संचालक धनंजय औंढेकर यांची गणेशाम वीज उपकेंद्राला सदिच्छा भेट
पुणे, : दिवाळी आणि भाऊबीजेच्या सणानिमित्त महावितरणचे संचालक (संचालन) धनंजय औंढेकर यांनी पिंपरी विभागातील गणेशाम वीज उपकेंद्राला सदिच्छा भेट देऊन तेथील वीज कर्मचाऱ्यांसोबत दिवाळी साजरी केली. यावेळी त्यांनी सणासुदीच्या काळातही अखंडित वीजपुरवठ्यासाठी कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांचे कौतुक करून त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. तसेच कर्मचाऱ्यांना दैनंदिन कामकाजात येणाऱ्या अडचणी जाणून घेत त्यांच्याशी संवाद साधला.
वीजबिलांची शंभर टक्के वसुली, वीजगळती कमी करणे आणि ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा करणे यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर श्री. औंढेकर यांनी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. वीज यंत्रणेतील बिघाड, त्यावरील उपाययोजना आणि स्थानिक परिस्थितीची अचूक माहिती लाइनमनला असते. त्यामुळे त्याने ठरवले आणि जबाबदारीने काम केले, तर महावितरणच्या कार्यपद्धतीत सकारात्मक बदल घडवून आणण्याची क्षमता त्याच्यात आहे, असे त्यांनी नमूद केले.
उपकेंद्रातील कार्यक्रमात श्री. औंढेकर यांनी उपस्थित लाइनमन आणि यंत्रचालकांना (ऑपरेटर) दिवाळी व भाऊबीजेच्या शुभेच्छा दिल्या. दिवाळीच्या सणात सर्वत्र आनंदाचे वातावरण असताना नागरिकांचा वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणचे कर्मचारी अहोरात्र कार्यरत असतात. सणाच्या दिवशीही कुटुंबीयांपासून दूर राहून जनतेच्या सेवेला प्राधान्य देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या समर्पित कार्याचा त्यांनी गौरव केला. या कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे आणि त्यांच्याशी आपुलकीचा संवाद साधणे, हा या भेटीमागील उद्देश होता.
या सदिच्छा भेटीमुळे वरिष्ठ अधिकारी आणि प्रत्यक्ष क्षेत्रात काम करणारे कर्मचारी यांच्यातील संवाद व स्नेहबंध अधिक दृढ झाले. यावेळी अतिरिक्त कार्यकारी अभियंता ज्ञानदेव तरंगे यांचेसह वीज कर्मचारी उपस्थित होते.

