Home Blog Page 9

पुण्यामध्ये भोंदूबाबाने महिलेचा अमानुष छळ करत मूत्र पाजले:भोंदूला अटक, मारहाण करत विजेचे शॉकही दिले

पुणे-ईश्वराचा अवतार असल्याचे सांगत एका उच्चशिक्षित महिलेवर भोंदूबाबाने लैंगिक अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे. महिलेचा अमानुष छळ करत तिला स्वत:चे मूत्र पाजले. अनेकदा मारहाण करत विजेचा शॉक दिल्याचे समोर आले आहे.

राधामोहन मिश्रा (५९, रा. माउली सदन, गट नं. १३४४/७, रेणुका पार्क, आरव ॲम्बियसजवळ, उबाळेनगर, पुणे) असे या भोंदूचे नाव आहे. तर त्याचा साथीदार स्वामी कंवल नयन (५८) या दोघांसह अन्य सहा महिलांविरोधात खराडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली. महिला उच्चशिक्षित असून येथील एका खासगी कंपनीत नोकरी करते.

तिचे आई-वडील डॉक्टर आहेत. स्वामी कंवल नयन याच्या आश्रमात एकदा महिलेचे वडील गेले होते. कंवलच्या माध्यमातून तरुणीच्या कुटुंबीयांची भोंदूबाबा मिश्राशी ओळख झाली. त्या वेळी मिश्राचा आश्रम पंचकुला येथे होता. त्याचे नाव गुरुदेव साधना धाम ट्रस्ट असे होते. पुढे महिलेचे कुटुंबीय भोंदूच्या जाळ्यात अडकले. भोंदूने महिलेवर गेल्या काही वर्षांत अनेकदा अत्याचार केले. दरम्यान, आरोपींना २० जूनपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली.

वृद्धाश्रम आणि वंध्यत्वाच्या वाढत्या समस्यांवर उपाययोजनांचा ना. पाटील यांचा संकल्प

पुणे-

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कोथरुड मधील सखी-सुखदा वूमन वेल्फेअर फाऊंडेशनच्या वतीने आयोजित आनंद मेळावा उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना वृद्धाश्रम आणि वंध्यत्वाच्या वाढत्या समस्यांवर उपाययोजना करण्यासंदर्भात ना. पाटील संकल्प व्यक्त केला.

सखी-सुखदा वेल्फेअर फाऊंडेशनच्या माध्यमातून वस्ती भागातील ९०० गरोदर मातांना सुरक्षित प्रसूतीसाठी सहाय्य करण्यात आले. यानिमित्ताने फाऊंडेशनच्या वतीने आनंदोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने १८०० बालकांचे आधारकार्ड आणि सुकन्या समृद्धी योजनेचे कार्ड वितरित करण्यात आले. त्यासोबतच पाच चिमुकल्यांना लकी ड्रॉच्या माध्यमातून विशेष बक्षीस देण्यात आले.

या कार्यक्रमाला सखी-सुखदा वुमन वेल्फेअर फाऊंडेशनच्या संचालिका स्मीता पाटील, ॲड. तनिषा पाटील, उद्योजक ललीत कुमार जैन, झोपडपट्टी पुनर्वसन विभागाचे सतिश फडके, फाऊंडेशनच्या सुरेखा जगताप, धनश्री चितळे यांच्यासह सखी-सुखदा वुमन वेल्फेअर फाऊंडेशनच्या सर्व सदस्या आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

या कार्यक्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना ना. पाटील म्हणाले की, स्मीता पाटील यांच्या खंबीर नेतृत्वामुळे सखी-सुखदा हा प्रकल्प यशस्वी झाला असून; सखी-सुखदाच्या वतीने आयोजित आनंद मेळावा म्हणजे आनंदी कोथरुडच्या वचनपूर्तीतील एक भावनिक क्षण आहे. या उपक्रमांतर्गत वस्ती भागातील अनेक गरोदर मातांचे बाळंतपण करण्याची संधी मिळाली.

ते पुढे म्हणाले की, सध्या समाजात वृद्धाश्रमांची वाढती संख्या आणि वंध्यत्वाची समस्या ही गंभीर सामाजिक चिंता बनली आहे. त्यामुळे वृद्धाश्रमासारख्या संकल्पना मोडीत काढण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढाकार घेऊन, एखाद्या वयोवृद्ध दाम्पत्य किंवा एकल महिलांचे पालकत्व स्विकारावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

वंध्यत्व हा देखील चिंतेचा विषय झाला असून कोल्हापूर मधील हितैषी प्रमाणे, वंध्यत्व निवारणासाठी समुपदेशन आणि दत्तक प्रक्रिया आणि फॉस्टर केअर प्रक्रियेसाठी सखी-सुखदा अंतर्गत नवीन सेंटर कार्यान्वित करण्याचे यावेळी त्यांनी घोषित केले. तसेच, आगामी काळात सखी-सुखदा उपक्रमामधून नवजात बालकांची श्रवण क्षमता तपासण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी घोषित केले.

कार्यक्रमाला उपस्थित उद्योजक ललीत जैन आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे सतीश फडके यांनी या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सखी-सुखदा वूमन वेल्फेअर फाऊंडेशनच्या स्मीता पाटील यांनी केले.

सखी-सुखदाला कायमस्वरूपी कार्यालयाची भेट

सखी-सुखदा वूमन वेल्फेअर फाऊंडेशनच्या सामाजिक कार्याची दखल घेत उद्योजक ललीत जैन यांनी संस्थेला कार्यालयासाठीची जागा कायमस्वरूपी उपलब्ध करून देण्याची घोषणा केली. या निर्णयामुळे संस्थेच्या आगामी उपक्रमांना मोठे बळ मिळणार असून; सखी-सुखदाच्या कार्याला अधिक स्थैर्य प्राप्त होणार आहे.

पुणे-साईनगर शिर्डी एक्सप्रेसचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून शुभारंभ

मुंबई, दि. १७ :- पुणे-साईनगर शिर्डी एक्स्प्रेसला आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतून ऑनलाईन पद्धतीने उपस्थित राहत तर केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पुण्यातून झेंडा दाखवून शुभारंभ केला.

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमास विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे उपस्थित होते.पुणे रेल्वे स्थानक येथे केंद्रीय उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे, आमदार विवेक कोल्हे आदी उपस्थित होते.

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, पुणे रेल्वे परिसराची क्षमता वाढविण्यासाठी हडपसर, शिवाजीनगर, खडकी, उरुळी आणि आळंदी परिसरातील विविध रेल्वे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. पुणे जंक्शनचे आधुनिकीकरण, अतिरिक्त प्लॅटफॉर्म उभारणी, आकुर्डी येथे मेगा कोचिंग टर्मिनल; तसेच अत्याधुनिक डिजिटल सिग्नलिंग व्यवस्था यामुळे पुढील तीन ते साडेतीन वर्षांत पुणे रेल्वेची क्षमता दुप्पट होईल आणि सुमारे 20 अतिरिक्त गाड्या चालविणे शक्य होणार आहे.

मुंबई–पुणे मार्गावरील तिसरी व चौथी रेल्वे लाईन; तसेच भविष्यातील मुंबई–पुणे आणि पुणे–हैदराबाद बुलेट ट्रेन हे प्रकल्प महाराष्ट्रासाठी मोठी आर्थिक ताकद निर्माण करतील. महाराष्ट्रासाठी रेल्वे अर्थसंकल्पात सुमारे 23,900 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. राज्यातील 129 स्थानकांचे पुनर्विकास काम सुरू असून त्यापैकी 93 स्थानकांची कामे पूर्ण झाली आहेत. राज्यात सध्या 24 वंदे भारत सेवा सुरू असून भविष्यात वंदे भारत स्लीपर गाड्यांसह आणखी अनेक आधुनिक रेल्वे सेवा उपलब्ध होणार असल्याचे वैष्णव यांनी सांगितले.

पुणे हे राज्यातील प्रमुख शैक्षणिक, माहिती तंत्रज्ञान आणि औद्योगिक केंद्र असून देशभरातील विद्यार्थी, व्यावसायिक आणि उद्योजकांचे आकर्षण केंद्र आहे. दुसरीकडे, श्री साईबाबांचे पवित्र स्थान म्हणून ओळखले जाणारे शिर्डी हे देशातील प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे. दररोज लाखो भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. नव्या रेल्वेसेवेमुळे पुणे आणि परिसरातील भाविकांना अधिक सुरक्षित, परवडणारा आणि आरामदायी प्रवासाचा पर्याय उपलब्ध होणार आहे.विशेषतः ज्येष्ठ नागरिक, कुटुंबे आणि समूहाने प्रवास करणाऱ्या भक्तांसाठी ही सेवा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. तसेच अहिल्यानगर आणि शिर्डी परिसरातील नागरिकांना पुण्यातील उच्च शिक्षण आणि वैद्यकीय सुविधांपर्यंत पोहोचणे अधिक सोपे होईल. याशिवाय शिर्डीतील हॉटेल व्यवसाय, वाहतूक सेवा आणि स्थानिक विक्रेत्यांनाही या रेल्वेसेवेचा लाभ मिळून स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे.

पुणे–साईनगर शिर्डी एक्सप्रेसला दौंड कॉर्ड केबिन, श्रीगोंदा, अहिल्यानगर, राहुरी आणि बेलापूर या महत्त्वाच्या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. त्यामुळे या भागातील विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी, नोकरदार वर्ग आणि संशोधकांच्या प्रवासाची सुविधा वाढणार आहे. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाशी संबंधित विद्यार्थी व संशोधकांना तर या सेवेचा विशेष लाभ होणार आहे. बेलापूर स्थानकामुळेशनि शिंगणापूर परिसरातील धार्मिक पर्यटनालाही चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
0000

शिक्षण संस्थांकडून शिक्षणाचा मुळ हेतु भरकटला जाऊ नये:चंद्रकांतदादा पाटील

संतसिंग मोखा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज चे उद्घाटन
पुणे :
समाजाच्या आणि राष्ट्राच्या उभारणीत शिक्षणाचा उपयोग झाला पाहिजे आणि ते जात धर्माच्या पलीकडे जाऊन सर्वांना मिळाले पाहिजे पण काही ठिकाणी हा हेतु भरटकताना दिसतो आहे अशा काळात विजय फाउंडेशन संस्थेने एक व्रत म्हणुन व्यवस्थापन संस्था काढणे आणि त्याची सुरवात माझ्या हस्ते करणे याचा मला आनंद आहे या संस्थेच्या माध्यमातून पुढाकार घेणाऱ्या व्यक्ती या समाजहितासाठी वाहून घेणाऱ्या आहेत हे मी ४० वर्षे पाहत आहे.असे उद्गार विजय फाउंडेशन ट्रस्ट तर्फे स.संतसिंग मोखा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजचे उद्घाटन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी बोलताना काढले.
याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते दिलबागसिंग बीर आणि चरणजित सिंग सहानी, सरहद संस्थेचे संस्थापक संजय नहार, फाउंडेशनचे विश्वस्त शैलेश पगारिया , शैलेश वाडेकर, नगरसेवक अरुण राजवाडे, वर्षाताई तापकीर, संदीप बेलदरे, बापू चोरगे आदी मान्यवर उपस्थित होते.

सरहदच्या शेजारी शासनाची जागा असून यामध्ये पंधरा हजार चौरस फूट क्षेत्रावर पोलीस स्टेशन उभे राहण्यासाठी सरहद संस्थेने शासन स्तरावर पत्र व्यवहार करत मंजुरी मिळवली. या भागातल्या गुन्हेगारीवर वचक बसवण्यासाठी या ठिकाणी पोलीस स्टेशन आवश्यक असल्याची मागणी सरहद संस्थेचे संस्थापक संजय नहार यांनी यावेळी केली याला प्रतिसाद देत हा विषय मार्गी लावू असे आश्वासन चंद्रकांत पाटलांनी यावेळी दिले. विविध धर्म, पंथ असले तरी माणुसकी हाच प्रत्येक धर्माचा गाभा असून प्रत्येकाने दुसऱ्यांमध्ये देव पहावा हीच खरी ईश्वरसेवा असल्याचे यावे चंद्रकांत दादा पाटील यांनी आपल्या भाषेमध्ये सांगितले.
मुलांना चांगले शिक्षण मिळावे आणि सीमावर्ती भागातील मुलांसाठी माफक दरात व्यवस्थापन शिक्षण मिळावे या हेतूने ही इमारत बांधण्यात आल्याची माहिती विजय फाउंडेशनचे अध्यक्ष संतसिंग मोखा यांनी यावेळी सांगितले.
संजय नहार यांनी प्रास्ताविक केले.

श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टच्या अध्यक्षपदी पुनीत बालन यांची निवड

पुणे :
कै. सौ. लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टच्या नव्या विश्वस्त मंडळाची निवड जाहीर करण्यात आली असून ट्रस्टच्या अध्यक्षपदी पुनीत बालन यांची निवड करण्यात आली आहे. राजू बलकवडे यांची कार्यकारी विश्वस्त म्हणून नियुक्ती करण्यात आली असून ॲड. विवेक भरगुडे आणि वर्षा थोरवे यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे.
तसेच सुरज थोरात यांच्याकडे खजिनदारपदाची जबाबदारी सोपविण्यात आली असून नितीन पंडित यांची उत्सव प्रमुख तर मनीषाताई खेडेकर यांची उपउत्सव प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पराग काळकर आणि महेंद्रशेठ गाढवे यांची विश्वस्त म्हणून निवड झाली आहे.
दरम्यान, ट्रस्टच्या विश्वस्त निवड प्रक्रियेमध्ये अनियमितता झाल्याचा आरोप काही व्यक्तींनी केला होता. मात्र, या प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर निवड प्रक्रियेत कोणतीही अनियमितता झालेली नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. त्यानंतर धर्मादाय आयुक्तांच्या आदेशानुसार नव्या विश्वस्त मंडळाची निवड निश्चित करण्यात आली.
नवीन विश्वस्त मंडळाच्या निवडीमुळे मंदिराच्या धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांना अधिक बळ मिळणार असल्याची भावना भाविकांनी व्यक्त केली आहे.

“धर्मादाय आयुक्तांनी दिलेल्या निकालाचे मी मनःपूर्वक स्वागत करतो. ‘भगवान के दरबार में देर है, अंधेर नहीं’ या उक्तीचा प्रत्यय देणारा हा निर्णय असून न्यायव्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ करणारा आहे. दत्तमंदिर ट्रस्टचा अध्यक्ष म्हणून मंदिराची परंपरा, श्रद्धा आणि संस्कृती यांना कोणताही धक्का लागू न देता भाविकांसाठी अधिकाधिक समाजोपयोगी आणि लोककल्याणकारी उपक्रम राबविण्यावर आमचा भर राहील. भक्तांच्या सेवेला सर्वोच्च प्राधान्य देत ट्रस्टच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी अधिक मजबूत करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”
पुनीत बालन, अध्यक्ष, कै. सौ. लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्ट.

ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून कोथरुडमधील विविध विकासकामांचा आढावा

ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून कोथरुडमधील विविध विकासकामांचा आढावा

प्रकल्पांतील अडचणी दूर करून कामे गतिमान करण्याच्या सूचना

पुणे : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा कोथरुडचे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी कोथरुड मतदारसंघातील विविध विकासकामांचा आढावा घेत संबंधित प्रकल्पांतील अडचणी जाणून घेतल्या. तसेच तांत्रिक व प्रशासकीय अडथळे दूर करून कामे जलदगतीने मार्गी लावण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

या आढावा बैठकीस महापालिका आयुक्त नवलकिशोर राम, अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, परिमंडळ ४ चे पोलीस उपायुक्त रजनीकांत चिरुमुल्ला, शहर मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर यांच्यासह महापालिकेच्या विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत कस्पटे वस्ती, बाणेर-बालेवाडी येथील २४ मीटर व ३० मीटर रुंदीच्या रस्त्यांच्या मिसिंग लिंक, रजपूत वीटभट्टी ते मेहेंदळे गॅरेजदरम्यानचा १५ मीटरचा विकास आराखडा (डीपी) रस्ता, तसेच रजपूत वीटभट्टी ते सृष्टी लॉन्सपर्यंतचा ३६ मीटरचा डीपी रस्ता आणि पंडित जितेंद्र अभिषेकी उद्यानासाठी आवश्यक असलेल्या भूसंपादन प्रक्रियेचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी या प्रकल्पांतील तांत्रिक अडचणींबाबतही चर्चा करण्यात आली.

कोथरुड मतदारसंघातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मिसिंग लिंक प्रकल्प अत्यंत महत्त्वाचे असल्याचे नमूद करत, त्यांतील सर्व अडथळे दूर करून प्रकल्प तत्काळ पूर्ण करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना ना. पाटील यांनी दिल्या. लोकप्रतिनिधी म्हणून या कामांसाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याची ग्वाहीही त्यांनी अधिकाऱ्यांना दिली.

दरम्यान, पानशेत पूरग्रस्त वसाहतींसंदर्भात घेण्यात आलेल्या निर्णयांच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी उपविभागीय अधिकारी तसेच जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख यांना तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिल्याबद्दल ना. पाटील यांनी समाधान व्यक्त केले. संबंधित अधिकाऱ्यांनी आवश्यक प्रक्रिया तातडीने पूर्ण करून पानशेत पूरग्रस्तांना लवकरात लवकर दिलासा द्यावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

बुलेट ट्रेनने मुंबई-पुणे ४८ मिनिटांत; महाराष्ट्राला जागतिक पुरवठा साखळीचे केंद्र बनवणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

▪️जबिलच्या रांजणगाव येथील अत्याधुनिक उत्पादन विस्तार प्रकल्पाचे उद्घाटन; इलेक्ट्रॉनिक्स, डेटा सेंटर आणि सेमीकंडक्टर क्षेत्रात महाराष्ट्र आघाडीवर

पुणे, दि. १७ : मुंबई-पुणे बुलेट ट्रेनमुळे दोन्ही शहरांतील प्रवास अवघ्या ४८ मिनिटांत होणार असून मुंबई आणि पुणे हे एकात्मिक आर्थिक क्षेत्र म्हणून विकसित होतील. तसेच जेएनपीटी आणि वाढवण बंदरांना समृद्धी महामार्गालगत स्वतंत्र मालवाहतूक रेल्वे कॉरिडॉरद्वारे जोडून महाराष्ट्राला जागतिक पुरवठा साखळीचे महत्त्वाचे केंद्र बनविण्याचा राज्य शासनाचा संकल्प असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील जबिल कंपनीच्या अत्याधुनिक उत्पादन विस्तार प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय रेल्वे, माहिती व प्रसारण तसेच इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव, आमदार दिलीप वळसे पाटील, ज्ञानेश्वर कटके, राज्याचे उद्योग, गुंतवणूक आणि सेवा विभागाचे प्रधान सचिव डॉ. पी. अनबलगन, जॅबिलचे कार्यकारी उपाध्यक्ष (ऑपरेशन्स) अँडी प्रिस्टली, मुख्यमंत्र्यांचे सल्लागार कौस्तुभ धवसे, कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक बी. एन. शुक्ला, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी तसेच एमआयडीसीच्या सह मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, महाराष्ट्र देशातील डेटा सेंटर हब म्हणून उदयास येत असून भारतातील सुमारे ६० टक्के डेटा सेंटर क्षमता राज्यात विकसित होत आहे. त्यामुळे डेटा सेंटर, डीप टेक, इलेक्ट्रॉनिक्स आणि चिप उत्पादनाशी संबंधित संपूर्ण उद्योग परिसंस्था महाराष्ट्रात निर्माण करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, असे त्यांनी सांगितले.

इलेक्ट्रॉनिक्स निर्यातीमध्ये महाराष्ट्राने अग्रस्थान मिळविल्याचे नमूद करत मुख्यमंत्री म्हणाले की, केंद्र सरकारने राज्याला दिलेल्या इलेक्ट्रॉनिक्स क्लस्टरमुळे उद्योग क्षेत्राला नवी गती मिळणार आहे.
यावेळी त्यांनी जेएनपीटी आणि उभारणीच्या अंतिम टप्प्यात असलेल्या वाढवण बंदराला समृद्धी महामार्गालगत स्वतंत्र मालवाहतूक रेल्वे कॉरिडॉरद्वारे जोडण्याचा महत्त्वाकांक्षी प्रस्ताव केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासमोर मांडल्याची माहिती दिली. हा कॉरिडॉर जालना, वर्धा येथील ड्राय पोर्ट आणि पुढे गडचिरोलीपर्यंत जोडला जाणार असून त्यामुळे लॉजिस्टिक्सचा खर्च ७ ते ८ टक्क्यांपर्यंत कमी होईल. यामुळे महाराष्ट्र जागतिक पुरवठा साखळीतील प्रभावी केंद्र म्हणून उदयास येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात महाराष्ट्राचा सुमारे १४ टक्के वाटा असून निर्यातीत हा वाटा २० टक्क्यांपर्यंत असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

जबिलच्या या अत्याधुनिक प्रकल्पात दिसणारी अचूकता, प्रगत तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील नवकल्पना भारतातील उत्पादन क्षेत्राच्या वाढत्या सामर्थ्याचे प्रतीक आहेत. भारत आज इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन आणि निर्यातीमध्ये मोठी झेप घेत असून मोबाईल उत्पादन क्षेत्रात आत्मनिर्भर झाल्यानंतर आता सेमीकंडक्टर आणि चिप निर्मिती क्षेत्रातही देशाने भक्कम पाऊल टाकले आहे, असेही श्री.फडणवीस यांनी नमूद केले.

राज्यातील उद्योगांना शासन भागीदार म्हणून पाहत असून व्यवसाय सुलभतेसाठी आवश्यक असलेले सर्व सहकार्य दिले जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. रांजणगाव परिसरात महावितरण (एमएसईडीसीएल) चे स्वतंत्र विभागीय कार्यालय स्थापन करण्यबाबत सकारात्मक निर्णय घेणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. उद्योग क्षेत्राला आवश्यक असलेली कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे सांगत या औद्योगिक पट्ट्यात पोलिस यंत्रणा अधिक बळकट करण्यात येईल आणि कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी जबिलच्या पुणे येथील अत्याधुनिक प्रकल्पाचे कौतुक करत भारताला जागतिक इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्रातील विश्वासार्ह भागीदार बनविण्याचा निर्धार व्यक्त केला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलेल्या जमीन सुधारणांमुळे आणि महाराष्ट्र शासनाच्या जलद निर्णय प्रक्रियेमुळे उद्योगांना मोठी चालना मिळाल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशातील इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन उद्योग १३ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचला असून इलेक्ट्रॉनिक्स ही भारताची तिसरी सर्वात मोठी निर्यात श्रेणी बनल्याचे त्यांनी नमूद केले.

भारताला इलेक्ट्रॉनिक्स निर्यातीत जगातील अग्रगण्य राष्ट्र बनविण्यासाठी गुणवत्ता, कौशल्य विकास आणि उच्च-अचूकता उत्पादनावर भर देण्याचे आवाहन करताना त्यांनी देशात चार सेमीकंडक्टर प्रकल्प कार्यान्वित होत आहेत. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर रेल्वे प्रकल्प सुरू असून मुंबई–पुणे बुलेट ट्रेनमुळे हा प्रवास अवघ्या ४८ मिनिटांत, तर पुणे–हैदराबाद प्रवास सुमारे २ तास ८ मिनिटांत पूर्ण होईल, असे सांगून देशात मोठे औद्योगिक आणि पायाभूत परिवर्तन घडत असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

गेल्या एका वर्षात जबिल कंपनीचे भारतातील एकूण उत्पादन क्षेत्रफळ ५ लाख चौरस फुटांवरून १२ लाख चौरस फुटांपर्यंत वाढले आहे. तसेच कर्मचाऱ्यांची संख्या ५ हजारांवरून जवळपास ११ हजारांपर्यंत पोहोचली आहे असे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक बी. एन. शुक्ला म्हणाले.

जबिलचे कार्यकारी उपाध्यक्ष (ऑपरेशन्स) अँडी प्रिस्टली यांनीही यावेळी विचार व्यक्त केले. हा नवीन प्रकल्प कुशल मनुष्यबळ आणि अभियांत्रिकी क्षमता एकत्र आणून उच्च दर्जाची उत्पादने अधिक वेगाने तयार करण्यास मदत करेल, असे त्यांनी सांगितले.

ठाकरेंचा पक्ष फुटला, 9 पैकी 6 खासदारांचा वेगळा गट!:लोकसभा अध्यक्षांना सोपवले पत्र; सहा पैकी दोन खासदारांच्या पत्रावर सह्या नाही

महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या (यूबीटी) नऊ खासदारांपैकी सहा खासदारांनी बंड केले आहे. सूत्रांनुसार, या सहा खासदारांनी बुधवारी सकाळी ९:३० वाजता लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र पाठवून शिंदे गटाच्या शिवसेनेत विलीनीकरणाची विनंती केली आहे.

दिल्लीत सुरू असलेल्या ‘ऑपरेशन टायगर’बाबत राजकीय वर्तुळात अद्यापही संभ्रम कायम आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या सहा खासदारांनी साथ सोडल्याची आणि त्यांनी सह्यांचे पत्र दिल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. या बंडखोरीमुळे हे ऑपरेशन यशस्वी झाल्याच्या बातम्याही झळकल्या होत्या. मात्र, प्रत्यक्षात या सहा खासदारांचा कोणताही एकत्र फोटो किंवा त्यांनी स्वाक्षरी केलेले पत्र अद्याप समोर आलेले नाही, ज्यामुळे या दाव्यांबाबत साशंकता निर्माण झाली आहे.

याच मुद्द्यावर बोट ठेवत, सहापैकी दोन खासदारांनी पत्रावर सह्या केल्याच नसून ते अद्यापही आपल्यासोबत असल्याचा विश्वास ठाकरे गटाकडून व्यक्त करण्यात आला आहे. लोकसभा अध्यक्षांना दिलेल्या पत्रात सहा खासदारांच्या सह्याच नसल्याचा दावा शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) केला आहे. दरम्यान, या राजकीय घडामोडींवर आणि संबंधित खासदारांबाबत सध्या कोणतीही सार्वजनिक प्रतिक्रिया देऊ नये, असे सक्त आदेश ठाकरे गटाने आपल्या नेत्यांना व पदाधिकाऱ्यांना दिले आहेत.
सूत्रांनुसार, पत्र पाठवणाऱ्या खासदारांमध्ये नागेश आष्टीकर आणि संजय दिना पाटील यांचा समावेश आहे. संजय दिना पाटील यांनी पक्ष सोडण्याच्या चर्चा फेटाळून लावत म्हटले आहे की, “मी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा खासदार आहे आणि पक्षातच राहीन.” दरम्यान, शिवसेनेचे (यूबीटी) राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी दिल्लीत एका पत्रकार परिषदेत बंडखोर खासदारांना शिवीगाळ केली. राऊत शिवीगाळ करताना म्हणाले, “हे बेईमान लोक आहेत. बेईमानी त्यांच्या रक्तात आहे. उद्धव ठाकरेंनी त्यांना भावासारखे वागवले आणि हे XX#U लोक, मी बोललेलं कट करू नका,” असेही म्हणाले. ते नंतर माध्यमांना म्हणाले. “असे शब्द मराठीत सर्रास बोलले जातात.”

गेल्या चार वर्षांतील शिवसेनेतील ही दुसरी फूट आहे. यापूर्वी, जून २०२२ मध्ये, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ३९ आमदार शिवसेनेतून बाहेर पडले होते. या बंडामुळे उद्धव ठाकरे सरकार कोसळले होते. त्यानंतर शिंदे गटाला पक्षाचे मूळ शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाणाचे चिन्ह मिळाले.

सूत्रांच्या माहितीनुसार, लोकसभा अध्यक्षांनी या गटाला प्राथमिक मान्यता दिल्यानंतर उद्धवसेना नेतृत्वात खळबळ उडाली आहे. या घडामोडींची माहिती मिळताच खासदार संजय राऊत यांनी तातडीने संसद भवनात धाव घेत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची 20 मिनिटे भेट घेतली आहे. या बैठकीत त्यांच्यासोबत खासदार अरविंद सावंत व अनिल देसाईही सोबत होते.

ठाकरे गटाने यापूर्वीच लोकसभा अध्यक्षांना पत्र देत कोणत्याही फुटीर गटाला स्वतंत्र मान्यता देण्यापूर्वी पक्षाची बाजू ऐकून घेण्याची मागणी केली होती. संसदीय पक्षनेते अरविंद सावंत यांच्या स्वाक्षरीने पाठवलेल्या पत्रात, “शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हाच संसदेतील अधिकृत पक्ष मानला जावा आणि कोणत्याही फुटीर गटाला विशेष दर्जा किंवा मान्यता देऊ नये,” अशी विनंती करण्यात आली होती. आता सहा खासदारांच्या गटाला मान्यता मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत स्वतः लोकसभा अध्यक्षांकडे उद्धवसेनेची भूमिका मांडणार असल्याचे समजते.


कोणते खासदार शिंदे गटात गेले?

  1. संजय जाधव
  2. संजय देशमुख
  3. नागेश पाटील आष्टीकर
  4. ओमराजे निंबाळकर
  5. भाऊसाहेब वाकचौरे
  6. संजय दिना पाटील

कल्याणी स्ट्रॅटेजिक सिस्टिम्स लिमिटेड आणि पॅरामाउंट यांच्याकडून जागतिक बाजारपेठेसाठी नव्या पिढीतील बहुउद्देशीय मॉड्युलर ‘सिंहा ४x४’ वाहनाचे अनावरण

युरोसॅटरी, पॅरिस, फ्रान्स | १७ जून २०२६ : ‘भारत फोर्ज लिमिटेड’ची संपूर्ण मालकीची संरक्षण क्षेत्रातील उपकंपनी कल्याणी स्ट्रॅटेजिक सिस्टिम्स लिमिटेड (केएसएसएल) आणि पॅरामाउंट यांनी आज ‘युरोसॅटरी २०२६’मध्ये ‘सिंहा ४x४’ या नव्या पिढीतील हलक्या चिलखती बहुउद्देशीय वाहनाचे अनावरण केले. भारत, आफ्रिका, दक्षिण आशिया आणि इतर जागतिक बाजारपेठांतील सशस्त्र दलांच्या वेगाने बदलणाऱ्या हालचाली, सुरक्षा आणि मोहिमांशी संबंधित गरजा लक्षात घेऊन ‘सिंहा ४x४’ विकसित करण्यात आले आहे. हे वाहन सुरुवातीपासून नव्याने तयार करण्यात आलेले डिझाइन असून, विविध कामांसाठी उपयुक्त असे एक सक्षम व्यासपीठ त्याद्वारे उपलब्ध झाले आहे.

शक्ती, चपळता आणि संरक्षण यांचा संगम असलेले ‘सिंहा ४x४’ हे वाहन शहरी भागातील लढाई तसेच रस्त्यावर आणि खडतर भागांतील टेहळणी मोहिमांसाठी उपयुक्त आहे. विश्वासार्ह तांत्रिक घटकांच्या आधारे तयार करण्यात आलेल्या या वाहनाची रचना लवचिक स्वरूपाची आहे. त्यामुळे त्यात सहजपणे सुधारणा आणि आवश्यक बदल करता येतात. यामुळे वापरकर्त्यांना त्यांच्या पुरवठा साखळीचे आणि देखभाल-दुरुस्ती व्यवस्थेचे अधिक प्रभावी नियोजन करता येते.

‘सिंहा ४x४’ हे चिलखती वाहन सुरुवातीपासूनच विविध गरजांनुसार बदल करता येईल, अशा लवचिक आणि मोहिमेनुसार वापरता येणाऱ्या स्वरूपात तयार करण्यात आले आहे. सुरक्षित, वेगवान हालचाल करू शकणाऱ्या आणि विविध कामांसाठी वापरता येणाऱ्या वाहनांची उपलब्धता ही आधुनिक सशस्त्र दलांची एक महत्त्वाची गरज आहे. ती पूर्ण करण्यासाठी ‘सिंहा ४x४’ विकसित करण्यात आले आहे. हे वाहन टेहळणी, अंतर्गत सुरक्षा, सीमासुरक्षा, विशेष मोहिमा, नियंत्रण व समन्वय, जवानांची वाहतूक आणि दलाच्या सुरक्षेसारख्या विविध कामांसाठी वापरता येते. प्रगत डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून आणि उत्पादनाची कठोर चाचणी व पडताळणी करत ‘सिंहा ४x४’ विक्रमी कालावधीत विकसित करण्यात आले आहे.

‘केएसएसएल’ची मूळ कंपनी असलेल्या ‘भारत फोर्ज लिमिटेड’चे उपाध्यक्ष आणि संयुक्त व्यवस्थापकीय संचालक अमित कल्याणी म्हणाले, “सिंहा ४x४ हे जागतिक स्तरावर आम्ही सादर करत असलेल्या अभियांत्रिकी कौशल्याचे आणि संरक्षण क्षेत्रातील अनुभवांचे प्रतीक आहे. याचे डिझाइन युरोपीय मानकांनुसार तयार करण्यात आले असून, नाटो मान्यताप्राप्त तांत्रिक घटकांचा त्यात वापर करण्यात आला आहे. त्यामुळे जगभरातील भागीदार देशांमध्ये त्याचे उत्पादन जलद गतीने सुरू करता येऊ शकते. भारताचा संरक्षण उद्योग जगातील सर्वोत्तम उद्योगांबरोबर स्पर्धा करू शकतो, हे या बहुउद्देशीय वाहनातून दिसून येते. सशस्त्र दलांना उच्च दर्जाचे संरक्षण आणि रणनितीला पूरक हालचालींची क्षमता ते उपलब्ध करून देते आणि विविध देशांना त्यांच्या स्वतःच्या देशात अशी संरक्षण क्षमता विकसित करण्यास मदत करते.”

‘पॅरामाउंट’चे वरिष्ठ उपाध्यक्ष एरिक इचिकोवित्झ म्हणाले, “जगभरातील संरक्षण दलांना अशी वाहने हवी आहेत, जी विविध मोहिमा पार पाडू शकतील, नव्या तंत्रज्ञानाशी सुसंगत असतील आणि स्थानिक पातळीवर तयार करता येतील. सिंहा वाहनाची रचना सुरुवातीपासूनच या गरजा लक्षात घेऊन करण्यात आली आहे. या वाहनात संरक्षण, गतिशीलता, लवचिक रचना आणि परवडणारी किंमत यांचा समतोल साधण्यात आला आहे. त्यामुळे बदलत्या कामकाजाच्या गरजांनुसार त्यात सुधारणा करता येऊ शकतात. ‘सिंहा ४x४’ हे केवळ नवे वाहन नाही, तर संरक्षण क्षेत्रातील विश्वासार्ह कंपन्या आपले कौशल्य, औद्योगिक क्षमता आणि दीर्घकालीन दृष्टीकोन एकत्र आणल्यास काय साध्य होऊ शकते, याचे हे एक महत्त्वाचे उदाहरण आहे.”

स्थानिक उत्पादनाला चालना देणे आणि संरक्षण क्षेत्रात स्वावलंबन वाढवणे या उद्देशाने ‘सिंहा ४x४’ची रचना करण्यात आली आहे. भागीदार देशांमध्ये या वाहनाचे उत्पादन आणि स्थानिकीकरण जलद गतीने करता येऊ शकते. त्यामुळे त्या देशांच्या संरक्षण उद्योग विकासाला मदत होईल आणि परदेशी पुरवठा साखळीवरील दीर्घकालीन अवलंबित्व कमी होईल. पॅरामाउंट आणि केएसएसएल यांच्या भागीदारीतून विकसित झालेल्या संरक्षण उपाययोजनांच्या वाढत्या संचामध्ये ‘सिंहा ४x४’ची भर पडली आहे. यामुळे पुढील पिढीतील लष्करी क्षमता विकसित करण्यासाठी धोरणात्मक औद्योगिक सहकार्याचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.

आदित्य बिर्ला हाऊसिंग फायनान्सचा महाराष्ट्रात विस्तार; पुण्‍यातील वाकड येथे नवीन शाखा सुरू

लाँच ऑफरशून्य लॉगइन फी आणि ५० लाख रूपयांपर्यंत तात्काळ कर्ज मंजूरी ~

पुणे: आदित्य बिर्ला हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (“एबीएचएफएल”) या आघाडीची हाऊसिंग फायनान्स कंपनी आणि आदित्य बिर्ला कॅपिटल लिमिटेडच्‍या उपकंपनीने संपूर्ण भारतात वितरण नेटवर्कचा विस्तार करण्याच्या आपल्‍या व्यापक योजनेचा भाग म्हणून पुण्‍यातील वाकड येथे नवीन शाखा सुरू केली आहे, ज्‍यासह महाराष्ट्रातील आपला विस्तार वाढवला आहे. या नवीन शाखेसह, एबीएचएफएलचे महाराष्ट्रातील एकूण नेटवर्क आता ३५ शाखांवर पोहोचले आहे, ज्यामुळे वेगाने वाढणाऱ्या बाजारपेठांमधील त्‍यांची उपस्थिती दृढ झाली आहे, तसेच ग्राहकांसाठी उपलब्धता अधिक सोपी झाली आहे.

आयटी (माहिती तंत्रज्ञान), उत्पादन आणि सेवा क्षेत्रातील प्रबळ उपस्थिती, तसेच मजबूत पायाभूत सुविधांचा विकास आणि विस्तारत चाललेली शहरी कनेक्टिव्हिटी यामुळे पुणे हे भारतातील सर्वात गतिमान निवासी बाजारपेठ राहिले आहे. पहिल्यांदाच घर खरेदी करणारे ग्राहक, पगारदार, स्वयंरोजगार असणारे व्यक्ती आणि महत्त्वाकांक्षी कुटुंबं, जी परवडणाऱ्या, अनौपचारिक आणि प्राईम हाउसिंग अशा सर्वच क्षेत्रांमध्ये घरांचा शोध घेत आहेत, त्यांच्याकडून गृहखरेदीसाठी सातत्याने मागणी दिसून येत आहे. आपल्या या नवीन शाखेच्या माध्यमातून एबीएचएफएल ग्राहकांच्या गरजेनुसार तयार केलेल्या गृहनिर्माण वित्त पुरवठा पर्यायांची (हाउसिंग फायनान्स सोल्युशन्स) उपलब्धता अधिक सहजसाध्य करेल, ज्यामुळे ग्राहकांना त्यांच्या वैविध्यपूर्ण गृहखरेदीच्या गरजा अधिक सुलभतेने आणि सहजतेने पूर्ण करता येतील.

एबीएचएफएल परवडणारी घरे, प्राईम हाऊसिंग, कन्स्ट्रक्शन फायनान्स आणि मालमत्तेवर कर्ज यांसह विविध ग्राहक घटकांसाठी तयार केलेल्या हाऊसिंग फायनान्‍स सोल्‍यूशन्‍सची व्‍यापक श्रेणी देते. हे सोल्‍यूशन्‍स पगारदार व्यक्ती, स्वयंरोजगार व्यावसायिक, स्वयंरोजगार बिगर-व्यावसायिक आणि उदयोन्मुख उत्पन्न गटांच्या गरजा पूर्ण करतात. प्रबळ डिजिटल परिसंस्थेच्या पाठबळासह एबीएचएफएल विनासायास ऑनबोर्डिंग, जलद मंजूरी आणि सुधारित पारदर्शकता प्रदान करते, ज्यामुळे ग्राहकांना उत्कृष्ट अनुभव मिळतो.

या लाँचच्या निमित्ताने, एबीएचएफएल शून्य लॉगइन फी सोबत ५० लाख रूपयांपर्यंतचे स्पॉट लोन सॅंक्शन (तात्काळ कर्ज मंजुरी) ऑफर करत आहे. ही ऑफर १७ जून ते ३० जून २०२६ या कालावधीत वैध असेल, ज्यामुळे या नवीन शाखांमधील ग्राहकांना जलद आणि अधिक परवडणाऱ्या दरात कर्ज मिळवणे शक्य होईल.

या विस्तारीकरणाबाबत मत व्‍यक्त करत आदित्य बिर्ला हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचे एमडी आणि सीईओ श्री. पंकज गाडगीळ म्हणाले, “महाराष्ट्र आमच्यासाठी महत्त्वाची बाजारपेठ आहे. येथील प्रबळ मागणी आणि वाढत्या महत्त्‍वाकांक्षा पाहता ग्राहकांशी संपर्क अधिक दृढ करण्यासाठी आम्ही आमची प्रादेशिक उपस्थिती वाढवत आहोत. आमच्या वाढत्या वितरण नेटवर्कला प्रबळ डिजिटल क्षमतेची जोड देऊन ग्राहकांसाठी घर खरेदीचा प्रवास सोपा, जलद आणि त्रासरहित बनवण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.”

आपल्या ‘हॅपी होम लोन जर्नी’ या आश्वासनाशी सुसंगत असलेला हा विस्तार एबीएचएफएलचे ग्राहक-केंद्रितता, जबाबदार कर्ज वाटप आणि वैविध्यपूर्ण व सखोल रिटेल पोर्टफोलिओच्या माध्यमातून आर्थिक समावेशनाला गती देण्यावर असणारा निरंतर भर सादर करतो.

पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही-केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही

केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पाठपुराव्याला यश

पुणे
ऐतिहासिक वारसा लाभलेल्या पुणे आकाशवाणीच्या वृत्त विभागाबाबत गेल्या काही दिवसांपासून विविध माध्यमांमध्ये बंद होण्याच्या चर्चांना उधाण आले होते. या पार्श्वभूमीवर केंद्रीय नागरी विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री तथा पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय रेल्वे, माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन हा विषय त्यांच्या निदर्शनास आणून दिला. यावेळी मंत्री वैष्णव यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “कोणत्याही परिस्थितीत पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही.” त्यामुळे या संदर्भातील सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

रेल्वे विभागाच्या विविध विकासकामांचे उद्घाटन आणि नव्या रेल्वे सेवांच्या लोकार्पणासाठी अश्विनी वैष्णव पुणे दौऱ्यावर आले असता पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर मुरलीधर मोहोळ यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी झालेल्या चर्चेत मोहोळ यांनी पुणे आकाशवाणीच्या वृत्त विभागाबाबत निर्माण झालेल्या चिंतेची माहिती दिली आणि हा विभाग कायम ठेवण्याची मागणी केली. त्यावर अश्विनी वैष्णव यांनी अशा प्रकारचा कोणताही प्रस्ताव अथवा विचार केंद्र सरकारसमोर नसल्याचे स्पष्ट केले.

पुणे आकाशवाणीच्या वृत्त विभागाला अनेक दशकांची समृद्ध परंपरा लाभली आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड, जिलहा तसेच विविध भागांतील लाखो श्रोत्यांचे आकाशवाणीशी भावनिक नाते जुळलेले आहे. स्थानिक घडामोडी, सामाजिक प्रश्न, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विश्वसनीय बातम्यांचे माध्यम म्हणून आकाशवाणीने दीर्घकाळ लोकांचा विश्वास संपादन केला आहे. त्यामुळे वृत्त विभाग कायम ठेवण्याची जनभावना मोहोळ यांनी मंत्री वैष्णव यांच्यापर्यंत पोहोचवली.

यावेळी स्पष्टीकरण देताना अश्विनी वैष्णव म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशभरातील आकाशवाणी केंद्रांचे आधुनिकीकरण आणि सक्षमीकरण करण्याचे काम सुरू आहे. आकाशवाणी अधिक प्रभावी, आधुनिक आणि लोकाभिमुख करण्यासाठी आम्ही विविध स्तरांवर प्रयत्न करत आहोत. त्यामुळे पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. उलट स्थानिक बातम्या आणि जनसंपर्क अधिक सक्षम करण्यावर आमचा भर आहे. महाराष्ट्रातील तसेच देशातील सर्व आकाशवाणी केंद्रांचे अद्ययावतीकरण करण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे.”

याबाबत प्रतिक्रिया देताना केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले, “पुणे आकाशवाणी केंद्राला गौरवशाली इतिहास लाभला आहे. आजही जवळपास सव्वा कोटी श्रोते नियमितपणे आकाशवाणीवरील बातम्यांवर विश्वास ठेवतात. प्रत्येक श्रोत्याच्या मनातील भावना आणि अपेक्षा मी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यापर्यंत पोहोचवली. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग सुरूच राहील, अशी स्पष्ट ग्वाही दिली आहे. त्यामुळे वृत्त विभाग बंद होणार असल्याच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळायला हवा. आकाशवाणीचे आधुनिकीकरण आणि सक्षमीकरण करण्यासाठी केंद्र सरकार घेत असलेल्या पुढाकाराबद्दल मी मंत्री अश्विनी वैष्णव यांचे मनःपूर्वक आभार मानतो.”

पुणे आकाशवाणी ही केवळ एक प्रसारण संस्था नसून पुण्याच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि पत्रकारितेच्या इतिहासाचा महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे तिचे जतन, संवर्धन आणि आधुनिकीकरण करून अधिक सक्षम स्वरूपात पुढे नेण्याचा केंद्र सरकारचा निर्धार असल्याचे या भेटीतून स्पष्ट झाले आहे.

दलबदलू, विकाऊ व विश्वासघातकी खासदारांच्या घरांपुढे इंडिया आघाडी तीव्र निदर्शने करणार …काँग्रेस’चा इशारा …!

‘पक्षांतर करणाऱ्या खासदारांची निवडून दिलेल्या जनतेप्रती प्रतारणा…!
पुणे – १७ : महाविकास आघाडी’च्या ‘जाहीरनामा व ध्येय – धोरणांवर’ तसेच प्रस्थापित मोदी सरकार’च्या विरोधात मतदान करून, जनतेने निवडून दिलेल्या खासदारांचा ‘भाजप-महायुती प्रवेश’ ही जनतेशी विश्वासघात व प्रतारणा आहे असे झाल्यास, संबंधित मतदार संघातील ‘जनमताचा कौल’ विरोधात कृती करणाऱ्या फीतूर, विश्वासघातकी, खासदारांच्या घरांच्या समोर काँग्रेस इंडिया आघाडी’चे कार्यकर्ते ‘तीव्र निषेध आंदोलन व निदर्शने’ करतील असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस चे वरीष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनाद्वारे दिला.
ते पुढे म्हणाले की, मोदी सरकार’च्या असंवैधानिक व लोकशाही विरोधी सततच्या कृत्यांमुळे, देशाची राष्ट्रीय संपत्ती वाचवण्यासाठी व संविधानाची रक्षा करण्यासाठी.. राहुलजी गांधी यांचे नेतृत्वाखालील काँग्रेस प्रणीत इंडिया आघाडी’ला जनतेने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत स्पष्ट कौल दिला असून, जनतेने संसदेत मजबूत विरोधीपक्ष नेता ही दिला आहे.
इतर पक्षांची संख्या सोडून केवळ काँग्रेस’चेच १००% खासदार वाढून ते ५२ वरून १०२ झाले आहेत.

दुसरीकडे, केंद्रातील सत्ताधारी भाजप’ने सतत स्वायत्त संस्थाचा दुरुपयोग करून, ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स व निवडणूक आयोगाच्या आधारे विरोधकांना नामोहरम व खच्ची करण्याचा सतत प्रयत्न करून व प्रसंगी वेळोवेळी आचार संहिता धुडकावून, सरकारी खर्चाने प्रचंड प्रमाणात प्रचार करूनही, अब की बार ४०० पार म्हणणाऱ्या भाजप’चे २०२४ च्या लोकसभेत, ३५% संख्याबळ कमी होऊन..२४० खासदारांवर संख्या झाली.. हे वास्तव नाकारता येणार नाही.
केवळ नितीशकुमार व चंद्रबाबू नायडू या पक्षांच्या आघारेच केंद्रातील मोदी सरकार २०२४ मध्ये सत्तेवर आले आहेत.. हा देशातील जनतेचा वास्तव कौल असुन, भाजप’ला ३८% च्या वर देशातील जनतेने मतदान केलेले नाही..
मात्र तरी देखील सरासरी तिजोरी व जनतेच्या पैशांवर धाडी घालून, नैतिकता झुगारून, अहंकारी कोडगेपणाने व निर्लज्जपणाने, बेमालूम पणे सत्तापक्षाच्या विरोधी दिलेला कौल.. निवडून आलेले खासदार कथित २/३ संख्याबळाचा व कायद्यातील पळवाटांचा आधार घेत निर्लज्जपणे पक्षांतर करून सत्तेच्या दरोडेखोरांमध्ये सामील होत असतील तर हा ‘लोकशाही’च्या हत्येचा तमाशा’ उघड्या डोळ्याने लोकशाही’चे इतर स्तंभ शांतपणे पाहू कसे शकतात..? असा उपरोधिक व उदीग्न सवाल ही काँग्रेस’ने केला.
तसेच महाराष्ट्रात देखील २०२४ लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने, “भाजप’प्रणीत एनडीए”पेक्षा ही “काँग्रेस_इंडीया आघाडी”चेच सु २/३ जास्त खासदार निवडून दिलेत हा सत्य – वास्तव व जनतेचा वास्तव कौल देखील दुर्लक्षित करता येणार नाही.
इंडीया आघाडी’च्या अर्थात शिवसेनेच्या संभाव्य दलबदलू खासदारांना जनतेने निवडून देण्यासाठी.. काँग्रेस नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी देखील कष्ट घेऊन रक्ताचे पाणी केले, हे विसरून चालणार नाही अशी संतप्त प्रतिक्रिया ही प्रदेश काँग्रेस’चे वरीष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी दिली.
राज्यातील प्रकल्पांमध्ये हजारो कोटीचा भ्रष्टाचार झाल्याचे ताशेरे मा उच्च न्यायालयाने लगावले आहेत.
त्यामुळे अनैतिक मार्गाने सत्तेत राहुन, देश व राज्याची साधन संपत्ती चोरांच्या विरोधात मा राहुलजीं च्या भाषेत प्रतिकार करण्यास, काँग्रेस’सह इंडिया आघाडी चे कार्यकर्ते रस्त्यावर उतरतील व जनतेच्या कौल विरोधात पक्षांतर करणाऱ्या विश्वासघातकी खासदारांच्या घरा पुढे तीव्र “निषेध आंदोलने” करतील असा इशारा ही काँग्रेस’चे वरीष्ठ राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी दिला..!

ऑपरेशन टायगरशी भाजपचा संबंध नाही:चंद्रशेखर बावनकुळेंचा दावा

उद्धव ठाकरेंनी आत्मचिंतन करावे, संजय राऊतांवरही पलटवार
मुंबई- राज्यात सुरू असलेल्या ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांवर भाजप प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया देत भाजपचा या घडामोडींशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राला मजबूत सरकार मिळाले असून देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे मुख्यमंत्री आहेत, असे त्यांनी ठामपणे सांगितले. तसेच संजय राऊत यांनी खासदारांना 15 कोटींचा ॲडव्हान्स दिल्याचा केलेला दावा अत्यंत चुकीचा आणि बिनबुडाचा असल्याचे त्यांनी म्हटले.

बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्या कार्यशैलीवर थेट निशाणा साधताना म्हटले की,”उद्धव ठाकरेंनी आधी स्वतःचा पक्ष सांभाळावा. त्यांचे आमदार आणि खासदार त्यांना सोडून का चालले आहेत? आपले लोक कुठे जात आहेत आणि का जात आहेत, याचे त्यांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे. आपल्याच लोकांना सांभाळता येत नसल्याने विरोधक भाजपवर नाहक आरोप करत असल्याचा टोला त्यांनी लगावला.

वडिलांच्या खून खटल्याचा निकाल बाजूने लावतो, पक्षात या,ओमराजे निंबाळकरांवर दबाव:संजय राऊतांचाआरोप

मुंबई–पवनराजे निंबाळकर यांच्या हत्या प्रकरणाचा निकाल 20 जून रोजी लागणार आहे. या प्रकरणी निकाल तुमच्या बाजूने लागावे असे वाटत असेल तर आमच्या गटात या असे ओमराजे निंबाळकर यांना आज दिल्लीत आलेल्या एका नेत्याने म्हटल्याचे सांगितले आहे. त्यांचा रोख एकनाथ शिंदेंकडे असल्याचे दिसून येत आहे.

संजय राऊत म्हणाले की, निवडून आलेल्या खासदारांना विकत घेण्याचा जे काम सुरू आहे ते लोकशाहीच्या विरोधात आहे. लोकसभा अध्यक्षांनी संविधानाचे पालन करत निर्णय घेतला पाहिजे. जो त्यांनी यापूर्वी घेतला नाही. खासदारांवर दबाव कशा प्रकारे येतात हे मी तुम्हाला सांगतो, 20 वर्षांपूर्वी त्यांच्या वडिलांची हत्या झाली. गेली 20 वर्षे तो खटला सुरू आहे, काल त्यांचा निकाल होता, मुंबई हायकोर्टात पण ओमराजे निंबाळकरांवर दबाव टाकण्यात आला की तुमच्या बाजूने निकाल हवा असेल तर आमच्या गटात या, असा दबाव त्यांच्यावर टाकण्यात आला आहे.

ठाकरेंच्या खासदारांची 50-50 कोटींना खरेदी, संजय राऊत म्हणाले- ‘पवनराजे हत्याकांडाचा निकाल बाजूने देण्याची ओमराजेंना ऑफर!’

0

रात्री 11 वाजता फोन आला, 50 कोटींची डील उघड..कोणी साईबाबांची, तर कोणी आई-मुलाची शपथ घेतली..ओमराजे निंबाळकरांवर खटल्याच्या निकालासाठी दबाव….

नवी दिल्ली/मुंबई- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील तब्बल सहा खासदारांनी दिल्लीत तळ ठोकल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. हे खासदार स्वतंत्र संसदीय गट स्थापन करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत असून, त्यासाठी आज लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

“अमित शहांच्या आमिषांना अनेक जण बळी पडतायत”
देशातील विरोधी पक्षांतील नेत्यांच्या कथित पक्षांतराच्या घडामोडींवरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. विरोधी पक्षांवर सातत्याने हल्ले करत भारतीय लोकशाहीचे नुकसान केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये जयराम रमेश यांनी म्हटले की, केंद्रीय गृहमंत्री सातत्याने विरोधकांवर हल्लाबोल करत आहेत. त्यांच्या मते, 17 एप्रिल 2026 रोजी लोकसभेत झालेल्या परिसीमन विधेयकांवरील घडामोडींनंतर निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीची भरपाई करण्यासाठी ते हे सर्व करत आहेत.
जयराम रमेश यांनी आरोप केला की, अवघ्या दोन वर्षांपूर्वी भाजपविरोधी भूमिका घेऊन निवडून आलेले अनेक लोकप्रतिनिधी आता भाजपच्या दिशेने वळत आहेत. यामागे मोठ्या प्रमाणात आमिषे आणि प्रलोभने दिली जात असल्याची चर्चा असल्याचा दावा त्यांनी केला.
“ज्यांना भाजपविरोधी भूमिकेमुळे जनतेने निवडून दिले, तेच आता भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. त्यांना दिली जाणारी आमिषे धक्कादायक असल्याचे सांगितले जात आहे,” असे रमेश यांनी म्हटले.
गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका करताना जयराम रमेश यांनी त्यांच्या राजकीय रणनीतीची तुलना थेट म्युच्युअल फंड उद्योगाशी केली. ते म्हणाले, “हा अत्यंत संकुचित आणि कुटिल राजकीय अभियान आहे. या मोहिमेसाठी सर्व प्रकारची संसाधने वापरली जात आहेत. म्युच्युअल फंड उद्योग जसा प्रत्येक ग्राहकाच्या गरजेनुसार वेगवेगळ्या योजना आणि उत्पादने देतो, त्याचप्रमाणे राजकीय गरजांनुसार वेगवेगळी आमिषे दिली जात आहेत.”
काँग्रेस नेत्यांनी भाजपवर लोकशाही संस्थांचा गैरवापर केल्याचाही आरोप केला. “या संपूर्ण प्रक्रियेत नैतिकतेचा पूर्णपणे ऱ्हास झाला आहे. या राजकारणाला कोणतीही मर्यादा राहिलेली नाही,” असे ते म्हणाले.
तथापि, या सर्व प्रयत्नांनंतरही विरोधकांना संपविण्याच्या अंतिम उद्देशात भाजप यशस्वी होणार नाही, असा विश्वासही जयराम रमेश यांनी व्यक्त केला.

या घडामोडींना अधिक वजन मिळाले ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अचानक दिल्ली दौऱ्यामुळे. मंगळवारी रात्री उशिरा शिंदे दिल्लीला रवाना झाल्यानंतर या सर्व हालचालींना वेग आला असून, आज सकाळी शिंदे आणि संबंधित खासदारांची बैठक होणार असल्याची चर्चा आहे. या बैठकीत स्वतंत्र गट स्थापन करायचा की थेट शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करायचा, यावर अंतिम निर्णय होऊ शकतो.शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने मोठी पत्रकार परिषद घेऊन आपली आक्रमक भूमिका स्पष्ट केली आहे. अरविंद सावंत, अनिल देसाई, राजाभाऊ वाजे आणि संजय राऊत यांनी एकत्र येत बंडखोरीच्या चर्चांवर थेट कडक शब्दांत प्रहार केला. जर पुन्हा कोणी शिवसेना फोडण्याचा प्रयत्न केला, तर महाराष्ट्रातील जनता गप्प बसणार नाही, असा जाहीर इशारा यावेळी नेत्यांनी दिला.

पत्रकार परिषदेत बोलताना खासदार संजय राऊत यांनी काल रात्रीच्या घडामोडींचा खुलासा केला. काल रात्री ११ वाजेच्या सुमारास मला एका विश्वासू सूत्राने माहिती दिली की, महाराष्ट्रातील खासदारांना विकत घेण्याची मोठी डील झाली आहे. प्रत्येकी ५० कोटी रुपयांना खासदारांना विकत घेतले जात असून, काल रात्रीच १५ कोटींचा ॲडव्हान्स दिला गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली. मी ती लगेच सोशल मीडियावर जाहीर केली,” असे राऊत म्हणाले.

खासदार फुटण्याच्या चर्चांवर संताप व्यक्त करताना राऊत यांनी १४ जून रोजी मातोश्रीवर झालेल्या बैठकीचा किस्सा सांगितला. राऊत म्हणाले, आमची १४ तारखेला बैठक झाली, त्याला सर्व खासदार उपस्थित होते. त्या बैठकीत एका खासदाराने ५ वेळा साईबाबांची शपथ घेतली, दुसऱ्याने आई भवानीची शपथ घेतली, तर तिसऱ्याने स्वतःच्या मुलाची आणि आईची शपथ घेतली. बाळासाहेब ठाकरेंची शपथ घेऊन सांगणारे हे खासदार जर आता बेईमानी करत असतील, तर ही डरपोकगिरी आहे आणि जनता हा तमाशा खपवून घेणार नाही.

संजय राऊत म्हणाले की, निवडून आलेल्या खासदारांना विकत घेण्याचा जे काम सुरू आहे ते लोकशाहीच्या विरोधात आहे. लोकसभा अध्यक्षांनी संविधानाचे पालन करत निर्णय घेतला पाहिजे. जो त्यांनी यापूर्वी घेतला नाही. खासदारांवर दबाव कशा प्रकारे येतात हे मी तुम्हाला सांगतो, 20 वर्षांपूर्वी त्यांच्या वडीलांची हत्या झाली. गेली 20 वर्षे तो खटला सुरू आहे, काल त्यांचा निकाल होता, मुंबई हायकोर्टात पण ओमराजे निंबाळकरांवर दबाव टाकण्यात आला की तुमच्या बाजूने निकाल हवा असेल तर आमच्या गटात सामील व्हा.

संजय राऊत म्हणाले की, खून प्रकरणचा निकाल तुमच्या बाजूने हवा असेल तर तुम्ही या लेटरवर सही करा आणि आमच्यासोबत या. जर देशाचा कायदा आणि न्यायव्यवस्था या पद्धतीने चालत असेल तर तर काय संविधान आणि काय न्यायव्यवस्था त्यामुळेच या प्रकरणाचा निकाल दोन दिवस पुढे ढकलला गेला.