पुणे -महापालिकेच्या सर्व हॉस्पिटलमध्ये महिलांची गरोदरपणातील कलर डॉप्लर सोनोग्राफी चाचणी तसेच महिलांच्या स्तनाच्या कर्क रोगाची (मॅमोग्राफी) तपासणी करणेसाठी मशीन उपलब्ध करून का दिलेल्या नाहीत ? महापालिकेच्या सर्व हॉस्पिटलमध्ये महिलांच्या आरोग्याची परिपूर्ण सुविधा का नाही ?असे सवाल महापालिकेला आप ने केले आहेत.
आरोग्य प्रमुख डॉ. कल्पना बळीवंत यांना भेटून आप ने निवेदन दिले आहे यावेळी प्रशांत कांबळे, सतीश यादव, शंकर थोरात उपस्थित होते.या निवेदनात असे म्हटले आहे कि,’पुणे महापालिकेच्या अंतर्गत सर्व हॉस्पिटलमध्ये नेहरु हॉस्पिटलमध्ये गरोदर महिलांची नवव्या महिन्यात (कलर डॉपलर सोनोग्राफी) चाचणी करण्याची आवश्यकता भासल्यास त्यांना बाहेरून सदर चाचणी स्वखर्चाने करावी लागते. सर्व सुविधा व साहित्य उपकरणे उपलब्ध करणे ही पुणे महानगरपालीकेची जबाबदारी असताना गरीब पेशंटना नवव्या महिन्यात सदर चाचणी साठी बाहेर जावे लागणे ही लांच्छनास्पद गोष्ट आहे. तसेच महिलांच्या स्तनाच्या कर्करोगाची (मॅमोग्राफी) तपासणी करण्यासाठी मशीनरी पुणे मनपाकडे उपलब्ध नाही.
सदर चाचणीसाठी मशीनरी उपलब्ध का करण्यात येत नाहीत. याबाबत आपल्या. खात्यातर्फे स्पष्टीकरण देण्यात यावे. जवळजवळ दहा हजार कोटींच्या आसपास पुणे महापालिकेचे बजेट असताना सदर मशीन घेण्यात हलगर्जीपणा का करण्यात येत आहे?या सुविधा या नागरिकांना मोफत उपलब्ध करून देण्यात यावी, यासाठी तत्पर उपाय योजना करण्यात याव्या.