श्री हरिकीर्तनोत्तेजक सभा यांच्यावतीने आयोजन : महर्षी वेदव्यास यांची महापूजा आणि कीर्तन स्पर्धा पारितोषिक वितरण
पुणे : सदाशिव पेठेतील श्री हरिकीर्तनोत्तेजक सभा यांच्यावतीने महर्षी व्यास पौर्णिमा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. महर्षी नारद व व्यासांचे हे महाराष्ट्रातील पहिले मंदिर आहे. महर्षी व्यास पौर्णिमा अर्थात गुरुपौर्णिमेनिमित्त दरवर्षी विविध कार्यक्रमाचे आयोजन मंदिरात करण्यात येते. व्यास पूजन, पुरस्कार वितरण यांसह गुरुपूजन सोहळा साजरा झाला.
यावर्षी महर्षी वेदव्यास यांची महापूजा महर्षी व्यास गुरुकुलाचे कुलपती श्रीकांतचंद्र कुलकर्णी यांच्या हस्ते झाली. त्यानंतर ह. भ. प. विकास बुवा दिग्रसकर यांचे कीर्तन झाले. तसेच ह. भ. प.दर्शन बुवा वझे, समर्थभक्त ह. भ. प. प्रसाद बुवा रामदासी, ह. भ. प. मधुरा मराठे यांचे उत्सवात कीर्तन झाले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र बुवा भिडे, कार्याध्यक्षा डॉ. नंदिनी पाटील, सचिव जयश्री देशपांडे, सचिव प्रेमा कुलकर्णी, कोषध्यक्ष ऍड. मकरंद औरंगाबादकर आदी उपस्थित होते.
गुरु पौर्णिमा उत्सवानिमित्त कीर्तन स्पर्धा पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. तसेच वैदिक पुरस्कार श्रीवल्लभ कुलकर्णी, ज्येष्ठ कीर्तनकार पुरस्कार डॉ. विलासबुवा पटवर्धन, स्त्री कीर्तनकार पुरस्कार मधुरा मराठे (कल्याण), साहित्यिक पुरस्कार बबन पोतदार, प्रवचनकार पुरस्कार उल्का देशपांडे, ह. भ. प. कै. मंगलाताई विष्णू कुलकर्णी यांच्या देणगीतून मंगला विष्णु पुरस्कार सुषमा गोखले यांना देण्यात आला. शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.
रामचंद्रबुवा भिडे म्हणाले, वेद व्यास यांनी वेदांचे चार भाग केले. महाभारत भागवतापर्यंत अठरा पुराणांची रचना केली, अशा रचना भारतातच नव्हे तर जगात कुठेही झाल्या नाहीत. हेच वांग्मय मुखोद्गत असलेल्यांचा सन्मान संस्था करीत आहे. संस्थेने १३८ वर्षांचा दीर्घ कार्यकाल पूर्ण केला आहे. वैदिकाचा मेंदू आणि वाणी अलौकिक आहे हे वांग्मय सोप्या पद्धतीने मांडणाऱ्यांचा सन्मान संस्थेच्या वतीने झाला आहे.