पुणे-कसबा पेठेमध्ये असलेल्या छोटा शेख सल्ला दर्ग्याच्या परिसरातील बेकायदा बांधकाम स्वत:हून काढून घेण्याचा निर्णय दर्ग्याच्या विश्वस्तांनी शनिवारी (ता. ९) जाहीर केला. पोलिस आयुक्तालयात शनिवारी पार पडलेल्य्या बैठकीत हा निर्णय विश्वस्तांनी घेतला.
महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, शहर अभियंता प्रशांत वाघमारे, पोलिस आयुक्त अमितेश कुमार, दर्ग्याचे विश्वस्त बैठकीस उपस्थित होते.
कसबा पेठेतील पुण्येश्वर मंदिराजवळ छोटा शेख सल्ला दर्गा परिसरातील बेकायदा बांधकामावर कारवाई केली जाणार असल्याची बातमी शुक्रवारी रात्री पसरली. त्यानंतर दर्ग्याच्या परिसरात मोठा जमाव जमला होता. परिसरात घोषणाबाजी करण्यात आल्याने तणाव निर्माण झाला. या परिसरात कायमस्वरूपी बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
छोटा शेख सल्ला दर्ग्याच्या परिसरातील नविन मस्जिद इमारतीचे विना परवाना झालेले वाढीव बांधकाम स्वतःहुन काढण्यासाठी ट्रस्टने तयारी दर्शविली आहे. आताच छोटा शेख सल्ला दर्ग्याच्या ट्रस्टींनी एक निवेदन सादर केलंय, त्यामध्ये त्यांनी त्यांचं म्हणणं मांडलं असून त्यांनी नागरिकांना दर्गा ट्रस्टला व प्रशासनाला सहकार्य करण्याची विनंती केली आहे.
या निवेदनामध्ये त्यांनी असं म्हंटलंय की,
आम्ही छोटा शेख सल्ला दर्ग्याचे ट्रस्टी आज दि. 9 मार्च 2024 रोजी आम्ही संयुक्तरित्या जाहीर प्रकटन करतो की, छोटा शेख सल्ला दर्गा येथील नविन मस्जिद मान्य नकाशा प्रमाणे जागेवर वाढीव / अनाधिकृत विट बांधकाम, दरवाजे / खिडक्या, निष्कासन अनुषंगाने आम्ही मनपा व पोलिस प्रशासनासोबत चर्चा केल्यानंतर सदर वाढीव बांधकाम काढण्यास आम्ही सहमती देत आहोत व ते मनपा आदेशाप्रमाणे आम्ही स्वतः निष्कासित करून देण्यास सदरची ट्रस्ट तयार आहे.
1. छोटा शेख सल्ला दर्गा येथील दर्ग्याच्या कोणत्याही स्ट्रक्चरला कारवाई दरम्यान हानी अथवा इजा पोहचणार नाही तसेच सन 1927 साली गॅझेट झालेल्या जुन्या मशिदीला कोणतीही इजा पोहचणार नाही.
2. दि. 30 मार्च 2019 रोजी मनपाने वर्क स्टॉप नोटीस दिल्यानंतर त्या परिसरातील नविन मस्जिद इमारतीचे विना परवाना झालेले वाढीव बांधकाम फक्त निष्कासित करण्यात येईल.
3. भविष्यात सदरची न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान ट्रस्टच्या बाजुने न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे आता झालेल्या क्षतीची पुर्ती प्रशासन करेल.
4. सदर बांधकाम परवानगीकरिता भविष्यामध्ये जे अर्ज प्राप्त होतील त्यावर नियमानुसार प्रशासनामार्फत सकारात्मक विचार करून कायदेशिर निर्णय घेण्यात येतील.
5. जर ट्रस्टी यांनी विनंती केली तर कायदेशिर अस्तित्वात असलेल्या स्ट्रक्चरचे नुतनीकरणाकरिता सीएसआर मार्फत मनपा प्रशासन सर्वतोपरी मदत करेल.
सर्व नागरिकांना विनंती आहे की, दर्गा ट्रस्ट व प्रशासनाला आपण सर्व मिळुन सहकार्य करूया.
आम्ही सामंजस्याची भूमिका घेतली आहे मात्र आम्हाला ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला तर हिंदू काय हे देखील दाखवून देऊ, अशी स्पष्ट भूमिका महाराष्ट्र निर्माण सेनेचे पुणे येथील सरचिटणीस अजय शिंदे यांनी जाहीर करत या वादात उडी घेतली होती .
पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सर्व सुट्ट्या रद्द
दरम्यान पुणे शहरांमध्ये या प्रकरणामुळे तणाव निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात होती . या सर्व पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सर्व सुट्ट्या रद्द करण्यात आल्या . या परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आणि सर्वांना शांत राहण्याचे आवाहन पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी केले .
या सर्व पार्श्वभूमीवर ट्रस्ट ने घेतलेली भूमिका स्वागतार्ह आणि समंजस व शांततापूर्ण वातावरणासाठी पूरक अशी मानली जाते आहे.
नूतनीकरणाला मदत करणार – महानगरपालिका
न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार प्रशासन काम करेल. बांधकामाच्या परवानगीबाबत अर्ज आल्यानंतर नियमानुसार प्रशासनाकडून सकारात्मक विचार करण्यात येईल. विश्वस्तांनी विनंती केल्यास कायदेशीर अस्तित्वात असलेल्या बांधकामाच्या नूतनीकरणासाठी सामाजिक दायित्व निधीतून (सीएसआर) महापालिका प्रशासन सर्वपोतरी मदत करेल, असे महापालिका अधिकाऱ्यांनी बैठकीत सांगितले.
सात जेसीबी आणि २० डंपर तैनात -महापालिका तयारीतच होती
दर्ग्याच्या परिसरात अनधिकृत बांधकाम काढून घेण्यासाठी महानगरपालिकेने ट्रस्टला २२ फेब्रुवारीला नोटीस बजावली होती. अतिक्रमण काढण्यासाठी सात दिवसांनी मुदत देण्यात आली होती. मात्र मुदतीत अतिक्रमण न काढल्याने महापालिकेने कारवार्इची तयार सुरू केली. त्यासाठी सात जेसीबी व सुमारे २० डंपरची व्यवस्था टिळक पुलाजवळ करून ठेवण्यात आली होती. गेल्या चार दिवसांपासून महानगरपालिकेत गोपनीय पद्धतीने याचे नियोजन सुरू होते. याबाबत कुठेही वाच्यता न करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.