जालना-मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी गुरुवारी पुन्हा एकदा महायुती सरकारविरोधात दंड थोपटले. यावेळी त्यांनी 29 सप्टेंबरपासून पुन्हा उपोषणाला बसण्याची घोषणा केली. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धडा शिकवण्याचाही निर्धार व्यक्त केला. सरकारने 28 सप्टेंबरपर्यंत आरक्षण दिले नाही तर मी 29 सप्टेंबरपासून उपोषणाला बसेन, असे ते म्हणाले.मनोज जरांगे यांच्या आरक्षणाच्या आंदोलनाला गुरुवारी 1 वर्ष पूर्ण झाले. यानिमित्ताने पत्रकारांशी संवाद साधताना जरांगे म्हणाले की, मराठा समाज एकजूट होत नाही असा आरोप आतापर्यंत केला जात होता. पण 29 ऑगस्ट 2023 रोजी मराठा समाजाने एक डरकाळी फोडली आणि त्याचा आवाज संबंध महाराष्ट्रात पोहोचला. त्या दिवशी मराठा समाज आपल्या हक्कासाठी एकत्र आला. आज आमचे मराठा कुटुंब एक झाले असून, त्यांची एकजूट कुणीही फोडू शकत नाही.
मनोज जरांगे यांनी यावेळी भाजप व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही आगपाखड केली. ते म्हणाले की, मला तुरुंगात डांबण्याचा प्रयत्न झाला तर आगामी निवडणुकीत यांना साफ करून टाकील. ग्रामपंचायतीवरही त्यांचा एकही सदस्य आम्ही निवडून येऊ देणार नाही. माझ्या नादाला लागू नको. मी तुझा शत्रू नाही. फार तर ते मला तुरुंगात डांबतील. त्यानंतर आम्ही इथे बसायचे तर तुरुंगात जाऊन बसू. यापेक्षा अधिक काहीही होणार नाही. पण खरेच असे झाले तर राज्यात भाजपची एकही जागा येणार नाही. एवढेच नाही त्यांची नागपूरची जागाही निवडून येणार नाही.
मनोज जरांगे यांनी यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले, रावसाहेब दानवे यांनी मार्च महिन्यातील एका प्रकरणात पोलिसांना आता माझ्यावर गुन्हा दाखल करण्यास सांगितले. एका अधिकाऱ्यानेच आम्हाला तशी माहिती दिली आहे. मी त्यांना आतापर्यंत दादा म्हणत होतो. पण आता त्यांनीच माझ्यावर केस दाखल केली. याने माझे काहीच होणार नाही. आता त्यांचे कुणी निवडणुकीला उभे राहिले की मी त्यांना माझा कचका दाखवतो.
ओबीसी व मराठा समाजात कुठेही कटुता नाही. आम्ही दररोज एकमेकांना भेटल्याशिवाय राहत नाही. पण छगन भुजबळ स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी या दोन्ही समाजांत वाद असल्याचे भासवत आहेत. राज्यातील जनता त्यांच्या या कटात फसणार नाही. आज मसाज एकजूट झाला आहे. त्यामुळे आता भुजबळांनी कितीही खुंटे ठोकले तरी ते आम्ही सजपणे उपटून फेकू. आता आमचे सर्वच प्रश्न सुटतील, असेही मनोज जरांगे यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले.
सरकार लाडक्या बहिणीला 1500 रुपये देतो. मग आपल्या भाच्याला व दाजीला काय देणार? आता दाजीच एक दिवस तुम्हाला घोडे लावेल. आम्हाला कर्जमाफी, शेतीमालाला भाव, शेतीला पाणी, 24 तास वीज पुरवठा हवा आहे. याहून अधिक आम्हाला काहीही नको. आरक्षण मिळाल्यानंतर मराठे व धनगर मोठे होतील. दाजी आता हातात रुमणे घेऊन उभा आहे. सरकार देत असलेले 1500 रुपये हे देवेंद्र फडणवीस स्वतःचे शेत विकून देत आहेत का. आरक्षण दिले की राजकीय बोलणे बंद होईल. आता फडणवीसांनी कितीही नरेटिव्ह पसरवले तरी काहीही फरक पडणार नाही, असेही मनोज जरांगे यावेळी बोलताना म्हणाले.