पुणे-खासदार सुप्रिया सुळेंचे संसदेतील काम उत्तम आहे, त्यामुळे आज मी तुमच्यासमोर बारामतीचा उमेदवार जाहीर करतो असे म्हणत शरद पवारांनी सुप्रिया सुळे यांच्या नावाची घोषणा केली आहे. आमदार संग्राम थोपटेंनी आपल्योसोबत राहावे, शरद पवार पाठिशी असल्यावर विकास काय असतो, ते मी दाखवून देईन असंही ते म्हणाले.
भोरमधील महाविकास आघाडीच्या सभेत बोलत होते.
खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी भोरमध्ये आघाडीच्या सभेचं आयोजन करण्यात आले होते. काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांनी या सभेचे नियोजन केले होते. त्यामध्ये बोलताना शरद पवारांनी आपल्या पक्षाच्या पहिल्या उमेदवाराची घोषणा केली. त्यामुळे बारामतीमध्ये आता सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी सरळ लढत होणार आहे.
माजी मंत्री अनंतराव थोपटे आणि शरद पवार यांचा गेल्या 40 वर्षांपासून राजकीय संघर्ष आहे. त्यांचा हा संघर्ष पुढच्या पीढीमध्ये म्हणजे अजित पवार आणि संग्राम थोपटेंमध्येही असल्याचं अनेकवेळा दिसून येतो. आता बदलत्या राजकीय परिस्थितीनुसार शरद पवारांनी भोरच्या सभेच्या आधी अनंतराव थोपटे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आणि हा 40 वर्षाचा संघर्ष मिटवला.
प्रचारसभेत बोलताना शरद पवार म्हणाले की, “संग्राम थोपटे यांच्या हाती तुम्ही या भागाचं नेतृत्व दिलं आहे. तुमचं जे काही दुखणं असेल ते दूर करण्याची जबाबदारी तुम्ही त्यांच्यावर टाकली आहे. आज तुम्हा सगळ्यांच्या साक्षीने सांगतो की, संग्राम थोपटे….तुम्ही जे काही या तालुक्यासाठी कराल, जिल्ह्यासाठी कराल, राज्यासाठी कराल त्यामध्ये हा शरद पवार तुमच्या पाठीशी कायम राहील. यापूर्वी आपले रस्ते वेगळे होते. मात्र इथून पुढे आता शरद पवारांचा पाठिंबा असल्यानंतर विकासाबाबत, राजकारणाबाबत काय परिवर्तन होऊ शकतं हे दाखवल्याशिवाय राहणार नाही,” अशा शब्दात शरद पवार यांनी संग्राम थोपटे यांना भविष्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं तर मोठी जबाबदारी देण्याचं आश्वासन दिलं आहे.