उर्वरित दोन मार्गिकांवर पाणी; वाहनचालकांना सावधगिरी बाळगण्याचे ‘एमएसआरडीसी’चे आवाहन
पुणे : मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पाजवळ सोमवारी सकाळी कोसळलेली दरड बोगद्याच्या बाहेरील भागातच कोसळली असून, या घटनेचा बोगद्याच्या कामाच्या गुणवत्तेशी अथवा कोणत्याही तांत्रिक त्रुटीशी संबंध नसल्याचे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने स्पष्ट केले आहे.
लोणावळा परिसरात रविवारी मध्यरात्रीनंतर झालेल्या मुसळधार पावसामुळे डोंगरावरील मोठा दगड घरंगळत खाली आला. त्यामुळे द्रुतगती मार्गावर मोठ्या प्रमाणात दगड आणि मातीचा मलबा पसरला. दगडाच्या धडकेमुळे बोगद्याच्या प्रवेशद्वाराजवळील गर्डरचेही नुकसान झाले.
घटनेनंतर एमएसआरडीसी आणि संबंधित बांधकाम कंपनीच्या यंत्रणांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मलबा हटवण्याचे काम सुरू केले. नुकसान झालेला गर्डरही सुरक्षितपणे काढण्यात आला. रात्री १० वाजून १० मिनिटांनी मलबा पूर्णपणे हटवण्यात आल्याची माहिती एमएसआरडीसीकडून देण्यात आली.
एमएसआरडीसीचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. अनिलकुमार गायकवाड यांनी ही घटना नैसर्गिक कारणांमुळे घडल्याचे स्पष्ट केले. बोगद्याच्या कामाच्या गुणवत्तेबाबत उपस्थित करण्यात येत असलेल्या शंकाही त्यांनी फेटाळून लावल्या.
बोगद्याच्या सुरुवातीच्या भागात मोठ्या प्रमाणात पाणी झिरपत असून ते रस्त्यावरून वाहत असल्याचेही त्यांनी सांगितले. मुसळधार पाऊस सुरू असल्याने सध्या पाण्याचा नेमका स्रोत शोधणे शक्य नाही. पाऊस थांबल्यानंतर तज्ज्ञांच्या मदतीने झिरपणाऱ्या पाण्याचा उगम शोधून कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात येणार आहेत.
एमएसआरडीसी, रस्ता सुरक्षा अभियंता आणि बांधकाम कंपनीच्या अधिकाऱ्यांनी संबंधित मार्गाची पाहणी केल्यानंतर तो सुरक्षित असल्याचे घोषित केले. त्यानंतर दोन मार्गिकांवरून वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली आहे. उर्वरित दोन मार्गिकांवर अद्याप पाणी वाहत असल्यामुळे सध्या वाहतूक अंशतः सुरू ठेवण्यात आली आहे.
वाहनचालकांनी या परिसरातून प्रवास करताना सुरक्षित वेग राखावा, लेनची शिस्त पाळावी आणि महामार्ग पोलीस तसेच वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन एमएसआरडीसीने केले आहे.

