पुणे- आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून महाविकास आघाडीच्या घटक पक्षांकडून देखील आपापल्या पद्धतीने सुरू झाली आहे. यात काँग्रेसच्या वतीने विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू असल्याचे दिसून येत आहे. याचाच एक भाग म्हणून भारतीय जनता पक्षाचे राज्यातील ज्येष्ठ नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धोबीपछाड देण्यासाठी काँग्रेसच्या वतीने फडणवीस यांच्या विरोधात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना रिंगणात उतरवण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. देवेंद्र फडणवीस याच मतदारसंघातून सलग तीन वेळा विजय झाले आहेत. नागपूरमधील दक्षिण- पश्चिम हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मतदारसंघ म्हणजे संघ विचाराचा मतदार संघ मानला जातो. मात्र, याच मतदारसंघातून आता अनिल देशमुख यांच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांना थेट आव्हान देण्याची रणनीती काँग्रेसने आखली आहे.
वास्तविक 2009 मध्ये या मतदारसंघाची निर्मिती झाली होती, तेव्हापासून या मतदारसंघात काँग्रेसला आतापर्यंत एकदाही विजय मिळवता आलेला नाही. मात्र, तरी देखील अनिल देशमुख आणि देवेंद्र फडणवीस अशी लढत करण्याची काँग्रेसची तयारी असल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे. वास्तविक अनिल देशमुख हे गृहमंत्री असताना तत्कालीन पोलिस आयुक्त परमवीर सिंह यांनी त्यांच्यावर अनेक आरोप केले होते. त्यानंतर अनिल देशमुख यांना तुरुंगात देखील जावे लागले होते. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर विद्यमान गृहमंत्री विरुद्ध माजी गृहमंत्री अशी लढत नागपूर दक्षिण – पश्चिम मतदार संघात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
माजी गृहमंत्री असलेले अनिल देशमुख हे काटोल विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. याच मतदारसंघातून ते मागील पाच वेळा सलग निवडून आले आहेत. यावी देखील ते याच मतदारसंघातून निवडणुकीला सामोरे जातील, अशी चर्चा सुरू होती. मात्र, आता दक्षिण – पश्चिम नागपूर साठी त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाल्याने अनिल देशमुख नेमके कोणत्या मतदारसंघातून लढणार? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.