दिल्लीतील सोनम वांगचूक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस सरकारी दंडेलशाही करत असल्याचा आरोप
पुणे १८ – ‘नीट’ परीक्षेत झालेल्या गैरप्रकाराबद्दल केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा या मागणीसाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक उपोषणाला बसले होते. पोलिसांनी बाळाचा वापर करून त्यांचे हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला. याच्या निषेधार्थ आम्ही आंदोलन करणार होतो. याचा धसका घेऊन सरकारने पोलिसांतर्फे पुणे शहरात जमावबंदी आदेश लागू केला आहे. ही पोलिसांतर्फे सरकारची दंडेलशाही आहे अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस व प्रवक्ता सुनील माने यांनी केली आहे.
याबाबत बोलताना ते म्हणाले, देशात वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी ‘नीट’ परीक्षा घेण्यात येते. त्यात प्रचंड गैरप्रकार झाले. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी त्याची जबाबदारी घेऊन राजीनामा दिला पाहिजे या मागणीसाठी सोनम वांगचूक यांनी दिल्लीत जंतर – मंतर मैदानावर उपोषण केले. त्यांचे उपोषण आज पोलिसांनी जबरदस्तीने तोडून टाकले. आमच्यासह सर्व विरोधी पक्षांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. संसदेत याबाबत चर्चा व्हावी यासाठी आम्ही मागणी करत होतो. त्याचबरोबर शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे ही आमची प्रमुख मागणी होती. यासाठी संसदेवर २० तारखेला मोर्चा काढणारच आहोत. त्याचवेळी आमचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सोमवार पासून राज्यभरात आंदोलनाची हाक दिली. बहुदा राज्यभरातील यंत्रणा, देशाने सर्वांना सतर्क केलेल्या यंत्रणांना हे लक्षात आल्याने त्यांनी या विरोधात वेगवेगळे आदेश काढायला सुरुवात केली आहे. आम्ही करत असलेल्या आंदोलनाच्या अनुषंगाने शुक्रवारच्या (दिनांक १७) तारखेच्या आदेशाने पोलिसांनी जमावबंदी लागू केली आहे. म्हणजे कोणी प्रचार, प्रसिद्धी, सभा, एकत्र जमणे, आंदोलन करणे, घोषणा देणे या सर्व गोष्टीं करण्यास पुणे पोलिसांनी बंदी घातली आहे. कालचा आदेश असतानाही माध्यमांना याबाबत माहिती देण्यात आली नाही. याचा अर्थ असा आहे की सरकार डरपोकपणा करत आहे. घाबरून लोकशाहीची हत्या करत आहे आणि मागच्या दाराने हुकुमशाही आणत आहे नव्हे जवळपास आणलीच आहे. आमची आंदोलने होऊ नयेत, विद्यार्थ्यांसाठी आम्ही रस्त्यावर उतरू नये, नीट सारख्या परीक्षेतले गैरव्यवहार बाहेर आणू नयेत म्हणून पोलिसांतर्फे सरकार दंडेलशाही करत आहे. आम्ही याचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करतो. सरकारने कितीही प्रयत्न केले तरी आम्ही आंदोलन करणारच असे ही ते म्हणाले.

