पुणे- कोंढवा येथील लुल्लानगर परिसरात एका रूफ टॉप हॉटेलमधील हुक्का पालर्रवर पोलिसांनी छापा टाकून हुक्का फ्लेवर, विदेशी दारूसह मुद्देमाल जप्त केला. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने ही बुधवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास ही कारवाई केलीया प्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात हॉटेलमालकासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हॉटेलमालक राहुल जैन (रा. वानवडी) आणि मयूर अर्जुन दातखिळे (वय २९, रा. बिबवेवाडी) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक भरत जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, लुल्लानगर येथील व्हेजिटा फाइन डाइन हॉटेलच्या रूफ टॉपवर हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी रात्री दहाच्या सुमारास हुक्का पालर्रवर छापा टाकला. तंबाखूजन्य हुक्का फ्लेवर, विदेशी दारू आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.
गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे आणि पोलिस निरीक्षक भरत जाधव यांच्या सूचनेनुसार सहायक पोलिस निरीक्षक राजेश माळेगावे, पोलिस हवालदार अजय राणे, तुषार धिवरकर, सागर केकाण, अमेय रसाळ, अमित जमदाडे, हणमंत कांबळे, किशोर भुजबळ यांच्या पथकाने ही कारवाई केली.