पुणे: सर्वसामान्य माणसाने सर्वसामान्य माणसाची ताकद काय असते दाखवून दिली आहे. सत्तेत असणारे कितीही मस्तवाल झाले तरी त्यांना त्यांची जागा एका बोटाने दाखवून देऊ शकतो, हे या निवडणुकीत दिसून आले असल्याचे म्हणत उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. इंडिया आघाडीने सत्ता स्थापनेचा दावा केलाच पाहिजे, असे देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. इंडिया आघाडीच्या दिल्लीतील बैठकीसाठी मी दुपारनंतर जाणार असल्याची माहिती देखील उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.इंडिया आघाडीचा पंतप्रधान पदाचा चेहरा कोण असेल? या बद्दलच उद्याच्या बैठकीत चर्चा होणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. आमच्यापैकी कोणीही स्वतः पंतप्रधान पदासाठी इच्छुक असल्याचा मताचा नाही. केवळ देशाचे संविधान वाचायला हवे, हुकूमशाही पासून देशाला वाचवायला हवे, हीच भावना घेऊन इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्ष एकत्र आले असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. उद्याच्या बैठकीत पंतप्रधान पदाचा उमेदवार ठरवला जाईल, अशी माहिती देखील उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.
छोटे घटक पक्ष आणि इतर अपक्ष देखील इंडिया आघाडीमध्ये एकत्र येतील आणि सत्ता स्थापन करण्याचा मार्ग सुकर होईल, असा दावा देखील उद्धव ठाकरे यांनी केला आहे. इतर घटक पक्षाच्या नेत्यांशी काँग्रेस आणि आमचे इतर पक्ष बोलत असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. चंद्रबाबू नायडू यांना देखील भारतीय जनता पक्षाने कमी त्रास दिलेला नाही. त्यामुळे ते नक्की विचार करतील, असा विश्वास देखील उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.
आम्ही नरेंद्र मोदी या व्यक्तीच्या विरोधात नाही. तर त्या वृत्तीच्या विरोधात आहे. ती हुकूमशाहीची वृत्ती या देशामध्ये चालू द्यायची नाही, हे सर्व देशभक्तांनी ठरवले होते. त्यामुळेच आता नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान होऊ देणार नसल्याचा उद्धव ठाकरे यांनी पुर्नउच्चार त्यांनी केला आहे.