मुंबई-शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्याला आज दुर्दैवाने महाराष्ट्रातील क्राइम कॅपिटल असे म्हणले जात असल्याची खंत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे. सुप्रिया सुळे यांनी मुंबईत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील एकूण घडामोडींवर भाष्य केले आहे. तसेच त्यांनी पुण्यात वाढत्या गुन्हेगारीवर भाष्य करत राज्यातील गृहखात्यावर टीका केली आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, राज्यात महिलांच्या विरोधातील गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे. पुण्यात कोयता गॅंगची देखील दहशत इतकी वाढली आहे की ते थेट पोलिसांवर देखील हल्ला करत आहेत. पोलिसांचा धाक या गुन्हेगारांना राहिलेला नाही. पुण्याला शिक्षणाचे माहेरघर असे म्हणले जाते, मात्र दुर्दैवाने पुण्याला क्राइम कॅपिटल म्हणून संबोधले जात आहे. यात राज्याच्या गृहखात्याचे सपशेल अपयश दिसून येत आहे. एकंदरीतच राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
महायुती सरकारवर टीका करताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, हे सरकार महिलाविरोधी आहे. महाराष्ट्राने या अदृश्य शक्तिला नाकारले आहे. हा देश संविधानाने चालतो. आम्हाला संविधानाने आंदोलन करण्याचा अधिकार दिला आहे. मुंबईमध्ये आम्ही संविधानाच्या अधिकारातच आंदोलन केले होते, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा निर्णय पुढील 10 दिवसात होईल, अशी माहिती देखील सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. उमेदवारांना तयारी करण्यासाठी जास्त वेळ मिळवा यासाठी लवकरच जागा वाटपाचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पुण्यात 24 तासांत दोन हत्या-पुणे शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या नाना पेठ परिसरात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची भर चौकात गोळ्या घालून तसेच कोयत्याने वार करत हत्या करण्यात आली आहे. या घटनेच्या अवघ्या काही तासातच एका फायनान्स कंपनीतील मॅनेजर असलेले वासुदेव कुलकर्णी यांची देखील हत्या करण्यात आली आहे. वासुदेव कुलकर्णी शतपावलीसाठी घराच्या बाहेर फिरत असताना अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने वार करत त्यांची हत्या केली आहे.