श्रीनगर: जम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये सोमवारी सुरक्षा दलाच्या चकमकीमध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं आहे. पुलवामा जिल्ह्यातील निहामा भागात ही चकमक सुरू होती. दहशतवाद्यांनी आधी सुरक्षा दलावर गोळीबार केला.
त्यानंतर भारतीय सुरक्षा दलाने केलेल्या प्रत्युत्तरात दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. सकाळपासून एका घरामध्ये दोन्ही दहशतवादी लपून बसले होते. त्यानंतर कारवाईदरम्यान, घराला आग देखील लागली होती. मात्र आता दोन्ही दहशवाद्यांच्या मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
सकाळच्या सुमारास काश्मीर पोलीस आणि लष्कराच्या संयुक्त पथकाने निहामामध्ये शोध मोहीम सुरू केली होती. यावेळी एका घरामध्ये लपलेल्या दहशतवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. यानंतर दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू झाला. गोळीबारानंतर दहशतवादी लपलेल्या घराने पेट घेतला होता. चकमकीत मारला गेलेला टॉप कमांडर रियाझ डार याच्या कुटुंबीयांना चकमकीच्या ठिकाणी आणण्यात आले होते, जेणेकरून तो त्यांच्या विनंतीनुसार आत्मसमर्पण करू शकेल. मात्र त्याने तसे केले नाही. त्यानंतर आता दुपारच्या सुमारास दोन्ही दहशतवादी मारले गेल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.
https://x.com/KashmirPolice/status/1797579685225971742?t=HJj5XmCE9Laf4mBb0l0f7A&s=09
जम्मू-काश्मीरमधील निहामा भागात सोमवारी दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली. यामध्ये दोन दहशतवाद्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला आणि कारवाई केली. दहशतवादी ज्या घरात अडकले होते त्या घराला आग लागली होती. त्यामुळे प्रत्येक संशयास्पद हालचालींवर सुरक्षा दलांची नजर होती. त्यानंतर आता चकमकीत लष्करचा एक कमांडर आणि त्याचा एक साथीदार मारला गेला आहे. रियाज अहमद डार असे मृत कमांडरचे नाव आहे.
रियाझ अहमद डार हा डार हा काकापोरा, सातरगुंड येथील रहिवासी होता. तो लष्कर-ए-तोयबाचा टॉप कमांडर होता आणि नऊ वर्षे सक्रिय होता. रियाझ अहमद हा अनेक वर्षांपासून सुरक्षा दलांना हवा होता. त्याच्यावर अनेक खुनात सहभागी असल्याचे आरोप होते. दक्षिण काश्मीरमधील पुलवामा येथील विशेष एनआयए न्यायालयाने रियाझ अहमद डार उर्फ पीर बाबा उर्फ खालिद याला फरार घोषित केले होते. डबल प्लस ए श्रेणीतील दहशतवादी रियाझवर सुरक्षा यंत्रणांनी आधीच १५ लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे.