केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या प्रयत्नांनी १५ लाख वाहनधारकांचा प्रश्न मार्गी!
पुणे-राज्यातील रिक्षा, टॅक्सी, स्कूलबस आणि टेम्पो चालकांसमोर ‘एटीएस’ (ऑटोमॅटिक टेस्टिंग स्टेशन) प्रणालीमुळे निर्माण झालेला वाहन फिटनेस तपासणीचा गंभीर पेच अखेर सुटला आहे. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने वाहन नूतनीकरण प्रक्रियेला ऑक्टोबर २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. मंत्री मोहोळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे हे यश मिळाले आहे.
रस्ते सुरक्षा अधिक कडक करण्यासाठी केंद्र सरकारने व्यावसायिक वाहनांच्या फिटनेस तपासणीसाठी ‘एटीएस’ प्रणाली अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, महाराष्ट्रातील अनेक आरटीओ क्षेत्रांमध्ये ही यंत्रणा अद्याप पूर्णतः सक्षम झालेली नाही. या तांत्रिक बदलामुळे राज्यातील ११ प्रमुख आरटीओ क्षेत्रांतील सुमारे १५ लाख व्यावसायिक वाहनांचे नूतनीकरण पूर्णपणे बंद झाले होते. यामुळे हातावर पोट असणाऱ्या रिक्षाचालकांपासून ते मालवाहतूकदारांपर्यंत सर्वांसमोर उदरनिर्वाहाचे संकट उभे राहिले होते.
महाराष्ट्रातील ११ आरटीओ क्षेत्रांमध्ये एटीएस प्रणाली सक्तीची केल्यामुळे तांत्रिक अडचणी निर्माण होऊन वाहन पासिंग प्रक्रिया ठप्प झाली होती. यामुळे राज्यातील सुमारे १५ लाख व्यावसायिक वाहनधारकांचे मोठे नुकसान होत होते. ही बाब मंत्री मोहोळ यांनी गांभीर्याने घेत तात्काळ वरिष्ठ स्तरावर चर्चा केली आणि ही जाचक अट तूर्तास शिथिल करण्यास यश मिळवले.
“राज्यातील रिक्षाचालक आणि लहान वाहतूकदार हा समाजाचा कणा आहे. ‘एटीएस’ प्रणालीतील तांत्रिक त्रुटींमुळे त्यांच्या रोजगारावर गदा येत असल्याचे माझ्या निदर्शनास आले होते. सामान्य कष्टकऱ्यांचे नुकसान होऊ नये, ही आमची प्राथमिकता होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने आम्ही हा विषय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मांडला. त्यांनी तत्काळ सकारात्मक प्रतिसाद देत ही मुदतवाढ दिली आहे. हा निर्णय राज्यातील १५ लाख कुटुंबांना आधार देणारा ठरेल.”
– मुरलीधर मोहोळ, केंद्रीय राज्यमंत्री
एटीएसच्या तांत्रिक गोंधळामुळे आमचा धंदा पूर्णपणे बसला होता. पण मुरलीधर मोहोळ यांनी आमचे दुःख जाणून घेतले आणि थेट केंद्रातून आम्हाला न्याय मिळवून दिला. ही मुदतवाढ केवळ कागदावर नाही, तर आमच्या चुली पेटवत ठेवण्याचा मार्ग आहे. सामान्यांचे प्रश्न सुटण्यासाठी असाच ‘लोकप्रतिनिधी’ हवा!” आमच्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार आणि सर्व वाहन चालकांनी आपल्या वाहनांचे वेळेत पासिंग करून घ्यावे.
बापू भावे, रिक्षा फेडरेशनचे नेते

