– मंत्री ॲड.आशिष शेलार
मुंबई, – महाराष्ट्रात लैंगिक अपराधास प्रवृत्त करणाऱ्या जाहिराती, जाहिरात फलक तसेच संकेतस्थळे व समाजमाध्यमांवरील अशा स्वरूपाच्या जाहिरातींना प्रतिबंध करण्यासाठी विद्यमान कायद्यांतील दंडात्मक तरतुदी अधिक कठोर करण्यासाठी तज्ज्ञ समिती स्थापन करण्याची घोषणा मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी विधानसभेत केली.
विधानसभा सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी लैंगिक गुन्ह्यांना प्रवृत्त करणाऱ्या जाहिराती, जाहिराती फलक समाज माध्यमे व संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यास प्रतिबंध करण्यास प्रतिबंध करणारे विधेयक मांडले.
या अशासकीय विधेयकास उत्तर देताना मंत्री ॲड.शेलार यांनी सांगितले की, महिलांचे असभ्य चित्रण, अश्लीलता आणि लैंगिक अपराधांना प्रोत्साहन देणाऱ्या जाहिरातींविरोधात शासनाची भूमिका अत्यंत कठोर आहे. अशा प्रकारची भाषा, चित्रे किंवा हावभाव सार्वजनिक माध्यमांतून प्रसारित करणाऱ्यांवर संविधान आणि विद्यमान कायद्यांनुसार कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
मंत्री ॲड.शेलार यांनी सांगितले की, भारतीय न्याय संहिता, स्त्रियांचे असभ्य प्रतिरूपण (प्रतिषेध) अधिनियम, केबल टेलिव्हिजन नेटवर्क नियम, माहिती तंत्रज्ञान अधिनियम तसेच इतर संबंधित कायद्यांमध्ये अश्लील साहित्य, महिलांचे असभ्य चित्रण आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमातून अश्लील मजकूर प्रसारित करण्याबाबत कारावास व दंडाच्या तरतुदी आधीपासूनच अस्तित्वात आहेत. मात्र, १९८६ व १९९४ मधील कायद्यांतील दंडाची रक्कम आजच्या परिस्थितीत अत्यल्प असल्याने ती वाढविण्याची आवश्यकता आहे.
स्त्रियांचे असभ्य प्रतिरूपण (प्रतिषेध) अधिनियम, १९८६ तसेच केबल टेलिव्हिजन नेटवर्क नियम, १९९४ मधील दंडात्मक तरतुदींचा पुनर्विचार करून दंडात वाढ करण्यासाठी केंद्र सरकारशी समन्वय साधला जाईल, असेही त्यांनी सांगितले. तसेच अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित ठेवत समाजहित आणि महिलांच्या सन्मानाचे संरक्षण करणारे संतुलित धोरण तयार करण्यासाठी तज्ज्ञ समिती स्थापन करण्यात येईल.
जाहिराती या समाजजीवनाचा आणि अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग असल्या तरी त्या समाजात सकारात्मक मूल्ये रुजविणाऱ्या असाव्यात, कुसंस्कार किंवा लैंगिक अपराधांना प्रोत्साहन देणाऱ्या नसाव्यात, असे मंत्री ॲड.शेलार म्हणाले. समाजात चांगले संस्कार आणि मूल्यांची जपणूक करण्यासाठी अशा प्रकारच्या अश्लील आणि महिलांचा अवमान करणाऱ्या जाहिरातींवर प्रभावी नियंत्रण आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

