पुणे : वानवडी परिसरातील वाहतूक आणि दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या तीन नव्या पुलांच्या उभारणीसाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार (पीएमसी) नियुक्त करण्याचा प्रस्तावाला पुणे महापालिकेने स्थायी समितीने मंजुरी दिली. निविदा प्रक्रियेनंतर मे. स्ट्रक्टसोर्स इंजिनिअरिंग सोल्युशन्स या संस्थेची नियुक्ती करण्याची शिफारस प्रशासनाने केली असल्याचे स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले.
प्रभाग क्रमांक २५ अंतर्गत वानवडीतील काळुबाई मंदिर ते अभ्युदय सोसायटी, वानवडी ताडीमळा तसेच भैरोबा नाला परिसरात नवीन पूल उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या कामांसाठी प्री-टेंडर आणि पोस्ट-टेंडर प्रक्रियेतील तांत्रिक कामकाज तसेच प्रत्यक्ष बांधकामावर देखरेख ठेवण्यासाठी तज्ज्ञ सल्लागार नेमण्याची प्रक्रिया राबविण्यात आली.
पथ विभागाचे मुख्य अभियंत्यांनी यासाठी निविदा मागविल्या होत्या. एकूण १३ संस्थांनी निविदा प्रक्रियेत सहभाग घेतला. तांत्रिक छाननीनंतर तीन संस्था पात्र ठरल्या. त्यानंतर गुणवत्ता आणि खर्च आधारित निवड पद्धती वापरून अंतिम मूल्यांकन करण्यात आले.
निविदा प्रक्रियेत पेव्हेटेक कन्सल्टिंग इंजिनिअरिंग सर्व्हिसेस प्रा. लि. आणि एन्व्हायरोसेफ कन्सल्टंट्स प्रा. लि. या संस्थाही पात्र ठरल्या होत्या. मात्र गुणांकनात मे. स्ट्रक्टसोर्स इंजिनिअरिंग सोल्युशन्स आघाडीवर राहिली.
या कामासाठी महापालिकेच्या २०२६-२७ च्या अंदाजपत्रकात संबंधित तरतूद उपलब्ध असून तज्ज्ञ सल्लागारांची फी त्यातून अदा करण्यात येणार आहे. गुणवत्ता तपासणी आणि प्रकल्प देखरेखीसाठी सुमारे तीन कोटी रुपयांची तरतूद असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे.
अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) ओमप्रकाश दिवटे यांनी स्थायी समितीकडे सादर केलेल्या प्रस्तावात मे. स्ट्रक्टसोर्स इंजिनिअरिंग सोल्युशन्स यांची प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यास तसेच त्यांच्या दरानुसार करारनामा करण्यास मंजुरी देण्याची विनंती करण्यात आली होती.

