आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी शनिवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. निवडणूक आयुक्तांचा राजीनामा अशा वेळी आला आहे, जेव्हा देशात काही आठवड्यांत लोकसभेची निवडणुक होणार आहे.राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे. अरुण गोयल यांच्या राजीनाम्यामागील कारणाबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. निवडणूक आयोग लोकसभा निवडणुकीच्या तयारीत व्यस्त असताना निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आला आहे. मात्र, निवडणुकीच्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत.

दरम्यान, शुक्रवारीच निवडणूक आयोगाने केंद्रीय गृह मंत्रालय आणि रेल्वे अधिकाऱ्यांसोबत सुरक्षेबाबत बैठक घेतली होती, ज्यामध्ये देशभरात सुरक्षा जवानांच्या तैनातीबाबत चर्चा झाली होती. लोकसभा निवडणुकांव्यतिरिक्त, निवडणूक आयोगाला आंध्र प्रदेश, ओडिशा, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुका घ्यायच्या आहेत. निवडणूक आयोगाचे पथक सर्व राज्यांचा दौरा करुन निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यात व्यस्त आहे. एप्रिल-मे मध्ये देशात लोकसभा निवडणुका होऊ शकतात, असा अंदाज आहे.
अरुण गोयल हे 1985 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. 18 नोव्हेंबर 2022 रोजी त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि दुसऱ्याच दिवशी त्यांची निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती झाली होती. मात्र, त्यांची नियुक्ती वादग्रस्त ठरली. त्यांच्या नियुक्तीचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले हते. दरम्यान, सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने सरकारला विचारले होते की, ”व्हीआरएस घेण्याच्या दुसऱ्याच दिवशी अरुण गोयल यांची निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती करण्याची घाई काय होती? कायदामंत्र्यांनी निवडलेल्या नावांच्या यादीतून चार नावे निवडली. त्यानंतर ही फाईल 18 नोव्हेंबरला विचारार्थ ठेवण्यात आली आणि त्याच दिवशी ती पुढे पाठवण्यात आली होती. विशेष म्हणजे, त्याच दिवशी पंतप्रधानांनीही त्यांच्या नावाची शिफारस केली.