मुसळधार पावसाने खडकवासला धरणसाखळीत मोठी वाढ; २४ तासांत ३.७५ टीएमसी पाणी जमा, एकूण १०.६८ टीएमसी म्हणजेच ३६.६३ टक्के पाणीसाठा , खडकवासला ८० टक्के भरल्यास नदीत विसर्ग सुरू करणार
पुणे, दि. ७ जुलै २०२६ : खडकवासला धरणसाखळीच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे चारही धरणांच्या पाणीसाठ्यात अवघ्या २४ तासांत मोठी वाढ झाली आहे. मंगळवारी सकाळी ६ वाजता खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चार धरणांमध्ये एकूण १०.६८ टीएमसी म्हणजेच ३६.६३ टक्के पाणीसाठा नोंदविण्यात आला.
सोमवारी सकाळी या चारही धरणांमध्ये ६.९३ टीएमसी म्हणजेच २३.७८ टक्के पाणीसाठा होता. त्यामुळे गेल्या २४ तासांत धरणसाखळीतील पाणीसाठ्यात तब्बल ३.७५ टीएमसी आणि १२.८५ टक्क्यांची वाढ झाली आहे.
सर्वाधिक वेगाने वाढ खडकवासला धरणात झाली आहे. सोमवारी सकाळी खडकवासला धरणाचा पाणीसाठा ०.४० टीएमसी म्हणजे २०.३० टक्के होता. मंगळवारी सकाळी तो १.२४ टीएमसी म्हणजे ६२.९२ टक्क्यांवर पोहोचला. अवघ्या २४ तासांत खडकवासला धरणाच्या साठ्यात ०.८४ टीएमसी आणि ४२.६२ टक्क्यांची वाढ झाली आहे. धरणात सकाळी ६ वाजता ८७८ क्युसेक वेगाने पाण्याची आवक सुरू होती.
पानशेत धरणात ४.२० टीएमसी म्हणजे ३९.४१ टक्के, वरसगाव धरणात ४.६२ टीएमसी म्हणजे ३६.०५ टक्के, तर टेमघर धरणात ०.६२ टीएमसी म्हणजे १६.६७ टक्के पाणीसाठा नोंदविण्यात आला आहे. चारही धरणांमध्ये मिळून ३ हजार ७८५ क्युसेक वेगाने पाण्याची आवक सुरू आहे.
गेल्या २४ तासांत खडकवासला परिसरात १०० मिलिमीटर, पानशेत परिसरात २५८ मिलिमीटर, वरसगाव परिसरात २४० मिलिमीटर, तर टेमघर परिसरात १९९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
दरम्यान, मागील वर्षी याच दिवशी चारही धरणांमध्ये १९.०८ टीएमसी म्हणजे ६५.४६ टक्के पाणीसाठा होता. यंदाचा पाणीसाठा मागील वर्षाच्या तुलनेत अद्याप ८.४० टीएमसीने कमी आहे.
खडकवासला धरणातून विसर्ग सुरू होण्याची शक्यता
खडकवासला धरण पाणलोट क्षेत्रातील मुसळधार पाऊस आणि धरणात सुरू असलेली पाण्याची आवक लक्षात घेता येत्या काही तासांत धरण ८० टक्के अथवा त्याहून अधिक क्षमतेने भरण्याची शक्यता पाटबंधारे विभागाने व्यक्त केली आहे. पावसाची परिस्थिती कायम राहिल्यास धरणाच्या सांडव्यावरून कोणत्याही वेळी पाण्याचा विसर्ग सुरू केला जाऊ शकतो.
त्यामुळे नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये. नदीपात्रातील साहित्य, वाहने अथवा जनावरे तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवावीत. नदीकाठच्या आणि सखल भागातील नागरिकांनी सतर्क राहून प्रशासन व पाटबंधारे विभागाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी केले आहे.

