पुणे-पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने आज पहाटे सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास चिखली-कुदळवाडी परिसरात मोठी अतिक्रमण कारवाई केली. या कारवाईत पाच धार्मिक स्थळे पाडण्यात आल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला असून परिसरात तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.विशेष म्हणजे, कारवाईपूर्वीच अर्शद अस्लम खान आणि स्थानिक रहिवाशांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी तसेच अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांना निवेदन देऊन कारवाईत पारदर्शकता ठेवण्याची मागणी केली होती. तसेच कोणत्याही एका समाजाला लक्ष्य करून कारवाई करू नये, अशी स्पष्ट भूमिका मांडली होती.
शहरातील अनेक अनधिकृत बांधकामे दंड आकारून नियमित करण्यात आली आहेत. मग चिखली-कुदळवाडीतील रहिवाशांनाही समान न्याय का दिला जात नाही? अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या नागरिकांना अद्याप पाणी, मलनिस्सारण यांसारख्या मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवण्यात आले आहे. त्यातच १० एप्रिल २०२६ रोजी झालेल्या कारवाईत प्रार्थनास्थळे, दुकाने, लघुउद्योग आणि घरे जमीनदोस्त करण्यात आली होती.मात्र, निवेदन दिल्यानंतर अवघ्या काही तासांतच पुन्हा पहाटेच्या अंधारात कारवाई झाल्याने नागरिकांनी प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. “जर सर्वांवर समान कारवाई होत असेल तर केवळ विशिष्ट भाग आणि विशिष्ट समाजाच्या बांधकामांवरच वारंवार बुलडोझर का चालतो?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.अर्शद खान यांनी प्रशासनाला इशारा देत म्हटले की,महापालिकेने कायद्याचे राज्य राखावे, पण कोणत्याही समाजाला टार्गेट केल्याचा आभास निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी. समान न्याय आणि पारदर्शकता हीच आमची मागणी आहे.दरम्यान, या कारवाईमुळे चिखली-कुदळवाडी परिसरात भीती, असुरक्षितता आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिक आता न्यायासाठी पुढील कायदेशीर आणि लोकशाही मार्गाने लढा उभारण्याच्या तयारीत आहेत.

