राहुल गांधी विरुद्ध सावरकर मानहानी खटला : पुणे न्यायालयातील उलटतपासात महत्त्वाच्या बाबी समोर
पुणे- राहुल गांधी विरुद्ध सावरकर मानहानी खटलयात आज पुणे न्यायालयातील उलटतपासात महत्त्वाच्या बाबी समोर आल्याचे राहुल गांधी यांचे वकील मिलिंद पवार यांनी सांगितले , त्यांनी असेही सांगितले कि , आज फिर्यादी सात्यकी सावरकर यांनी उलटतपासात विनायक दामोदर सावरकर यांनी ब्रिटिश सरकारकडे दहा वेळा दया याचीका दिली होती असे मान्य केले .
पुणे येथील विशेष एमपी/एमएलए न्यायालयाचे न्यायाधीश श्री.अमोल श्रीराम शिंदे यांच्या न्यायालयात लोकसभेतील विरोधी पक्षनेते श्री. राहुल गांधी यांच्या विरोधात दाखल मानहानीच्या खटल्यात आज फिर्यादी सात्यकी सावरकर यांचा राहुल गांधी यांच्या वतीने अॅड. मिलिंद दत्तात्रय पवार यांनी उलटतपास घेतला.याबाबत गांधी यांचे वकील मिलिंद पवार यांनी माहिती देताना सांगितले की,
‘उलटतपासादरम्यान फिर्यादी सात्यकी सावरकर यांनी मान्य केले की त्यांच्या मातोश्री हिमानी सावरकर यांनी पुणे येथील कसबा व कोथरूड विधानसभा मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवली होती आणि दोन्ही वेळा त्यांचे डिपॉझिट जप्त झाले होते.तसेच, विनायक दामोदर सावरकर यांनी ब्रिटिश सरकारकडे दहा वेळा दया याचीकादिली होती, हे त्यांनी मान्य केले. सावरकर यांच्या दया याचीकेतील भाषा नम्रतेची होती, हेही त्यांनी स्वीकारले. दया याचीकेतील भाषा ब्रिटिश सरकारप्रती निष्ठा व्यक्त करणारी होती, हे त्यांनी मान्य केले नाही; मात्र ती भाषा तत्कालीन शासकीय व कार्यालयीन कामकाजाच्या पद्धतीनुसार होती, असे त्यांनी सांगितले.
दया याचीकेंच्या माध्यमातून शिक्षा कमी करण्यासाठी विनायक दामोदर सावरकर यांनी ब्रिटिश सरकारकडे विनंती केली होती, हेही सात्यकी सावरकर यांनी मान्य केले. तसेच, माफीपत्रातील भाषा ही केवळ औपचारिक होती किंवा ती सावरकरांच्या राजकीय रणनितीचा भाग होती, हे सिद्ध करणारा कोणताही तज्ज्ञ अहवाल उपलब्ध नसल्याचेही त्यांनी मान्य केले. विनायक दामोदर सावरकर यांचा कैदी क्रमांक ३२७७८ होता, असेही त्यांनी सांगितले.
दिनांक १४ नोव्हेंबर १९१३ रोजी विनायक दामोदर सावरकर यांनी दोन पानांचे दया याचीका सादर केली होती आणि त्याचा संपूर्ण मजकूर सरकारी दप्तरी उपलब्ध असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच प्रत्येक दया याचिके मध्ये “आय बेग टु रिमेन, सर, युवर मोस्ट ओबेंडीयंट सर्वंट, व्ही. डी. सावरकर असा मजकूर लिहून सावरकरांनी त्यावर सही केली
असल्याचे मला माहीत नसल्याचे सांगितले. तसेच, माफीपत्र करणे हे क्रांतिकारकांवर बंधनकारक नव्हते; ते संबंधित कैद्याच्या इच्छेवर व निर्णयावर अवलंबून होते, असेही त्यांनी नमूद केले.
उलटतपासादरम्यान शहीद भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त हे शेवटपर्यंत त्यांच्या विचारसरणीवर व तत्त्वांवर ठाम राहिले होते, हे बरोबर असल्याचे त्यांनी मान्य केले. मात्र, त्या कारणामुळेच त्यांना ब्रिटिशांनी फाशी दिली, याबाबत माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.
याशिवाय, शिक्षा झाल्यानंतर पहिल्याच महिन्यात विनायक दामोदर सावरकर यांनी दया याचीका दाखल केल्याचेही सात्यकी सावरकर यांनी मान्य केले.
न्यायालयीन कामकाजाची वेळ संपल्यामुळे पुढील सुनावणी दिनांक १ जुलै २०२६ रोजी होणार आहे.
या खटल्यात अॅड. ज्ञानेश्वरी जाधव, अॅड. सुयोग गायकवाड, अॅड. आकाश देशमुख, अॅड. सारंग बहिरट व अॅड. कैलास जिरे हे सहकार्य करीत आहेत.
उलटतपासातील ठळक मुद्दे
- सावरकरांनी १० वेळा क्लेमन्सी पिटिशन्स दिल्याची कबुली.
- दहा क्लेमन्सी पिटिशन्सची सरकारी नोंद उपलब्ध.
- पिटिशन्स न्यायालयात दाखल केल्या नसल्याची कबुली.
- सर्व क्लेमन्सी पिटिशन्स ब्रिटिशांनी नाकारल्याचा दावा.
- दया याचिका करणे बंधनकारक नव्हते, असे उत्तर.
- उलटतपास १ जुलैपर्यंत तहकूब.

