पुणे- पोलीस आयुक्तालयात गुन्हेगारांच्या परेड घेणाऱ्या नूतन पोलीस आयुक्तांना आता शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी ,’साहेब राजकीय दंडेलशाहीचा बंदोबस्त करा’ असे साकडे घातले आहे .निर्भय बनो ची सभा उधळून लावण्याची भाजपा शहर अध्यक्ष घाटे यांनी धमकी दिली आहे असे नमूद करून त्यांनी हि मागणी केली आहे. आयुक्त साहेब योग्य कारवाई करा अन्यथा …कोणी अंगावर आले तर त्यांना शिंगावर घेण्याची धमक शिवसैनिकांमधे आहे असा इशारा शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे यांनी दिला आहे.
या संदर्भात कॉंग्रेसचे उपाध्यक्ष अजित दरेकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे कि,’‘निर्भय बनो’ ची उद्या शुक्रवार दि. ९/२/२०२४ रोजी होणारी सभा ही गुंडशाही व झुंडशाहीच्या विरोधात घेतली आहे. परंतु आत्ताच काही वेळेपूर्वी भारतीय जनता पार्टीचे अतिशय संस्कारी अध्यक्ष धीरज घाटे यांनी ही सभा उधळवून लावायची धमकी दिली आहे आणि तसे त्यांनी तेथील पोलीस स्टेशनला निवेदनही दिले आहे. खरे तर आता नविन पोलीस आयुक्त अमितेश कुमार हे आले आहेत आणि ते कायदा व सुव्यवस्था या बाबत अतिशय दक्ष आहेत. त्यांनी पुण्यातील गावगुंड ते मोठे गुंड सगळ्यांची परेड पोलीस आयुक्तालय येथे काढली होती. त्यामुळे या धर्मांध गुंडाचा बंदोबस्त पोलीस आयुक्त निश्चित करतीलच परंतु या सभेसाठी इंडिया आघाडीमधील सर्व घटक पक्ष व महाविकास आघाडी हे तेथे लोकशाही वाचविण्यासाठी आणि ‘निर्भय बनो’ सभा ही व्यवस्थित पणे पार पाडण्यासाठी संरक्षण देण्याचे काम करणार आहेत.
खरे तर संविधानाने आपल्याला आपले मत मांडण्याचा अधिकार, भाषणाचा अधिकार दिलेला आहे. असे असतानाही काही संविधान विरोधी लोक गुंडशाही व झुंडशाहीच्या माध्यमातून पुण्यातील वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करीत आहेत तो प्रयत्न आम्ही कदापीही यशस्वी होवू देणार नाही. लोकशाही ही असल्या धमक्यांना घाबरता नाही. उद्याची सभा ही यशस्वीरित्या पार पडेल याची आम्ही पूर्ण तयारी केली आहे. अशी माहिती पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी या पत्रकाद्वारे दिली आहे.
आयुक्त साहेब योग्य कारवाई करा अन्यथा …कोणी अंगावर आले तर त्यांना शिंगावर घेण्याची धमक शिवसैनिकांमधे आहे – शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे
संविधानाच्या व लोकशाहीच्या रक्षणासाठी “निर्भय बनो” सभा उद्या शुक्रवार दि ९ फेब्रुवारी २०२४ रोजी सायं ५ वा निळू फुले सभागृह, साने गुरूजी स्मारक, दांडेकर पूल, पुणे येथे आयोजित करण्यात आली असून या सभेस निखिल वागळे, असिम सरोदे, विश्वंभर चौधरी, अमोल पालेकर हे वक्ते मार्गदर्शन करणार आहेत.
या सभेच्या माध्यमातून देशात चाललेला अनादर, सरकारी संस्था व यंत्रणांचा गैरवापर, झुंडशाही – गुंडशाही – भ्रष्टाचार यावर संबोधन होणार आहे. राष्ट्रीय पक्ष भाजपची या सभेतून सत्यवचनामुळे चिरफाड होण्याची शक्यता आहे. याचा भारतीय जनता पार्टीला त्रास होणार असे त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या वक्तव्यावरून दिसून येते. भाजप या सभेला विरोध करीत आहे. इंडिया फ्रंट व महाविकास आघाडीच्या वतीने पोलीस आयुक्तांना सभेच्या संरक्षणासाठी विनंती पत्र दिले आहे. परंतू सत्ताधारी भाजप कुठल्याही थराला जाउ शकते. म्हणून शिवसेनेच्या वतीने या सर्व वक्त्यांना आणि सभा यशस्वी होण्यासाठी संपूर्ण संरक्षण देणार आहोत. त्यांच्या केसालाही धक्का लागू न देण्याची जबाबदारी शिवसेनेने स्वीकारली आहे. कोणी अंगावर आले तर त्यांना शिंगावर घेण्याची धमक शिवसैनिकांमधे आहे. कोणी सभेला विरोध केला आणि यामधून कायदा सुव्यवस्था बिघडली तर हि संपूर्ण जबाबदारी विरोध करणाऱ्यांची राहिल.
संजय मोरे
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे
पुणे शहरप्रमुख