न्यायव्यवस्थेला नेमके प्रश्न विचारले पाहिजेत: अॅड. असीम सरोदे
पुणे :युवक क्रांती दलाचे संस्थापक आणि महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ.कुमार सप्तर्षी यांनी संपादित केलेल्या ‘सत्याग्रही विचारधारा’ या दिवाळी अंकाचा प्रकाशन समारंभ शनिवार,दि.२६ ऑक्टोबर रोजी,सायंकाळी ६ वाजता गांधी भवन(कोथरूड)येथे झाले.ज्येष्ठ लेखक राजन खान,’निर्भय बनो’ चळवळीचे प्रणेते अॅड.असीम सरोदे यांच्याहस्ते हा प्रकाशन समारंभ झाला. महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ.कुमार सप्तर्षी हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
एम. एस. जाधव,अन्वर राजन, डॉ उर्मिला सप्तर्षी, प्रशांत कोठडिया, रवींद्र धनक, डॉ. प्रवीण सप्तर्षी, भारदे, एड. स्वप्नील तोंडे,अभय देशपांडे, सौ.रमा सप्तर्षी, प्रसाद झावरे, अप्पा अनारसे, सचिन पांडुळे उपस्थित होते.अभय देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. अन्वर राजन यांनी आभार मानले.
ज्येष्ठ लेखक राजन खान म्हणाले,’डॉ. कुमार सप्तर्षी हे पित्याच्या जागी आहेत.ते देशातील मानवी विद्यापीठ आहेत.सत्याग्रही विचारधारा चालणार नाही असे पुण्यातील अनेकांना वाटत होते. पण या मासिकाने यशस्वी होऊन दाखवले.
‘डॉ. सप्तर्षी यांच्या समाजाबद्दल च्या कल्पना, विचार आवडले. म्हणून एकत्र काम केले. युक्रांद आणि पँथर ने राजकारणात यायला नको होते. त्यांनी देशाला दिशा दिली असती. समाजकारणात राहून काम करायला हवे होते, राजकारणात जायला नको होते. राजकारण हा जुगार आहे. कोणाला पाठिंबा द्यावा असा प्रश्न पडतो. धर्म आणि राजकारण हे धंदे आहेत.त्यातून चलन निर्मिती होते. महा विकास आघाडी ला पाठिंबा दिला पाहिजे पण त्यांनी अदानी बरोबर हात मिळवणी केलेली चालणार आहे का ? असा प्रश्न राजन खान यांनी विचारला.
विचारधारा आणि सध्याच्या नेत्यांबद्दल बोलताना राजन खान पुढे म्हणाले,’नेहरू आणि गांधी सर्वच पक्षांच्या दृष्टीने अडचणीत ठरले असले तरी राहुल गांधींना राजकारण ची नाडी सापडली आहे, असे माझ्या लक्षात आले आहे.त्यांनी डॉ. सप्तर्षी यांचे मार्गदर्शन घेतले पाहिजे.डाव्यानी तत्व निष्ठता सोडली नसती तर देशाची इतकी वाताहात झाली नसती. त्यामुळे टुकारांना साहेब म्हणावे लागत आहे. पवारांनी बारामतीत फक्त आपल्या कुटुंबियांना निवडणुकीत का उभे करावे, असा प्रश्न विचारला पाहिजे. छत्रपतींचा वारसा त्यांचे वारसा चालवतात का, असाही प्रश्न पडतो.अण्णा हजारे देखील उघडे पडले. आपण त्यांनाही फसलो.
सर्वच जण समाजाला फसवणार असतील तर आपण जायचे कुठे? सरंजामशाही आपल्यालाच हवी आहे, म्हणून ती टिकून आहे. आपण निवडून देतो म्हणून हे सारे चालू आहे.मनुस्मृती टिकून होतीच समाजात, पण लागू होण्याच्या बेतात आहे. परंतु, तरीही या देशातील करुणेचा प्रवाह थांबणार नाही. आपण काय करणार यावर लक्ष ठेवावे लागणार आहे.
एड. असीम सरोदे म्हणाले,’ डॉ सप्तर्षी यांनी सत्याग्रही विचारधाराची वैचारिक बैठक तयार केली आहे. अण्णा हजारेंच्या नादात देश वाहवत गेला. सत्याग्रह कल्पनेबाबत गैरसमज तयार केला. त्यांनी इलेक्टोरल बाँड बद्दल बोलायला हवे होते. न्यायाला अन्यायाचे स्वरूप दिले जात आहे. न्याय व्यवस्थेत लहान लहान चंद्रचूड तयार होत आहेत. न्यायव्यवस्थेला नेमके प्रश्न विचारणारे उरले नाहीत.आपण संवैधानिक पद्धतीने लढलो तर दुराग्रह करणाऱ्यांना अधिक त्रास होतो. असत्य बोलणारांना मोठी किंमत मिळत आहे.म्हणूनच व्रत घेतल्यासारखे सत्याचा मार्ग धरला पाहिजे.गांधी आणि आंबेडकर यांना एकत्र करून चालले पाहिजे.
अध्यक्ष स्थानावरुन बोलताना डॉ. कुमार सप्तर्षी म्हणाले,’सर्व समाजातील अंतर कमी झाल्याशिवाय देशाची प्रगती होणार नाही. सत्य हे ठामपणे बोलले तर त्याचा प्रभाव पडतो. सध्या अनैतिकता पचविण्याची समाजाची तयारी झाली आहे.तसे होऊ देता कामा नये. लाडकी बहिण म्हणणारे महिलेलाच शिवीगाळ करू लागले आहेत.मागील निवडणुकीत नागरिकांची भीती गेली आहे. अन्याय ही नीती बनू देता कामा नये.काळ सोकावू देता कामा नये.