संभाजीनगर, दिनांक १ सप्टेंबर २०२४-
शिवानंद कुंडजे (नाशिक) व सतीश कुलकर्णी (मुंबई) यांनी अनुक्रमे ६९ वर्षावरील व ७४ वर्षांवरील गटात विजेतेपद पटकाविले आणि प्रौढांच्या तिसऱ्या राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत शानदार कामगिरी केली.
सरस्वती भुवन बॅडमिंटन हॉल मध्ये संभाजीनगर प्रौढ टेबल टेनिस अकादमीने ही स्पर्धा आयोजित केली असून त्यास महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघटना व महाराष्ट्र राज्य प्रौढ टेबल टेनिस समिती यांची मान्यता मिळाली आहे.
स्पर्धेतील ६९ वर्षावरील गटात शिवानंद यांनी अंतिम सामन्यात सोलापूरच्या गोरख गडसिंग या अग्रमानांकित खेळाडूंना ११-५,१२-१०,११-५ असे सरळ तीन गेम्स मध्ये पराभूत केले. शिवानंद यांना द्वितीय मानांकन देण्यात आले होते. ७४ वर्षावरील गटात सतीश कुलकर्णी यांनी अंतिम करीत मुंबईच्या पिनाकीन संपत यांचा ११-३, ११-६,११-६ असा पराभव केला आणि आपले अग्रमानांकन सार्थ ठरविले.
सांघिक विभागात ५९ वर्षावरील गटात सनीज टीमने अंतिम फेरी गाठताना पीवायसी ‘अ’ संघाचा ३-१ असा पराभव केला. त्यावेळी एकेरीच्या पहिल्या लढतीत कपिल कुमार यांनी नितीन मेहेंदळे यांचा ११-८,११-४,१४-१२ असा पराभव केला. मात्र सुनील बाब्रस यांनी अविनाश जोशी यांना पुढे चाल दिली. दुहेरीच्या लढतीत कपिल कुमार व बाब्रस यांनी अविनाश जोशी व नितीन मेहेंदळे यांचा ७-११, ११-४,११-८,११-४ असा पराभव केला. परतीच्या सामन्यात बाब्रस यांनी मेहेंदळे यांना ११-८,११-७, ११-२ असे हरविले आणि संघास ३-१ असा विजय मिळवून दिला.
उपांत्य फेरीचे दुसऱ्या लढतीत नागपूर ऑरेंज संघाने फोर्झा संघाला ३-१ असे पराभूत केले. त्यावेळी नागपूरच्या अशोक कळंबे यांना पहिल्या लढतीत सतीश कुलकर्णी यांच्याकडून ४-११,७-११,९-११ असा पराभव पत्करावा लागला. मात्र प्रदीप गुप्ता यांनी जयंत कुलकर्णी यांचा असा पराभव करीत ४-११,११-८,११-२, ११-८ अशी बरोबरी साधली. पाठोपाठ प्रफुल्ल वाघ व कळंबे यांनी दुहेरीच्या लढतीत सतीश व जयंत कुलकर्णी यांचा ११-७,३-११,११-७,११-८ असा पराभव करीत संघास २-१ अशी आघाडी मिळवून दिली. निर्णायक लढतीत कळंबे यांनी जयंत कुलकर्णी यांचा ६-११,९-११,११-५, ११-१,११-६असा पराभव करीत संघाला विजयी केले.
स्पर्धेतील ३९ वर्षावरील गटात सोलापूर ‘अ’ संघाने अजिंक्यपद पटकाविले. त्यावेळी पहिल्या सामन्यात सोलापूरच्या बसाक चौधरी यांनी सुहास राणे यांच्यावर ११-७,११-४,११-८ अशी मात केली तर मनीष रावत यांनी सूरज चंद्रशेखर यांचा ११-३,१०-१२,११-६,१२-१० असा पराभव केला. तथापि सोलापूरच्या नितीन तोष्णीवाल्यांना डॉक्टर मनीष बात्रा यांच्याकडून ५-११,५-११,५-११ असा पराभव पत्करावा लागला. निर्णायक लढतीत रावत यांनी सुहास राणे यांच्यावर ११-७,१४-१२,११-५ अशी मात केली आणि संघास विजेतेपद मिळवून दिले.