पुणे : कोथरूड येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे बालनाट्यगृहात म्युरल (भित्तीचित्र) विषयक कामे करण्यासाठी सुमारे ६८.९५ लाख रुपयांच्या खर्चाच्या प्रस्तावाला मान्यता दिल्याचे स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले.
महापालिकेच्या भवन विभागामार्फत हे काम हाती घेण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी ६९ लाख ९९ हजार ९९८ रुपयांचे पूर्वगणनपत्रक मंजूर करण्यात आले होते. त्यानंतर ५९ लाख ३२ हजार २०२ रुपयांच्या अंदाजित खर्चासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. सुरुवातीच्या प्रक्रियेला अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने फेरनिविदा काढण्यात आली होती.
या कामासाठी दोन निविदा प्राप्त झाल्या असून दोन्ही निविदा पात्र ठरल्या.कामाच्या मूळ निविदा रकमेवर वस्तू व सेवा कर (जीएसटी) म्हणून सुमारे १०.५१ लाख रुपये अतिरिक्त खर्च होणार असून एकूण प्रकल्प खर्च ६८ लाख ९४ हजार ९९८ रुपयांपर्यंत जाणार आहे. या खर्चासाठी संबंधित अर्थशीर्षाखाली २०२६-२७ या आर्थिक वर्षात २.५५ कोटी रुपयांची तरतूद उपलब्ध असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. स्थायी समितीची मंजुरी मिळाल्याने बालनाट्यगृहातील म्युरल आणि कलात्मक सजावटीची कामे वेगाने पूर्ण केली जाणार आहेत. या माध्यमातून बालनाट्यगृहाच्या अंतर्गत सौंदर्यात भर पडण्याबरोबरच सांस्कृतिक वास्तूचे आकर्षण वाढविण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे.

