धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ; नागरिकांना नदीपात्रापासून दूर राहण्याचे पाटबंधारे विभागाचे आवाहन
पुणे, दि. २३ जुलै : खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणाची पाणीपातळी वेगाने वाढत असून, गुरुवारी (२३ जुलै) सायंकाळी ५ वाजेपर्यंत धरण सुमारे ९५ टक्के क्षमतेने भरले आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून आज रात्री ८ वाजल्यापासून खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदीपात्रात ३,८२५ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येणार असल्याची माहिती खडकवासला पाटबंधारे विभागाने दिली आहे.आज दि. 23/07/2026 रोजी धरणाच्या पाणी पातळीमधील झपाट्याने होत असलेली वाढ व पाणलोट क्षेत्रामधील अतिपर्जन्यमानामुळे आज ठीक रात्री ९.३० वा. खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये ३८२५ क्युसेक वाढवून ९४०५ क्युसेक्स ने विसर्ग सुरू करण्यात येणार आहे.
पाटबंधारे विभागाने जारी केलेल्या इशाऱ्यानुसार, पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी सुरू असल्याने धरणात येणाऱ्या पाण्याचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. पावसाच्या तीव्रतेनुसार आणि धरणात होणाऱ्या आवकनुसार विसर्गात पुन्हा वाढ किंवा घट केली जाऊ शकते, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
सायंकाळी ५ वाजेपर्यंत खडकवासला धरणात १.८६ टीएमसी (९४.०८ टक्के) पाणीसाठा असून, धरणात १७९ एमसीएफटी पाण्याची आवक नोंदविण्यात आली. मुठा कालव्याला १,०५४ क्युसेक तर पुणे महापालिकेसाठी ६७७ क्युसेक पाणी सोडले जात आहे. धरणाच्या सांडव्यावरून यापूर्वी एकूण १.५१ टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.
खडकवासला धरण समूहातील चारही धरणांमध्ये एकूण २१.७० टीएमसी (७४.४४ टक्के) पाणीसाठा उपलब्ध असून, गेल्यावर्षी याच दिवशी हा साठा २३.३० टीएमसी (७९.९४ टक्के) होता. सध्या चारही धरणांमध्ये मिळून ७४६ एमसीएफटी पाण्याची आवक सुरू आहे.
दरम्यान, पाटबंधारे विभागाने नागरिकांना मुठा नदीपात्रात उतरू नये, नदीकाठावरील जनावरे व साहित्य तातडीने सुरक्षित स्थळी हलवावे तसेच सखल भागातील नागरिकांना सतर्क करावे, असे आवाहन केले आहे. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेऊन पाटबंधारे विभागास सहकार्य करावे, असेही विभागाने म्हटले आहे.

