संस्कृती प्रकाशनतर्फे ‘कथा मनातली’ कथासंग्रहाचे प्रकाशन
पुणे : नवोदित आणि लिहित्या हातांना मोकळेपणा देऊन त्यांच्याकडून उत्तम, सकस आणि दर्जेदार लेखन घडवून आणणे हीच खरी साहित्य चळवळ आहे. अशा उपक्रमांमुळे साहित्याचा पाया अधिक भक्कम होतो आणि नवीन लेखकांना व्यासपीठ मिळते, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष भारत सासणे यांनी व्यक्त केले. वाचकांच्या अनुभवांना, भावविश्वाला आणि सत्य घटनांना साहित्यिक अभिव्यक्ती देणारा ‘कथा मनातली’ हा संग्रह मराठी साहित्यातील एक वेगळा टप्पा ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
मराठी साहित्यात एक आगळावेगळा प्रयोग म्हणून ओळख मिळवणाऱ्या ‘कथा मनातली’ या कथा संग्रहाचे प्रकाशन सासणे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. त्या वेळी ते बोलत होते. पत्रकार भवन येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रा. अविनाश फडतरे यांनी पुस्तकाचे संपादन केले आहे. ज्येष्ठ साहित्यिक व भाषातज्ज्ञ केशव सखाराम देशमुख, संस्कृती प्रकाशनच्या प्रकाशिका सुनीताराजे पवार, फर्ग्युसन महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. वसंतराव वाघ, साहित्यिक दिनेश फडतरे मंचावर होते.
ज्येष्ठ समीक्षक केशव देशमुख यांनी पुस्तकातील विविध कथांचा उल्लेख करत संग्रहाच्या साहित्यिक गुणवत्तेवर भाष्य करून या कथा समाजातील सकारात्मक प्रेरणा आणि मानवी मूल्यांचे दर्शन घडवणाऱ्या असल्याचे सांगितले. वाचकांनी लेखकाच्या भूमिकेत जाऊन लिहिलेल्या या सर्व कथा साध्या माणसांच्या पण वाचकांच्या मनात घर करणार्या उत्तम संस्कार कथा आहेत. सोप्या भाषेत प्रभावी आणि आशयघन लेखन उभे करणे हे अत्यंत कठीण काम असते. मात्र अविनाश फडतरे यांनी हे आव्हान समर्थपणे पेलत वाचकांच्या अनुभवांना साहित्यिक स्वरूप दिले आहे.
प्रकाशक सुनिताराजे पवार म्हणाल्या, वालीस कथा ही संकल्पना मराठी साहित्यविश्वासाठी नवी असली तरी वाचकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे या प्रयोगाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे भविष्यात अशा स्वरूपाचे आणखी साहित्यिक उपक्रम राबविले जातील. समाजातील असंख्य प्रेरणादायी, संघर्षमय आणि वास्तववादी अनुभव पुस्तकांच्या माध्यमातून पुढे येणे ही काळाची गरज आहे, असे त्या म्हणाल्या.
पुस्तक निर्मितीमागील संकल्पना, वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि भविष्यात अशा साहित्यिक उपक्रमांना चालना देण्याचा मानस संपादक अविनाश फडतरे व्यक्त केला.
दिनेश फडतरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर सूत्रसंचालन शाम पवार यांनी केले.

