‘निर्भय बनो’सभेपूर्वी अटक होणार काय ? सभेला वागळे संबोधित करणार काय ? अशा प्रश्नांबाबत चर्चा ..
पुणे : भारतरत्न व भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी दंगेखोर अशा अत्यंत आक्षेपार्ह व अपमानास्पद शब्दाने ट्वीट केल्याप्रकरणी पत्रकार निखिल वागळे यांच्याविरुद्ध विश्रामबाग पोलिसांनी भादवि १५३, ५०५ ,५०० अन्वये आज गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत भाजपचे नेते सुनिल देवधर (वय ५८, रा. नारायण पेठ) यांनी 4 दिवसांपूर्वी पोलिसात तक्रार अर्ज दिला होता त्यानुसार आज फिर्याद (गु. रजि. नं. २६/२४) दाखल केली असून सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग वाघमारे अधिक तपास करत आहेत . पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती दौपदी मुर्मु यांनी माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना भारत रत्न दिल्याबद्दल सोशल मीडियावर संदेश देऊन अभिनंदन केले होते. त्यावर ट्वीट करताना पत्रकार निखिल वागळे यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यामुळे अडवाणी यांना मानणार्या असंख्य कार्यकर्त्यांच्या भावना दुखावून समाजात एकोपा राहण्यास बाधा निर्माण केली. तसेच सार्वजनिक शांतता धोक्यात आणणारी पोस्ट जाणिवपूर्वक प्रसारित करुन त्यांची जनमानसातील प्रतिमा मलिन करण्याकरीता बदनामी करुन अवहेलना केली, असे फिर्यादीत नमूद केले आहे.