पुणे: कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाअंतर्गत निवडणूक कामकाजाकरीता नियुक्त तंत्रज्ञान तज्ज्ञ, सेक्टर अधिकारी, सहाय्यक सेक्टर अधिकारी व इतर अधिकारी असे एकूण ९६ निवडणूक केंद्रावरील अधिकाऱ्यांना ईव्हीएम हाताळणीचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले.
गणेश कला क्रीडा रंगमंच येथे आयोजित प्रशिक्षणाच्यावेळी कसबा पेठ पुणे विधानसभेचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सूर्यकांत येवले, तहसीलदार सुषमा पैकिकरी, प्रवीणा बोर्डे, शामल चिनके, नितीन गायकवाड, गजानन जाधव आदी उपस्थित होते.
या प्रशिक्षण घेतलेल्या अधिकाऱ्यांना तसेच कसबा पेठ व शिवाजीनगर मतदारसंघातील मतदान केंद्रावर नियुक्त अधिकाऱ्यांना २६ व २७ ऑक्टोबर २०२४ ईव्हीएम हाताळणीचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या दोन्ही विधानसभा मतदारसंघाच्या मतदान केंद्रावर असणाऱ्या एकूण २ हजार अधिकाऱ्यांना समावेश आहे.
श्री. येवले म्हणाले, विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्याकरीता कसबा पेठ व शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांसाठी ईव्हीएम हाताळणीबाबतचे एकूण तीन टप्प्यात प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. निवडणुकीचे गांभीर्य ओळखून आपल्या जबाबदाऱ्या राष्ट्रीय भावनेने व्यवस्थित पार पाडाव्यात व निवडणुकीच्या कर्तव्यात कसूर, दिरंगाई व निष्काळजीपणा करू नये, असे श्री. येवले म्हणाले.
0000