पुणे-मेट्रोचे भूमिपूजन माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या हस्ते येत्या 23 डिसेंबरला सकाळी सकाळी 11 वाजता होणार आहे, असे महापौर प्रशांत जगताप यांनी आज पत्रकार परिषदेत जाहीर केले.यामुळे आता मेट्रोचेभूमिपूजन 2 वेळा होईल काय? असा प्रश्न विचारला जावू लागला आहे.
मेट्रो वरून भाजप -राष्ट्रवादीत कलगीतुरा .. २३ ला पवारांच्या हस्ते भूमिपूजन करण्याचा महापौरांचा निर्धार
मेट्रोचे श्रेय लाटण्यासाठी राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये मेट्रोचे भूमिपूजन कोणाच्या हस्ते होणार याबाबत वाद रंगला होता. यामध्ये राष्ट्रवादीकडून शरद पवार तर भाजपकडून मोदी भूमिपूजन करतील असे सांगण्यात येत होते . काही दिवसांपूर्वी जिल्हाधिका-यांनी भूमिपूजन मोदींच्या हस्ते होणार, असे परिषदेत जाहीर केल्यानंतर हा वाद मिटण्याची चिन्हे दिसत होती. मात्र, त्यानंतर शरद पवार यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवून मुख्य व्यासपीठावर मानाचे स्थान द्यावे, अशी मागणी राष्ट्रवादीतून होत होती. मात्र, तसे न करता नियमानुसार व्यासपीठावर मान्यवर बसणार, असे भाजपकडून स्पष्ट झाल्यावर, पवार यांना व्यासपीठावर दुय्यम स्थान दिले जाईल अशी व्यवस्था दिसून आल्यावर महापौर यांनी पत्रकार परिषद घेऊन मोदींच्या आधी शरद पवार यांच्या हस्ते 23 डिसेंबरला मेट्रोचे भूमिपूजन होणार, असे जाहीर केले.
तसेच या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, अशोक चव्हाण आणि रामदास आठवले यांना या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात येणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
याबाबत अधिक बोलताना प्रशांत जगताप यांनी भाजप हा सत्तेचा वापर करून मेट्रो प्रकल्पाच्या उद्घाटन कार्यक्रमाबाबत चुकीचा पायंडा पाडत आहे. 2 स्टेज करून केवळ राजकीय फायदा लाटण्यासाठी, असा उद्योग करत आहेत, असा आरोपही केला. तसेच आम्ही विकास कामाबाबत राजकारण करणार नाही. शरद पवार यांच्या हस्ते 23 तारखेला सकाळी उद्घाटन होईल. याप्रसंगी मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, अशोक चव्हाण आणि रामदास आठवले यांना या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात येणार आहे. माझे नेते आणि अन्य इतर नेते दुस-या स्टेजवर आणि पंतप्रधान व मुख्यमंत्री एका स्टेजवर ही बाब केवळ भाजप केंद्रित राजकारणाचा प्रकार आहे, असे जगताप म्हणाले.