद्र राजीनामा द्या’, ‘तानाशाही नाही चालणार’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. मोर्चाच्या शेवटी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी विद्यार्थ्यांचे निवेदन स्वीकारले. संपूर्ण मार्गावर पुणे पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
‘मिम्स’ आणि व्यंगचित्रांतून सरकारवर निशाणा
मोर्चाचे एक वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांच्या हातातील सर्जनशील फलक. मराठी-हिंदी चित्रपट, मालिका, लोकप्रिय मिम्स आणि व्यंगचित्रांचा वापर करून नीट परीक्षा, पेपरफुटी आणि शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींवर भाष्य करण्यात आले. हे फलक पाहण्यासाठीही अनेक पुणेकरांनी गर्दी केली.
विद्यार्थ्यांच्या भावना
विद्यार्थी सुबोध घोडके म्हणाले, “माझ्या बहिणीला पहिल्या नीट परीक्षेत चांगले गुण मिळाले होते. परीक्षा रद्द झाल्यानंतर तिच्यावर मानसिक परिणाम झाला. पुन्हा झालेल्या परीक्षेत अपेक्षित यश मिळाले नाही. या नुकसानाची जबाबदारी कोण घेणार?”
हृदयरोगतज्ज्ञ डॉ. राहुल सावंत यांनी सांगितले, “नीट ही केवळ ठिणगी आहे. गेल्या १०-१२ वर्षांत १५० हून अधिक परीक्षांमध्ये पेपरफुटीच्या घटना घडल्या आहेत. याचा फटका प्रामाणिक विद्यार्थ्यांना बसला आहे. शिक्षणमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा.”
संशोधक विद्यार्थी निखिल मगर म्हणाले, “शिक्षण व्यवस्थेतील गैरप्रकारांविरोधात आम्ही यापूर्वीही आवाज उठवला आहे. सरकारने तातडीने सुधारणा केल्या नाहीत, तर तरुणाईचा संघर्ष अधिक तीव्र होईल.”
विद्यार्थी ओंकार ढोबळे यांनीही शिक्षणातील असमानतेवर टीका करत, “नेत्यांची मुले परदेशात शिकतात, पण सामान्य विद्यार्थ्यांना न्याय मिळत नाही,” असे मत व्यक्त केले.
पावसातही उसळला उत्साह
लाल महाल परिसरात दुपारपासूनच विद्यार्थ्यांची गर्दी होऊ लागली. डफलीच्या तालावर घोषणाबाजी, देशभक्तीपर गीते आणि विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे मोर्चात उत्साहाचे वातावरण होते. फडके हौद, दारुवाला पूल, १५ ऑगस्ट चौक आणि जुनी जिल्हा परिषद मार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचला. तेथे सभेचे आयोजन करण्यात आले.
‘लाठ्या खाल्ल्या; हिशेब मागणार’
आयोजकांच्या म्हणण्यानुसार, आंदोलनात सहभागी होऊ नये म्हणून काही विद्यार्थ्यांना कथित धमक्या देण्यात आल्या होत्या. मात्र पाऊस, पोलिस बंदोबस्त आणि अन्य अडचणींची पर्वा न करता मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले. ‘आम्ही लाठ्या खाल्ल्या, आता हिशेब मागणार’ हा संदेश देत विद्यार्थ्यांनी सरकारला इशारा दिला.
मोर्चाची ठळक वैशिष्ट्ये
- नीट पेपरफुटी आणि परीक्षा गैरव्यवहाराविरोधात हजारोंचा तिरंगा मोर्चा.
- केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी.
- राष्ट्रध्वज आणि संविधान हातात घेऊन विद्यार्थ्यांचा सहभाग.
- विविध मिम्स, व्यंगचित्रे आणि सर्जनशील फलकांद्वारे निषेध.
- पावसातही शिस्तबद्ध पदयात्रा; पोलिसांचा चोख बंदोबस्त.
- शिक्षण व्यवस्थेतील सुधारणा आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, अशी प्रमुख मागणी.

