‘किक’च्या अनुभवाने विद्यार्थी भारावले
राउंड टेबल इंडिया’, ‘हॉटफिट’ व ‘रोटरी’तर्फे फुटबॉल प्रशिक्षण व स्पर्धा
पुणे : पायात सॉक्स-बूट… अंगावर शॉर्ट्स आणि टी-शर्टस… सहकाऱ्यांचे चिअर्स… मारलेली ‘किक’… आणि झालेला निर्णायक ‘गोल’… अशा उत्साही वातावरणात पहिल्यांदाच ‘फ्लड लाईट’च्या प्रकाशात खेळण्याचा अनुभव घेताना हे विद्यार्थी भारावून गेले. साखळी, उपांत्य आणि अंतिम फेरीत फुटबॉलचा थरार या विद्यार्थ्यांनी अनुभवला.
निमित्त होते, राउंड टेबल इंडिया पुणे चॅप्टर १५, हॉटफिट फाउंडेशन आणि रोटरी क्लब रिव्हरसाईड यांच्या संयुक्त विद्यमाने वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित फुटबॉल स्पर्धेचे. ‘२०० ड्रीम्स १ गोल’ हे ध्येय घेऊन हडपसर भागातील साने गुरुजी ट्रस्टच्या प्रगती विद्यालय, आदर्श विद्यालय, नूतन विद्यालय, समता विद्यालय या शाळांतील २०० विद्यार्थ्यांना अडीच महिन्याचे फुटबॉलचे प्रशिक्षण देऊन १२ व १४ वर्षाखालील गटांच्या स्पर्धा घेण्यात आल्या. प्रत्येकी १० संघ तयार करण्यात आले होते. या स्पर्धेत चमकदार कामगिरी केलेल्या १२ व १४ वर्षाखालील गटातील प्रत्येकी आठ विद्यार्थ्यांना हॉटफिट फाउंडेशन आयोजित फुटबॉल पुणे लीगमध्ये खेळण्याची संधी मिळणार आहे. १२ वर्षाखालील गटात ‘आदर्श विद्यामंदिर १२०’ या संघाने, तर १४ वर्षाखालील गटात ‘प्रगती विद्यालय १२१’ या गटाने विजेतेपद पटकावले.
या स्पर्धेच्या बक्षीस वितरणावेळी ‘राउंड टेबल इंडिया एरिया १५’चे चेअरमन दर्शन काबरा, ‘पूना चॅप्टर १५’चे चेअरमन प्रोमित सूद, हॉटफिट फाउंडेशनचे गुरुपवीत सिंग, रोटरी क्लब रिव्हरसाईडचे अध्यक्ष आदित्य मिश्रा, सचिव कमलेश मिश्रा, राउंड टेबल पुणे-१५चे देवेश जाटिया, कीर्ती रुईया, अभिषेक मालपाणी यांच्यासह सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रोमित सूद म्हणाले, “एकूण सहा शाळांमधून ९०० पैकी २०० विद्यार्थ्यांची निवड करून अडीच महिने त्यांना तज्ज्ञ प्रशिक्षकाकडून फुटबॉलचे प्रशिक्षण देण्यात आले. त्याचबरोबर त्यांना फुटबॉलचे संपूर्ण कीट, प्रशिक्षणाचे प्रशस्तिपत्रक, पदक आणि सन्मानचिन्ह देण्यात आले आहे. यातील १६ खेळाडूंना पुणे लीगमध्ये खेळण्यासाठी प्रोत्साहित केले जाणार आहे. वंचित वर्गातील विद्यार्थ्यांना फुटबॉलसारख्या खेळासाठी तयार करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम अतिशय महत्वाचा ठरेल.”