नवी दिल्ली, 29 ऑगस्ट 2024
कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळाच्या तक्रारी नोंदवण्यासाठी तसेच अशा घटनांवर देखरेख ठेवण्यासाठी केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालयाने शी बॉक्स अर्थात SHe-Box हे, नवे वेब पोर्टल सुरू केले आहे. संपूर्ण देशासाठी केंद्रीकृत पोर्टल म्हणून हे वेब पोर्टल कार्यरत राहील. आज नवी दिल्ली इथे या नव्या संकेतस्थळाच्या लोकार्पणाचा कार्यक्रम झाला. यावेळी केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांच्या हस्ते या संकेतस्थळाचा प्रारंभ झाला. महिला आणि बालविकास राज्यमंत्री सावित्री ठाकूर, महिला आणि बालविकास मंत्रालयाचे सचिव अनिल मलिक यांच्यासह मंत्रालयाचे अनेक अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते.
शी बॉक्स हे नवे वेब पोर्टल देशभरातील सर्व शासकीय तसेच खाजगी क्षेत्रातील आस्थापने आणि कार्यालयांमध्ये स्थापन केल्या गेलेल्या अंतर्गत समित्या (IC) आणि स्थानिक समित्यांशी (LC) संबंधित माहितीसाठाचे केंद्रीकृत भांडार म्हणून कार्यरत असेल. तक्रार दाखल करणे तसेच तक्रारीच्या स्थितीगतीविषयी माहिती मिळवण्यासाठी एकच व्यासपीठ म्हणून हे वेब पोर्टल उपयुक्त ठरणार आहे. यासोबतच अंतर्गत समित्यांद्वारा कालबद्ध स्वरुपात प्रक्रिया पार पाडली जाईल याची सुनिश्चिती करण्यातही या वेब पोर्टलची मदत होणार आहे. हे वेब पोर्टल प्रत्येक संबंधीताला तक्रारीचे निवारण होण्याची तसेच सुव्यवस्थित प्रक्रियेची हमी देते. हे पोर्टल समर्पित समन्वयक अधिकाऱ्याच्या माध्यमातून तक्रारींसंबधी प्रक्रियेवर देखरेख ठेवेल.
येत्या 25 वर्षांत भारताच्या स्वातंत्र्य प्राप्तीला शंभर वर्षे पूर्ण होणार आहेत. आपल्या स्वातंत्र्याची शताब्दी गाठत असताना म्हणजेच 2047 सालापर्यंत देशाला विकसित राष्ट्र बनवण्याचा संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने केला आहे. हा संकल्प प्रत्यक्षात साकारण्यासाठी केंद्र सरकारने, सर्वसमावेषक आर्थिक विकासातील महिला नेतृत्वाच्या भूमिकेचे महत्व ओळखून, गेल्या दशकभराच्या काळात महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाच्या प्रक्रियेला अनन्यसाधारण महत्व दिले आहे.
हा उपक्रम म्हणजे प्रत्येक कार्य क्षेत्रातील मनुष्यबळात महिलांचा सहभाग वाढविण्याच्या उद्देशपूर्तीचा पायाच आहे. त्याच अनुषंगाने महिलांसाठी कामाची ठिकाणे सुरक्षित आणि संरक्षित असतील याची सुनिश्चिती करणे, आणि या माध्यमातून महिलांची भरभराट आणि यशाचा मार्ग प्रशस्त करणे हेच या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी महिलांवरील लैंगिक छळ (अटकाव,प्रतिबंध आणि निवारण) कायदा, 2013 देशात लागू आहे. महिलांना कामाच्या ठिकाणी लैंगिक छळापासून संरक्षण मिळावे तसेच संबंधित तक्रारींचे निवारण केले जावे या उद्देशानेच हा कायदा लागू केला गेला आहे. या कायद्याच्या माध्यमातून दिल्या गेलेल्या याच वचनबद्धतेला धरून, शी – बॉक्स या नव्या वेब पोर्टलची आखणी केली गेली आहे, आणि कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळा संबंधीच्या तक्रारींचे निवारण आणि व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने सरकारने एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे.
केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालयाने शी – बॉक्स या वेब पोर्टल सोबतच, केंद्र सरकारच्या गरजेची पुर्तता करण्याच्या उद्देशाने निर्मिती केलेल्या आणखी एका नव्या संकेतस्थळाचाही प्रारंभ केला आहे.
यानिमीत्ताने झालेल्या कार्यक्रमाला केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी संबोधित केले. कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळा संबंधीच्या तक्रारींचे निवारण करण्याकरता, अधिक कार्यक्षम आणि सुरक्षित व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने सुरु केलेले शी – बॉक्स हे वेब पोर्टल म्हणजे सरकारने टाकलेले महत्त्वाचे पाऊल असल्याचे त्या यावेळी म्हणाल्या. या वेब पोर्टलमुळे देशभरातील सर्व महिलांसाठी कामाचे, सुरक्षित आणि सर्वसमावेशक वातावरण निर्माण करण्याप्रती सरकारची वचनबद्धताही अधिक दृढ झाली असल्याचेही त्या म्हणाल्या. या वेब पोर्टलवर दाखल झालेल्या तक्रारींसंबंधी तक्रारदाराचा कोणताही वैयक्तिक तपशील सार्वजनिक होणार नाही त्यामुळे तक्रारदाराला सुरक्षीतपणे तक्रार दाखल करता येईल याची सुनिश्चिती हे पोर्टल करेल असा विश्वास केंद्रीय मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी व्यक्त केला.
शी-बॉक्स वेब पोर्टलला भेट देण्यासाठीचा दुवा https://shebox.wcd.gov.in/ मंत्रालयाच्या नव्या संकेतस्थळाला भेट देण्यासाठीचा दुवा आणि https://wcd.gov.in/