पुणे, दि. २३ : शिवाजीनगर येथील सद्गुरू जंगली महाराज रस्त्यावरील छत्रपती संभाजी उद्यानातील कोट्यवधी रुपये खर्चून उभारण्यात आलेले मेकॅनिकल पार्किंग अखेर हटविण्याची प्रक्रिया पुणे महानगरपालिकेने सुरू केली आहे. अनेक वर्षांपासून दुरुस्तीअभावी बंद असलेले हे पार्किंग धोकादायक बनल्याने त्याचे स्ट्रक्चर काढण्यासाठी कंत्राटदाराची निवड करण्यात आली असून, त्यास स्थायी समितीची मंजुरी दिल्याचे समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले.
महापालिका प्रशासनाने सादर केलेल्या प्रस्तावानुसार, मेकॅनिकल पार्किंगचा वापर दीर्घकाळापासून बंद आहे. या पार्किंगच्या देखभाल, दुरुस्ती आणि संचालनासाठी आवश्यक तांत्रिक कौशल्य असलेले कंत्राटदार उपलब्ध न झाल्याने यंत्रणा निष्क्रिय राहिली. परिणामी संपूर्ण स्ट्रक्चर धोकादायक बनले असून त्याचा पुनर्वापर करण्यासाठी लागणारा खर्च संभाव्य उत्पन्नापेक्षा अधिक असल्याने ते आर्थिकदृष्ट्याही व्यवहार्य नसल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे.
या कामासाठी टेंडर क्रमांक ११-२०२६ अंतर्गत बी-२ पद्धतीने निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. एकूण सात निविदा प्राप्त झाल्या असून त्यापैकी चार निविदा पात्र ठरल्या. पात्र निविदांमध्ये स्पार्कटेक इंजिनिअरिंगने प्रतिमेट्रिक टन २९ हजार रुपयांचा सर्वात कमी दर दिला. आदित्य एंटरप्रायझेसने ३० हजार रुपये, सायलीला बांधकामने ३४ हजार रुपये, तर ए.आर. बांधकामने दोन लाख रुपयांचा दर सादर केला.
सर्वात कमी दर देणाऱ्या हडपसर येथील स्पार्कटेक इंजिनिअरिंग या कंपनीकडून जीएसटीसह प्रतिमेट्रिक टन २९ हजार रुपयांच्या दराने स्ट्रक्चर हटविण्याचे काम करून घेण्याचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीसमोर ठेवला आहे. मंजुरी मिळाल्यानंतर संबंधित कंपनीशी करारनामा करण्यात येणार असून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.
दळवी रुग्णालयात विशेष दिव्यांगांसाठी थेरपी सेंटर; ‘लायन्स क्लब ऑफ पूना आय फाउंडेशन’ची निवड
पुणे महापालिकेच्या समाज विकास विभागाच्या वतीने शिवाजीनगर येथील डॉ. दळवी रुग्णालयात विशेष दिव्यांगांसाठी सर्वसमावेशक थेरपी सेंटर सुरू करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून, हा उपक्रम राबविण्यासाठी लायन्स क्लब ऑफ पूना आय फाउंडेशन या संस्थेची निवड करण्याचा प्रस्तावाला स्थायी समितीने मान्यता दिली. मुख्य सभेसमोर मंजुरीसाठी ठेवण्यात आला येणार आहे. या केंद्रामध्ये दिव्यांगांसाठी विविध प्रकारच्या थेरपी, उपचार आणि समुपदेशन सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले. तसेच हा उपक्रम विभागाच्या सूचनेनुसार सूर राहणार असल्याचेही ते म्हणाले.
महापालिका आयुक्तांच्या ८ डिसेंबर २०२५ रोजीच्या मंजुरीनंतर समाज विकास विभागाने ५ डिसेंबर २०२५ रोजी अनुभवी सेवाभावी संस्थांकडून प्रस्ताव मागविले होते. त्यास दोन संस्थांनी प्रतिसाद दिला. लायन्स क्लब ऑफ पूना आय फाउंडेशन आणि स्फेरूल फाउंडेशन या संस्थांचे प्रस्ताव प्राप्त झाले. प्रस्तावांची छाननी केल्यानंतर लायन्स क्लब ऑफ पूना आय फाउंडेशनने आवश्यक सर्व कागदपत्रे सादर केल्याचे, तसेच दिव्यांग, आरोग्य, शिक्षण, पुनर्वसन आणि सामाजिक विकास क्षेत्रात अनेक वर्षांचा अनुभव असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे.
दुसरीकडे, स्फेरूल फाउंडेशनकडून आवश्यक नोंदणी प्रमाणपत्र आणि जाहिरातीनुसार अपेक्षित कागदपत्रे सादर करण्यात आली नसल्याचे, तसेच दिव्यांग क्षेत्रातील आवश्यक अनुभवही नसल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. त्यामुळे अनुभवी संस्था म्हणून लायन्स क्लब ऑफ पूना आय फाउंडेशनची निवड करण्याची शिफारस करण्यात आली आहे.
प्रस्तावानुसार केंद्रामध्ये बालरोग मज्जासंस्था सल्ला, मानसिक मूल्यांकन, स्पीच थेरपी, व्यावसायिक थेरपी, फिजिओथेरपी, वर्तन सुधारणा थेरपी, आनुवंशिक सल्ला, ऑडिओलॉजिकल चाचण्या, पीटीए, विशेष शिक्षण, उपचारात्मक थेरपी, बेरा आणि ईईजी अशा एकूण १३ सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या सेवांसाठी २०० रुपयांपासून १,२०० रुपयांपर्यंत जीएसटीसह शुल्क निश्चित करण्याचा प्रस्ताव आहे.
भविष्यात दिव्यांग विद्यार्थ्यांना किंवा रुग्णांना आणखी उपचार पद्धतींची आवश्यकता भासल्यास आरोग्य विभागाच्या मार्गदर्शनानुसार नवीन थेरपी सुरू करण्यास आणि त्यांचे दर महापालिका आयुक्तांच्या मंजुरीने निश्चित करण्याची तरतूदही प्रस्तावात करण्यात आली आहे. केंद्राचे दैनंदिन व्यवस्थापन, स्वच्छता, उपकरणांची देखभाल आणि थेरपी सेवा संबंधित संस्था स्वतःच्या खर्चाने चालविणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
विशेष म्हणजे, पुणे महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थी तसेच महापालिकेच्या रुग्णालयांतून संदर्भित करण्यात आलेल्या रुग्णांकडून प्रस्तावित शुल्काच्या केवळ ५० टक्के रक्कम आकारण्यात येणार आहे. उर्वरित खर्च महापालिकेच्या दिव्यांग कल्याणकारी योजनेअंतर्गत संबंधित अर्थशीर्षातून अदा करण्यात येणार असल्याचे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.

