एमआयटी डब्ल्यूपीयूमध्ये ‘राइड २४ ’ संपन्न
संशोधन, नावीन्य, डिझाइन आणि उद्योजकता यावर आधारित स्टार्टअप्स ची मांदियाळी
पुणे, २४ ऑगस्ट ः ‘हवामान बदलाचा अनुभव जागतिक पातळीवर सर्वच ठिकाणी स्पष्ट दिसत आहे. महापूर, चक्रीवादळ, अतिवृष्टी, दुष्काळ, दरडी कोसळणे, भूस्खलन, हिमनद्यांचे वितळणे…अशा अनेक नैसर्गिक आपत्तींचा सामना वारंवार करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर, देशाचे भवितव्य घडविणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपत्ती निवारणासह आपत्ती व्यवस्थापन यावर लक्ष केंद्रित करावे. संशोधन, नवकल्पना, डिझाईन आणि उद्योजकीय मानसिकता घडवताना डिझास्टर मॅनेजमेंट क्षेत्रात भरीव योगदान द्यावे’, असे आवाहन केंद्रीय गृह मंत्रालयाच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझास्टर मॅनेजमेंटचे प्रकल्प संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता यांनी केले. ‘स्वतःची प्रगती साधताना, सामाजिक दायित्वाचे भान ठेवावे आणि देशाला शाश्वत विकासाच्या दिशेने न्यावे’, असेही ते म्हणाले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या इनोव्हेशन हबच्या २० ते २४ ऑगस्ट दरम्यान कोथरूड येथील एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या स्वामी विवेकानंद सभामंडपात आयोजित पाच दिवसीय राइड इनोव्हेशन कॉन्क्लेव्ह २०२४ च्या समारोप प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
यावेळी एमआयटी डब्ल्यूपीयूचे संस्थापक अध्यक्ष प्रो.डॉ. विश्वनाथ दा. कराड, तसेच डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमात एमआयटी डब्ल्यूपीयूच्या स्कूल ऑफ हेल्थ सायन्सेस अँड टेक्नॉलॉजीचे अधिष्ठाता प्रा. डॉ. नीरज महिंद्रू, एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डाॅ. आर.एम.चिटणीस, सीएओ, डाॅ. संजय कामतेकर व अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठाता डाॅ. दिनेश सेठ उपस्थित होते. या परिषदेत शेकडो विद्यार्थी, शंभराहून अधिक स्टार्टअप्स आणि भांडवल उदयोगातील पन्नासहून अधिक तज्ञांचा समावेश होता.
स्टार्टअप एक्स्पो अवाॅर्डचे वितरणही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. अमोघ कुलकर्णी यांच्या (द कपडा प्रोजेक्ट) आणि निशांत (आयरिन एआय़) या प्रकल्पांना प्रत्येकी ३० लाख रुपयांचा निधी तसेच गौरी कवी (स्वरधारा प्रोजेक्ट) यांना २० लाख रुपयांचा निधी प्रदान करण्यात आला.
डॉ. अनिल गुप्ता म्हणाले, ‘देशाचे भवितव्य तरुणाईच्या हाती आहे. हवामान बदलांचे गंभीर परिणाम सर्वत्र दिसू लागले आहेत. त्यातून नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्ती वाढत आहेत. त्यामुळे मानवी सुरक्षा तसेच जलसाठे, अन्न, हवा यांच्या सुरक्षेचे प्रश्न ऐरणीवर आले आहेत. शासकीय यंत्रणा, संस्था यांच्या जोडीने देशातील विद्यार्थ्यांनी आपल्या करिअरच्या दिशा स्वकेंद्रित न ठेवता, सामाजिक आयामाशी जोडल्या तर देश शाश्वत विकासाच्या दिशेने मार्गक्रमण करू शकेल. हवामान बदलाचे परिणाम थेट मानवी सुरक्षेशी, आरोग्याशी तसेच नैसर्गिक साधनसंपत्तीच्या स्रोतांशी संबंधित आहेत. स्रोत मर्यादित असल्याने त्यांची सुरक्षा आणि व्यवस्थापन महत्त्वाचे आहे. या पार्श्वभूमीवर, युवा विद्यार्थ्यांनी आपले संशोधन, नवकल्पना, प्रतिभा, ऊर्जा आणि उद्योजकीय मानसिकतेला काही प्रमाणात सामाजिकतेचे भान जोडणे गरजेचे आहे. मर्यादित स्रोतांतून पायाभूत सुविधांचा विकास करताना लवचिकता असणे महत्त्वाचे आहे. बेसुमार वाढणारी शहरे समस्यांची आगरे झाली आहेत. याचा विचार करून विद्यार्थ्यांनी आपल्या करिअरच्या दिशा ठरवाव्यात’, असा सल्ला त्यांनी दिला.
डॉ. संजय कामतेकर म्हणाले, ‘राईड हा तरुणाईच्या उर्जेचा उत्सव आहे. विद्यार्थ्यांनी या माध्यमातून सर्वोत्कृष्टतेकडे वाटचाल करावी आणि राष्ट्रीय विकासाला हातभार लावावा. राईडचा उद्देश संशोधन, नवकल्पना, डिझाईन आणि उद्योजकीय मानसिकता, या संकल्पनांचे बीज विद्यार्थ्यांच्या मनात रुजवण्याचा आहे’.
डॉ. आर. एम. चिटणीस म्हणाले, ‘मानवनिर्मित आपत्तीमुळे देशात आणि जगात अनेक ठिकाणी समस्यांनी उग्र रूप धारण केले आहे. त्यामुळे राईडच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपत्ती व्यवस्थापन या क्षेत्रावर संशोधन, नवकल्पना, डिझाईन आणि उद्योगनिर्मितीच्या रूपाने उपाययोजना सुचवण्याची जबाबदारी पेलली पाहिजे. रचनात्मक उपायांचे मार्ग शोधले पाहिजेत. नवकल्पनांची गरज आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात सर्वाधिक भासत आहे. विद्यार्थ्यांच्या रूपाने या क्षेत्रात परिवर्तन घडण्याची आशा आहे’.
पिंकी राजपाल म्हणाल्या, ‘विद्यार्थ्यांनी पारंपरिक शिक्षणाच्या मानसिकतेतून बाहेर पडून, नव्या करिअरच्या दिशा शोधल्या पाहिजे. पदवीधर होऊन नोकरी मिळवणे, यापेक्षा उद्योजकीय मानसिकता विकसित करून उद्योगांची निर्मिती करण्याचे काम विद्यार्थ्यांनी करावे. तसेच महिला सक्षमीकरण करण्याची दृष्टी ठेवली तर देश ही सक्षम होईल. वेगळ्या क्षेत्रातील संधींचा विचार करा, एखादे पाऊल चुकले तर निराश होऊ नका, पुन्हा नेटाने प्रयत्न करा, उत्तम मार्गदर्शकांची मदत मिळवा, त्यातून नवकल्पनां द्वारा परिवर्तन घडून येईल’.
राजलक्ष्मी राव म्हणाल्या, ‘विद्यार्थ्यांनी स्टार्टअप्स, नवे उद्योग सुरू करण्याबरोबरच ग्राहक न्यायालयाच्या प्रक्रियेची, कायद्यांची माहिती करून घेणे आवश्यक आहे. त्यांच्या नव्या संकल्पना आणि वेगळे उद्योग यांच्या उभारणीसोबत कायदेशीर तरतुदी आणि नियमावलींचे आकलन आवश्यक आहे. सर्जनशील विचारातूनच नवकल्पनांचा जन्म होत असतो. त्या कल्पना प्रत्यक्षात आणताना, त्यामध्ये सामाजिक दायित्वाचे भानही जपा, असा सल्ला त्यांनी दिला.
डॉ. दिनेश सेठ यांनी आभार मानले. डॉ. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले.