आखाती देश इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे जागतिक स्तरावर इंधन पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून, त्याचे थेट परिणाम आता महाराष्ट्रातील सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरापर्यंत पोहोचल्याचे चित्र आहे. राज्यात घरगुती एलपीजी (LPG), व्यावसायिक गॅस आणि सीएनजीचा (CNG) तुटवडा निर्माण झाला असून, सिलेंडरसाठी ग्राहकांना आता अनेक दिवस प्रतीक्षा करावी लागत आहे. या पार्श्वभूमीवर व्यावसायिक गॅस पुरवठा बंद झाल्याच्या अफवा सोशल मीडियावर पसरल्या आहेत, मात्र राज्य सरकारने या अफवांचे खंडन करत वस्तुस्थिती स्पष्ट केली आहे.
राज्याच्या माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाने (DGIPR) दिलेल्या माहितीनुसार, व्यावसायिक एलपीजी पुरवठा पूर्णपणे बंद करण्यात आल्याचा दावा दिशाभूल करणारा आहे. केंद्र सरकारने सध्याच्या भू-राजकीय परिस्थितीचा विचार करून सर्व राज्यांना ‘घरगुती एलपीजी’ पुरवठ्याला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर व्यावसायिक एलपीजी पुरवठ्यासंदर्भातील प्राधान्यक्रमात तात्पुरता बदल होऊ शकतो. मात्र, व्यावसायिक एलपीजी पुरवठा पूर्णपणे बंद करण्यात आल्याचा दावा दिशाभूल करणारा आहे.
या इंधन टंचाईचा सर्वाधिक फटका हॉटेल व्यवसायाला बसला आहे. व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा विस्कळीत झाल्याने आणि दरात अचानक १५० ते २०० रुपयांची वाढ झाल्याने हॉटेल मालकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. अनेक ठिकाणी गॅस साठा संपत आल्याने हॉटेल्स बंद ठेवण्याची वेळ येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हॉटेल असोसिएशनने सरकारकडे तातडीने हस्तक्षेप करून पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे.
एरवी बुकिंगनंतर २४ तासांत मिळणारा सिलेंडर आता ३ ते ५ दिवसांनंतर मिळत असल्याची माहिती आहे. पुरवठ्यातील तुटवड्यामुळे गॅस वितरकांवरही मोठा ताण आला असून, ग्रामीण भागात ही समस्या अधिक तीव्र होताना दिसत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने आगामी काळात महागाई आणखी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
सोशल मीडियावरून पसरवल्या जाणाऱ्या चुकीच्या माहितीमुळे नागरिकांमध्ये घबराट निर्माण होत आहे. “पुरवठा साखळीवर ताण असला तरी सरकार परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. नागरिकांनी सिलेंडरचा अनावश्यक साठा करू नये आणि अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा,” असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

