उद्या ४ जून रोजी लोकसभा निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. निकालापूर्वीच सुपरस्टार कमल हासन यांनी दमदार भाषण दिल. त्यांच्या ‘इंडियन 2’ चित्रपटांच्या थीमबद्दल बोलताना ते म्हणाले की, ‘मी एक तामिळ आणि भारतीय आहे, ही माझी ओळख आहे आणि तुमचीही आहे. ही आमच्या चित्रपटाची थीम आहे. केव्हा शांत राहायचे आणि केव्हा नाही हे एका तामिळ व्यक्तीला माहीत असते. मी याबद्दल आधीही बोललो होतो आणि त्यावेळी अडचणीत सापडलो होतो, पण आता मला त्याची चिंता नाही’
कमल हासन यांनी पुढे म्हटले की, ‘इंग्रजांचे ‘फोडा आणि राज्य करा’ हे धोरण तेव्हा चाललं होतं, कारण त्यांच्याकडे एक घर होते आणि त्याठिकाणी त्यांना परतायचे होते. पण आता ते धोरण चालणार नाही. मला आश्चर्य वाटते की जे आज असे करण्याचा प्रयत्न करतात, ते यानंतर कुठे जातील? त्या लोकांनी हे लक्षात ठेवावे की असे केल्यावर त्यांना परत जाण्यासाठी जागा राहणार नाही.’
कमल हासन लवकरच ‘इंडियन 2’ सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. हा सिनेमा पुढच्या महिन्यात 12 जुलैला रिलीज होणार आहे. ‘इंडियन २’ हा चित्रपट १९९६ मध्ये रिलीज झालेल्या कमल हासनच्या ‘इंडियन’ चित्रपटाचा सिक्वेल आहे.
या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन एस शंकर यांनी केले आहे. अलीकडेच या चित्रपटाचा ऑडिओ लाँच कार्यक्रम चेन्नईत करण्यात आला. यावेळी अभिनेत्री काजल अग्रवाल, रकुल प्रीत सिंग, ब्रह्मानंदम, गुलशन ग्रोवर आणि संगीतकार अनिरुद्ध रविचंदर या कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कार्यक्रमातील कमल हासन यांचे दमदार भाषण व्हायरल होत आहे.
या भाषणात कमल हसन यांनी तामिळ व्यक्तीने देशावर राज्य करण्याची इच्छा व्यक्त केली. ते म्हणाले, ‘प्रत्येक शहर हे आपले शहर आहे. प्रत्येकजण आपला नातेवाईक आहे. आपल्या राज्यात येणाऱ्या लोकांना जीवदान देण्यासाठी आपण ओळखले जाते. बरं, तो दिवस का येऊ नये की जेव्हा तामिळ देशावर राज्य करेल? हा माझा देश आहे आणि आपण त्याच्या एकतेचे रक्षण केले पाहिजे’.