आधार ॲप वापरून सुमारे 49 लाख रहिवाशांनी आपला मोबाईल नंबर तर 11.65 लाख लोकांनी आपला पत्ता केला अद्ययावत
आधार ॲपने 4 कोटी डाउनलोड्सचा एक महत्त्वपूर्ण टप्पा ओलांडला आहे. यातून नागरिकांचा सोयीस्कर आणि डिजिटल ओळख सेवांवरील वाढता विश्वास अधोरेखित होतो.
आधार ॲपचा वाढता वापर हे घरबसल्या पत्ता अपडेट करणे, मोबाईल नंबर अद्ययावत करणे, ईमेल अद्ययावत करणे, बायोमेट्रिक लॉक/अनलॉक तसेच ई-आधार डाउनलोड करणे यांसारख्या आधार-संबंधित विविध सेवा मिळवण्यासाठी एक-स्टॉप डिजिटल प्लॅटफॉर्म म्हणून उदयास आले आहे.
ॲपचा प्रारंभ झाल्यापासून, आधार ॲपने 11.65 लाख जणांना पत्ते अद्ययावत करण्याची सुविधा दिली, त्यामुळे नागरिकांना आधार केंद्राला भेट न देता सोयीस्करपणे त्यांचे आधार तपशील अद्ययावत ठेवता येणार आहेत.
या ॲपने सुमारे 49 लाख मोबाईल नंबर अद्ययावत करण्याची सुविधा दिली, ज्यामुळे नागरिकांना त्यांच्या आधारशी जोडलेली अचूक संपर्क माहिती राखण्यास मदत मिळाली.
1 जुलै रोजी ईमेल अपडेट फीचर सुरू झाल्यापासून, आधार ॲपद्वारे सुमारे 12.5 लाख ईमेल ॲड्रेस जोडले किंवा अपडेट केले आहेत. परिणामी आवश्यकतेनुसार नागरिक आणि भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) यांच्यातील संवाद अधिक मजबूत झाला आहे. यापूर्वी या सुविधेसाठी 75 रुपये शुल्क आकारले जात होते. मात्र, आधार ॲप वर ही सुविधा 31 डिसेंबर 2026 पर्यंत विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या ॲपच्या गोपनीयता आणि सुरक्षा सुविधेचा वापरही मोठ्या प्रमाणावर होत आहे. नागरिकांनी बायोमेट्रिक लॉक/अनलॉक सुविधेचा वापर 19.1 कोटी पेक्षा जास्त वेळा केला आहे. ही सुविधा, आधार क्रमांक धारकांना त्यांची वैयक्तिक माहिती अधिक सुरक्षित ठेवण्याची हमी देते. नागरिक आवश्यकतेनुसार त्यांचे बायोमेट्रिक्स त्वरित लॉक किंवा अनलॉक करू शकतात आणि केवळ काही टॅप्सद्वारे सुरक्षा वाढवता येतो.

