Home Blog Page 701

काँग्रेस मविआचे सरकार आल्यानंतर मंत्रीमंडळाच्या पहिल्याच बैठकीत जुनी पेन्शनचा निर्णय: नाना पटोले.

मुंबई/शिर्डी, दि. १५ सप्टेंबर
सरकारी कर्मचा-यांची जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी राज्यातील व केंद्रतील भाजपा सरकारला टेन्शन वाटते.
आता भाजपा सरकारने सुरु केलेली पेन्शन योजना कर्मचा-यांना मान्य नाही पण पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटे सांगून हीच पेन्शन योजना सरकारी कर्मचा-यांनी मान्य केल्याचा ढोल बडवत आहेत. जुनी पेन्शन योजनाच लागू करावी या सरकारी कर्मचा-यांच्या मागणीला काँग्रेसचा पाठिंबा आहे. काँग्रेस मविआचे सरकार सत्तेस आल्यानंतर मंत्रीमंडळाच्या पहिल्याच बैठकीत जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहे.

शिर्डी येथील पेन्शन राज्य महाअधिवेशनात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले बोलत होते. यावेळी ते पुढे म्हणाले की, जुनी पेन्शन हा सरकारी कर्मचा-यांचा हक्क आहे, तुमचाच पैसा निवृत्तीनंतर तुम्हाला दिला जातो, सरकार काही उपकार करत नाही परंतु जुनी पेन्शन योजना लागू केली तर राज्याची तिजोरी रिकामी होईल असे भाजपा सरकार म्हणते. उद्योगपती अनिल अंबानी यांचे 1700 कोटी रुपयांचे कर्ज माफ करते त्यावेळी सरकारची तिजोरी रिकामी होत नाही का? असा सवाल नाना पटोलेंनी उपस्थित केला. राज्यात 2.5 लाख सरकारी पदे रिक्त आहेत पण महायुती सरकार ती पदे भरत नाही. काँग्रेस मविआचे सरकार आल्यानंतर ही रिक्त पदेही भरली जातील. काँग्रेसचे सरकार असताना विलासराव देशमुख यांनी गाव वस्तीवर शाळा सुरू करुन गाव खेड्यातील गरीब कुटुंबातील मुला मुलींपर्यंत शिक्षण पोहचवण्याचा प्रयत्न केला. आज हे महायुती सरकार जिल्हा परिषदेच्या या शाळा बंद करत आहे. सरकार MPSC मार्फतची नोकर भरती करत नाही उलट त्या विद्यार्थांवर पोलीस लाठीचार्ज करून त्यांचे आंदोलन दडपून टाकले.

जुनी पेन्शन योजना ही काँग्रेसच्या काळात सुरु होती ती अटल बिहारी वाजपेयी सरकारने बंद केली आहे. व भाजपा काँग्रेसवर आरोप करत आहे. काँग्रेसचे सरकार ज्या राज्यात आहे तेथे जुनी पेन्शन योजना लागू केली आहे. महाभ्रष्ट युती सरकारने महाराष्ट्र 10 वर्षे मागे नेला व केंद्रातील मोदी सरकारच्या 10 वर्षांच्या कारभारानेही देशाची व राज्याची पिछेहाट झाला. महाराष्ट्र पुन्हा उभा करण्यासाठी सर्व योजना लागू करून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारी कर्मचा-यांची गरज आहे असेही पटोले म्हणाले.

या अधिवेशनाला माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे, आ. सुधाकर आडबाले, आ. अभिजित वंजारी, आ. सत्यजित तांबे. किरण सरनाईक, रविकांत तुपकर, नितेश खांडेकर आदी उपस्थित होते.

आवाजाला ठेवा मर्यादा अन लेसर लाईटच्या वापराला बंदी

पुणे: डीजेमध्ये वेगवेगळ्या मोठ्या आवाजासाठी ‘प्रेशर मीड’ उपकरणाचा वापर केला जातो. कर्णकर्कश आवाजामुळे ध्वनी प्रदूषण होते. त्याचे मानवी शरीरावर घातक परिणाम होतात. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी असे प्रेशर मीड वापरणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.
तसेच डीजेवर लेसर लाईट लावल्यास जागेवरच डीजे जप्त करून गुन्हे दाखल करण्याचा इशारा देखील पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे. लेसर लाईटमुळे गेल्यावर्षी अनेकांच्या डोळ्यांना मिरवणुकीत गंभीर इजा झाल्या होत्या.
ध्वनिप्रदूषणाबाबत सर्वोच्च न्यायालय, तसेच राष्ट्रीय हरित न्यायाधीकरणाने निर्देश दिले आहेत. आदेशाचे उल्लंघन केल्यास विसर्जन मिरवणुकीत उच्च क्षमतेची ध्वनिवर्धक यंत्रणा वापरणारे डीजे, तसेच ध्वनिवर्धक पुरवठादारांविरोधात कारवाई करण्यात येईल. त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करुन डीजे यंत्रणा जप्त करण्यात येईल, असे विशेष शाखेचे पोलिस उपायुक्त जी. श्रीधर यांनी आदेशात म्हटले आहे.रात्री १२ वाजता ध्वनिवर्धक बंदच ठेवावे लागतील अन्यथा कोणाचेही मंडळ असो तत्क्षणी कारवाई होईल असे त्यांनी म्हटले आहे.

ड्रोनच्या वापरासाठी पोलिसांची परवानगी गरजेची..

ड्रोन कॅमेऱ्यांच्या वापरास पोलिसांकडून परवानगी मिळविणे आवश्यक आहे. विसर्जन मिरवणुकीत ड्रोन कॅमेरा वापरणाऱ्यांनी विशेष शाखेच्या पोलिस उपायुक्तांकडे अर्ज करावेत. परवानगीशिवाय ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर केल्यास भारतीय न्याय संहिता कलम २२३ अन्वये कारवाई करण्यात येईल. विनापरवानगी ड्रोन वापरणाऱ्यांविरोधात कारवाईच्या सूचना शहरातील सर्व पोलिस ठाण्यांना देण्यात आल्या आहेत.

घातक लेसर लाईटवरही कारवाई…

गेल्या वर्षी विसर्जन मिरवणुकीत लेसर लाईटचा वापर करण्यात आला होता. घातक लेसर लाईटमुळे अनेकांना त्रास झाल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. कोल्हापूरमध्ये लेसर झोतांमुळे तिघांच्या डोळ्यांना इजा पोहोचल्याची घटना नुकतीच घडली होती. विसर्जन मिरवणुकीत लेसर लाईटचा वापर करणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचा इशारा देण्यात आला आहे. दहीहंडीनिमित्त आयोजित कार्यक्रमावेळी लेसर दिव्यांचा वापर करणाऱ्यांविरुद्ध हडपसर पोलिसांकडून नुकतेच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

अनंत चतुर्दशीला दुपारी ४ च्या दरम्यान सहभागी होणार ‘दगडूशेठ’चा श्री उमांगमलज रथ

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळच्यावतीने उत्सवाच्या १३२ व्या वर्षानिमित्त आयोजित गणेशोत्सवाची सांगता मिरवणूक अनंत चतुर्दशीला मंगळवार, दिनांक १७ सप्टेंबर रोजी थाटात निघणार आहे. यंदा श्री उमांगमलज रथामध्ये दगडूशेठचे गणपती बाप्पा विराजमान होणार असून आकर्षक विद्युतरोषणाईने हा रथ उजळून निघणार आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण यांनी दिली.विसर्जन मिरवणुकीत दगडूशेठ गणपती बाप्पा यंदाही दुपारी ४ च्या दरम्यान सहभागी होणार आहे. मागील अनेक वर्षे दगडूशेठ गणपती बाप्पा विसर्जन मिरवणूक परंपरेप्रमाणे रात्री लक्ष्मी रस्त्यावर पोलिस प्रशासनाने मार्ग उपलब्ध करून दिल्यावर सहभागी होत आले आहेत. परंतु दरवर्षी निघायला होणारा उशीर खूपच वाढत चालला होता. त्यामुळे मागील वर्षी दुपारी ४ वाजता श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा सहभागी झाले होते. यंदा देखील भाविकांच्या भावनांचा विचार करून तसेच ज्या वेळेत गणेश मंडळे मिरवणुकीत सहभागी व्हायला फारशी उत्सुक नसतात, अशावेळी दुपारी ४ च्या दरम्यान श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा विसर्जन मिरवणुकीत लक्ष्मी रस्त्याने सहभागी होईल.

श्री उमांगमलज रथातून निघणार ‘दगडूशेठ’ गणेशोत्सवाची सांगता मिरवणूक
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे १३२ वे वर्ष ; यंदा देखील दुपारी ४ वाजता सहभागी होणार

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने उत्सवाच्या १३२ व्या वर्षानिमित्त आयोजित गणेशोत्सवाची सांगता मिरवणूक अनंत चतुर्दशीला मंगळवार, दिनांक १७ सप्टेंबर रोजी थाटात निघणार आहे. यंदा श्री उमांगमलज रथामध्ये दगडूशेठ चे गणपती बाप्पा विराजमान होणार असून आकर्षक विद्युतरोषणाईने हा रथ उजळून निघणार आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण यांनी दिली.

यंदाची प्रतिकृती असलेल्या जटोली शिवमंदिराच्या विषयाप्रमाणे सांगता मिरवणूक रथाची मांडणी करण्यात आली आहे. श्री उमांगमलज रथाच्या माथ्यावर जटा सोडलेली शंकराची मूर्ती असणार आहे. त्याच्या बाजूला त्रिशूळ आणि डमरु देखील आहे. कळस म्हणून मोठा रुद्राक्ष दाखविण्यात आला आहे. नागाच्या फण्यावर हा तोललेला आहे, बाजूला २१ छोटे कळस लावण्यात आले आहेत. तर, रथावर २३ नंदींचे चेहरे बसविण्यात आले आहेत. तसेच रथावर तब्बल १८ क्रिस्टलचे झुंबर लावण्यात येतील.

रथावर ८ खांब साकारण्यात आले आहेत. प्रत्येक खांबांवर बेलाच्या पानांचे डिझाईन साकारण्यात आले आहे. रथाचा आकार १५ बाय १५ फूट असून उंची २४ फूट इतकी आहे. रथावर एलईडी व पार लाईटचे फोकस लावण्यात येणार आहेत. रथामध्ये बाप्पा ज्या ठिकाणी विराजमान होणार आहेत. तेथे मोराची डिझाईन देखील साकारण्यात आली आहे. युवा कलादिग्दर्शक विराज खटावकर यांनी हा रथ साकारला आहे.

सांगता मिरवणुकीबाबत माहिती देताना माणिक चव्हाण म्हणाले, मिरवणुकीत रुग्णसेवा रथ अग्रभागी असणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदा सामाजिक विषयांतर्गत आरोग्यविषयक जनजागृती रथावरुन केली जाणार आहे. याखेरीज मिरवणुकीत प्रभात ब्रास बँड, दरबार ब्रास बँड, स्वरूप वर्धिनीचे ढोल-ताशा पथक, सनई-चौघडा असा लवाजमा असेल. तसेच पुरुष भाविकांसह महिला गणेशभक्त मोठया संख्येने सहभागी होणार आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय वर्षा निवासस्थानी श्री गणेशाची विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली आरती….

मुंबई/पुणे दि. १४ : गणेश उत्सव मोठ्याप्रमाणात महाराष्ट्रात कोरोनाच्यानंतर होत आहे. तसाच उत्साह मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी दिसत आहे. देशातील अनेक नेते, सामाजिक कार्यकर्ते, अभिनेते, विविध पक्षांचे कार्यकर्ते व पदाधिकारी, सामान्य नागरिक यांनी वर्षावर जाऊन दर्शन घेतले आहेत. काल विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी वर्षा निवासस्थानी जाऊन दर्शन घेतले व त्यांच्या हस्ते आरती देखील झाली. यादरम्यान डॉ. गोऱ्हे यांच्या वाढदिवसाच्यानिमित्त मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी खा.श्रीकांत शिंदे, आ.सदा सरवणकर, आ.दिलीप लांडे, माजी आ.राम पाटील, गोपकिशन बाजोरिया, शिवसेना उपनेत्या कला शिंदे आदी आमदार व पदाधिकारी उपस्थित होते.

केंद्र सरकारच्या सहकारी संस्थांबाबतच्या नवीन कायद्याची माहिती घेऊन विविध कार्यकारी सहकारी संस्थांनी व्यवसाय उभे करावेत – सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील

पुणे, दि. १५: विविध कार्यकारी सहकारी संस्थांनी आता फक्त कर्ज घेऊन वाटप करणे आणि वसूल करणे एव्हढेच काम करणे अपेक्षित नसून आता केंद्र सरकारच्या सहकार विभागाने आणलेल्या नवीन कायद्यानुसार या संस्थांना १५१ प्रकारचे विविध व्यवसाय करण्यास परवानगी दिली आहे. संस्थांच्या चेअरमन आणि सोसायट्यांनी या योजनांची माहिती घेऊन योजना राबवाव्यात, असे आवाहन राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले.

अवसरी (ता. आंबेगाव) येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या कवयित्री शांता शेळके सभागृहात पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्यावतीने आयोजित सहकार परिषद व बक्षीस वितरण समारंभात ते बोलत होते. यावेळी म्हाडाच्या पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रा. दिगंबर दुर्गाडे, उपाध्यक्ष सुनील चांदेरे, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मंगेश तिटकारे, सहकारी संस्थाचे पुणे ग्रामीण जिल्हा उपनिबंधक प्रकाश जगताप, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब भेंडे आदी उपस्थित होते.

उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्थांना बक्षीस वितरण आणि सहकार क्षेत्रात घडत असलेले बदल आणि त्या अनुषंगाने संस्थांनी निश्चित करावयाची दिशा या अनुषंगाने या सहकार परिषदेचे आयोजन करण्यात आल्याचे सांगून मंत्री श्री. वळसे पाटील म्हणाले, संस्था जपली तर आपल्याला त्यांची मदत होईल. शेतकऱ्याला पीक कर्ज, अन्य कोणतेही कर्ज वाटप, शैक्षणिक कर्ज आदींसाठी जिल्ह्यात चांगले काम आहे. सोसायट्यांनी शिस्तीने कारभार केला नाही तर तोटा वाढतो, कर्ज वाटप करून वसूली होत नसल्याने तोटा वाढतो व सोसायटी बंद पडली तर त्याचा त्रास शेतकऱ्याना होतो. बऱ्याच सोसायट्या अनिष्ट तफावतीमध्ये जातात. सोसायटीत अडचणीत आल्यास शेतकऱ्याला कर्जासाठी सावकाराकडे जावे लागते. ते किती तरी जास्त टक्केवारीने घेत असल्याने लोकांना त्रास होतो. त्यामुळे आपल्या संस्था जपल्या पाहिजेत आणि चांगल्या प्रकारे कारभार केला पाहिजे, असेही ते म्हणाले.

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सर्व अटी शर्ती पूर्ण करून देशात प्रथम क्रमांकावर आली आहे. जिल्हा बँक महिला स्वयंसहायता गटांना ४ टक्के दराने थेट कर्ज देते. मात्र या बाबतचे अधिकाधिक कर्ज वाटप व वसूल करण्यासाठी संस्थांच्या आणि बँकेच्या कर्मचाऱ्यांनी स्वतःहून पुढाकार घ्यावा. जास्तीत जास्त महिलांना कर्ज वाटप करावे, असेही ते म्हणाले.

अडचणीतील सोसायट्यांना मदत करण्याची शासनाची भूमिका आहे. मंत्रिमंडळाने सोसायट्यांच्या सचिवांच्या संवर्गाचे (केडर) पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद केली असून त्यादृष्टीने काम चालू आहे.

वेळेत पीक कर्ज परतफेड केलेल्या शेतकऱ्यांकडून व्याज वसूल न करता फक्त मुद्दल वसूल केल्यामुळे त्याचा व्याज परतावा जिल्हा बँकेला देण्याच्या अनुषंगाने शासन पातळीवरून लवकरच कार्यवाही केली जाईल, अशी ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली.

श्री. आढळराव पाटील म्हणाले, सरकारने आणलेल्या नवीन कायद्यामुळे १५१ उद्योग संस्थेच्या माध्यमातून उभे करता येतात. त्यासाठी फक्त डोळे उघडे ठेऊन धाडस केले पाहिजे. आपल्या गावातील संस्था तोट्यात राहू नये यासाठी प्रयत्न केला पाहिजे. सर्व शेतकऱ्यांच्या जीवनाशी निगडित सहकार आहे. त्यांच्या जीवनात बदल होऊ शकतो. सहकारात चांगल्या प्रकारे काम झाले पाहिजे. परिसराच्या विकासासाठी सहकार महत्त्वाचा आहे हे लक्षात घेऊन संस्थांनी काम करावे, असेही ते म्हणाले.

प्रा. दुर्गाडे म्हणाले, पुणे जिल्हा बँकेमार्फत महिला बचत गटांना विनातरण कर्जात ५ लाख रुपयांवरून वाढ करून ७ लाख ५० लाख रुपये कर्ज पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. तर तारण कर्ज १५ लाख रुपये इतके दिले जाते. बँकेची या वर्षीची उलाढाल २७ हजार कोटी रुपयांची झाली आहे. बँक देशातील सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये प्रथम क्रमांकावर असून देशातील अग्रगण्य ५ नागरी अनुसूचित सहकारी बँकामध्येही समावेश आहे. तसेच बँकेत लवकरच १ हजार रिक्त जागा भरण्यात येणार आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.

अनिष्ट तफावतीतील संस्थांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी बँकेने १० कोटी रुपयांची तरतूद केली असून या संस्थांना बिगरव्याजी २० लाख रुपये देण्याचे निश्चित केले आहे. शैक्षणिक कर्ज ४० लाख रुपयांपर्यंत फक्त ६ टक्के व्याजदराने आदी विविध कर्जांना कमी व्याजदर असतानाही जिल्हा बँकेला ४१८ कोटीचा नफा झाला आहे. नफ्याचा उपयोग समाजाच्या कल्याणासाठी करण्याचा प्रयत्न आहे. सोसायट्यांनी आपल्या गावातील उपलब्ध कच्चा माल आणि परिसरातील मागणी पाहून त्यानुसार व्यवसाय सुरू करावेत, असेही ते म्हणाले.

मंगेश तिटकारे म्हणाले, राज्यात २१ हजार ९७ विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था आहेत. त्यातील ९ हजार म्हणजेच फक्त ४८ टक्के नफ्यात आहेत. बाकीच्या अनिष्ट तफावतीत आहेत. जिल्ह्यात वि.का.स. संस्थांची ५ हजार ६०० कोटी रुपयांहून अधिक अनिष्ट तफावत आहे. आंबेगाव तालुक्यात १०३ संस्था अ वर्गात आहेत त्यांचे संगणकीकरण करण्यात येणार आहे. ‘ब’ मधील संस्थांचे बळकटीकरण करणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.

प्रास्ताविक अनिरुद्ध देसाई यांनी केले. वसुलीची परंपरा कायम राहावी आणि त्यासाठी प्रोत्साहन मिळावे या हेतूने दरवर्षी बँकेमार्फत बक्षीस वितरण करण्यात येते. आंबेगाव तालुक्यात वसुलीचे काम अत्यंत चांगले आहे. १५१ प्रकारच्या विविध योजना राबविण्यासाठी सहकारी संस्थांच्या उप विधीमध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत. त्याची चांगली अंमलबजावणी करण्यासाठी संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे ते म्हणाले.

बँकेच्या शेती संस्था विकास कक्षा बाबत प्रा. रमेश बांडे यांनी मार्गदर्शन केले.

कर्ज वाटप आणि वसुलीमध्ये चांगले काम केलेल्या वि. का. स. संस्थांसाठी देण्यात येणाऱ्या तीन वर्षांच्या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यामध्ये आंबेगाव तालुक्यातील ५९ पैकी ४१ संस्थांचा तर शिरूर तालुक्यामधील ४२ संस्थांचा गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाला विविध कार्यकारी सहकारी संस्थांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव आदी उपस्थित होते.

गड किल्ल्याच्या आर्किटेक्चरल दस्तऐवजीकरण स्पर्धेत सहभाग घ्यावा-जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे

पुणे, दि.१५: राज्यातील गड किल्ले जागतिक वारसा स्थळ नामांकन जनजागृती मोहिमेत नागरिकांना सहभागी करुन घेण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असून याचाच भाग म्हणून गड किल्ल्याच्या आर्किटेक्चरल दस्तऐवजीकरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे; महाविद्यालय, गिरीप्रेमी व वास्तुविशारद संस्थेनी या स्पर्धेत सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी केले आहे.

या स्पर्धेत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या प्रथम ५ गटांना प्रत्येकी २५ हजार रुपये, गिरीप्रेमी, वास्तुविशारद संस्था, आर्किटेक्ट व सामान्य नागरिकांच्या वर्गवारीच्या प्रथम ५ गटांना २५ हजार रुपये पारितोषिक देण्यात येणार आहे.

या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी उपसंचालक, पर्यटन संचालनालय, पुणे व सहायक संचालक, पुरातत्व विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने नोंदणी करावी. दस्तऐवजीकरण तसेच इतर बाबींकरिता जिल्ह्यातील महाविद्यालयानी सहभाग घ्यावा, असे आवाहन डॉ. दिवसे यांनी केले आहे.

स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी, सहायक संचालक, पुरातत्व विभाग, पुणे यांच्या कार्यालयात प्रत्यक्ष अथवा adapune77@gmail.com वर सहभाग नोंदवावा, असे आवाहन पुरातत्व विभागाचे सहायक संचालक डॉ. विलास वाहणे यांनी केले आहे.

टाटानगर, झारखंड येथे 660 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या  राष्ट्रीय रेल्वे प्रकल्पांची  पायाभरणी आणि लोकार्पण

0

कनेक्टिव्हीटी  वाढवणाऱ्या सहा वंदे भारत गाडयांना  हिरवा झेंडा दाखवून केले रवाना

टाटानगर-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून  टाटानगर, झारखंड येथे 660 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या  विविध रेल्वे प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण केले. त्यांनी 32 हजार प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण (PMAY-G) लाभार्थ्यांना मंजुरी पत्रे वितरित केली. तत्पूर्वी मोदी यांनी  दूरदृश्य प्रणालीद्वारे टाटानगर जंक्शन रेल्वे स्थानक येथे सहा वंदे भारत गाडयांना  हिरवा झेंडा दाखवला.

बाबा बैद्यनाथ, बाबा बासुकीनाथ आणि भगवान बिरसा मुंडा यांच्या भूमीसमोर नतमस्तक होऊन पंतप्रधानांनी भाषणाला सुरुवात केली. त्यांनी झारखंडमधील कर्मपर्वच्या शुभ पर्वाचा उल्लेख केला जे निसर्गाची पूजा करण्यासाठी समर्पित आहे आणि आज रांची विमानतळावर आगमन झाल्यावर एका महिलेने त्यांना कर्मपर्वचे एक प्रतीक भेट दिल्याचे त्यांनी अधोरेखित केले. ते म्हणाले की कर्मपर्वाचा एक भाग म्हणून महिला आपल्या भावांसाठी समृद्ध जीवनाची प्रार्थना करतात. त्यांनी या शुभ प्रसंगी आपल्या शुभेच्छा दिल्या आणि सांगितले की झारखंडला आज सहा नवीन वंदे भारत गाड्या, 600 कोटींहून अधिक खर्चाचे विकास प्रकल्प आणि पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत राज्यातील लोकांसाठी पक्क्या घरांची भेट मिळाली आहे. मोदी यांनी या प्रकल्पांबद्दल झारखंडमधील जनतेचे तसेच आज वंदे भारत कनेक्टिव्हिटी मिळालेल्या इतर राज्यांच्या जनतेचे अभिनंदन केले.

आधुनिक विकास केवळ काही राज्यांपुरता मर्यादित होता आणि झारखंडसारखी शहरे आणि राज्ये मागे राहिली  त्या काळाची आठवण पंतप्रधानांनी करून दिली आणि ‘सबका साथ सबका विकास’ या मंत्राने देशाच्या  विचारसरणीत आणि प्राधान्यक्रमात परिवर्तन घडवून आणल्याचे अधोरेखित केले. “गरीब, आदिवासी, दलित, वंचित, महिला, तरुण आणि शेतकरी हे देशाचे प्राधान्य आहेत”, असे पंतप्रधानांनी नमूद केले.

आज प्रत्येक शहराला आणि प्रत्येक राज्याला कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी वंदे भारत ट्रेन हवी आहे असे पंतप्रधान म्हणाले. काही दिवसांपूर्वी भारताच्या उत्तर आणि दक्षिणेकडील राज्यांसाठी तीन नवीन वंदे भारत गाडयांना  हिरवा झेंडा दाखवून रवाना केल्याची आठवण त्यांनी करून दिली आणि आज सहा नवीन वंदे भारत गाड्यांना हिरवा झेंडा दाखवल्याचा उल्लेख त्यांनी केला. या गाड्यांचा पहिला प्रवास सुरू झाला आहे. पंतप्रधान मोदी यांनी अधोरेखित केले की पूर्व भारतातील रेल्वे कनेक्टिव्हिटीच्या विस्तारामुळे या प्रदेशाची अर्थव्यवस्था मजबूत होईल आणि उद्योग , व्यावसायिक आणि विद्यार्थ्यांना मोठा लाभ  होईल. सहा नवीन वंदे भारत गाड्यांमुळे सांस्कृतिक उपक्रमांना चालना मिळणार आहे. याबाबत बोलताना पंतप्रधानांनी नमूद केले की, वाराणसी-देवघर वंदे भारत गाडी सुरु झाल्यामुळे भारतातून आणि जगभरातून काशीला भेट देणाऱ्या यात्रेकरूंना  आता देवघरमधील बाबा बैद्यनाथाचे दर्शन घेण्याची संधी मिळणार आहे.  ते म्हणाले की यामुळे या प्रदेशातील पर्यटनाला चालना मिळेल तसेच  टाटानगरच्या औद्योगिक विकासाला देखील प्रोत्साहन मिळेल आणि त्यातून तरुणांसाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील. आजच्या विविध विकास प्रकल्पांकडे लक्ष वेधून मोदी म्हणाले, “आधुनिक रेल्वे संबंधी पायाभूत सुविधा वेगवान विकासासाठी आवश्यक आहेत ”. त्यांनी देवघर जिल्ह्यातील मधुपूर बायपास लाईनची पायाभरणी केल्याचा उल्लेख केला ज्यामुळे हावडा-दिल्ली मेनलाइनवरील गाड्यांचा खोळंबा टाळण्यास मदत होईल आणि गिरिडीह आणि जसिडीह दरम्यान प्रवासाचा वेळ कमी करण्यात मदत होईल. त्यांनी हजारीबाग जिल्ह्यातील हजारीबाग टाउन कोचिंग डेपोचा  देखील उल्लेख  केला ज्यामुळे या स्टेशनवर स्थानकावर कोचिंग स्टॉकची देखभाल सुलभ करण्यात मदत होईल. ते म्हणाले की कुरकुरा- कनारोआं मार्गाच्या दुहेरीकरणामुळे झारखंडमधील रेल्वे कनेक्टिव्हिटीला चालना मिळेल आणि पोलाद उद्योगांबरोबर कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत होईल.

झारखंडच्या सर्वांगीण विकास आणि प्रगतीसाठी केंद्र सरकारने तेथील गुंतवणुकीत वाढ केली असून विकासकामांचा वेगही वाढवल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. झारखंडमधील रेल्वे पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणासाठी यावर्षीच्या अर्थसंकल्पात 7000 कोटींपेक्षा अधिक रक्कम मंजूर केल्याचे त्यांनी सांगितले.ही रक्कम दहा वर्षांपूर्वी तरतूद केलेल्या रकमेच्या सोळापट रक्कम असल्याचेही ते म्हणाले. नवीन मार्ग विकसित करणे असो किंवा विद्यमान मार्गांचे विद्युतीकरण, दुपदरीकरण, स्थानकांवर नवीन पायाभूत सुविधांची उभारणी, सर्व कामे वेगाने सुरू असल्याचे सांगून, पंतप्रधानांनी- रेल्वे अर्थसंकल्पातील रक्कम वाढवण्याचे फायदे लोकांना समजावून सांगितले. रेल्वे मार्गांचे 100% विद्युतीकरण झालेल्या राज्यांमध्ये झारखंडचा समावेश असल्याबद्दल त्यांनी झारखंडचे कौतुक केले. अमृत भारत रेल्वे स्थानक योजनेतून झारखंडमधील 50 पेक्षा अधिक स्थानकांना नवे रूप दिले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

प्रधानमंत्री आवास योजना- ग्रामीण (PMAY-G) चा पहिला टप्पा आजपासून सुरू होत असून त्यातून सहस्रावधी लाभार्थ्यांना पक्की घरे मिळतील असे त्यांनी आवर्जून नमूद केले. स्वच्छतागृह, पेयजल, वीज, गॅसजोडणी अशा अन्य सुविधाही PMAY-G च्या बरोबर पुरवल्या जातात असे त्यांनी सांगितले. एखाद्या कुटुंबाला घर मिळाल्यावर त्या कुटुंबीयांचा आत्मविश्वास उंचावतो आणि वर्तमानात स्थैर्य मिळण्याबरोबरच ते अधिक चांगल्या भविष्याचा विचार करू लागतात. पीएम-आवास योजनेतून पक्की घरे पुरवण्याबरोबरच झारखंडच्या गावांत आणि शहरांत हजारोंच्या संख्येने रोजगारनिर्मिती होत असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

2014 पासून देशातील गरीब, दलित, वंचित आणि आदिवासी कुटुंबांच्या सक्षमीकरणासाठी अनेक महत्त्वपूर्ण पावले उचलल्याचे त्यांनी सांगितले. झारखंडसह देशभरच्या आदिवासी समुदायांसाठी पीएम जनमन योजना चालवली जाते. या योजनेच्या माध्यमातून अत्यंत मागासवर्गीय जमातींपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न केले जात असून, अशा कुटुंबांपर्यंत व्यक्तिशः पोहोचून त्यांना घरे, रस्ते, वीज, पाणी, शिक्षण अशा सुविधा पुरवण्यासाठी अधिकारी प्रयत्न करतात, असे पंतप्रधानांनी सांगितले. असे प्रयत्न म्हणजे, विकसित अशा झारखंडच्या निर्मितीसाठी सरकारने केलेल्या निश्चयाचा एक भाग होत, असे ते म्हणाले. व्याख्यानाचा समारोप करताना पंतप्रधानांनी या निश्चयाची पूर्तता होईल आणि जनतेच्या आशीर्वादाने झारखंडच्या स्वप्नांची परिपूर्ती होईल, असा विश्वास व्यक्त केला. खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर उतरणे शक्य नसल्याने कार्यक्रमाला प्रत्यक्ष उपस्थित राहू नसल्याबद्दल पंतप्रधानांनी विनम्रपणे जनतेची क्षमा मागितली. त्यामुळे प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन दूरदर्शन माध्यमातून करावे लागल्याचे त्यांनी सांगितले.

झारखंडचे राज्यपाल संतोष गंगवार, तसेच केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान यावेळी उपस्थित होते.

पार्श्वभूमी -:

पंतप्रधानांनी 660 कोटींपेक्षा अधिक मूल्याच्या विविध रेल्वे प्रकल्पांचा शिलान्यास आणि लोकार्पण केले. यामध्ये देवघर जिल्ह्यातील मधुपुर बायपास मार्गाचा आणि हजारीबाग जिल्ह्यातील हजारीबाग टाउन कोचिंग डेपोचा शिलान्यास समाविष्ट आहे. मधुपुर बायपासचे काम पूर्ण झाल्यानंतर, हावडा दिल्ली मेन लाईन वरील गाड्या थांबवून ठेवण्याची गरज पडणार नाही. तसेच गिरीडिह ते जसीडिह या प्रवासाचा वेळही वाचेल. तर हजारीबाग टाउन कोच डेपोचे काम पूर्ण झाल्यानंतर येथील डब्यांच्या देखभाल-दुरुस्तीचे काम सोपे होईल.

पंतप्रधान मोदी यांनी कुरकुरा-कनारों दुपदरीकरण प्रकल्पाचे लोकार्पण केले. त्यासह बोंडामुंडा- रांची सिंगल लाईन सेक्शनचा एक भाग, रूरकेला -गोमोह रूट(रांचीमार्गे) याचा एक भाग, तसेच मुरी आणि चंद्रपुरा स्थानके यांचेही लोकार्पण केले. यामुळे मालवाहतूक आणि प्रवासी वाहतूक अधिक सुखकर होणार आहे. याशिवाय रस्त्या खालून जाणाऱ्या चार सेतूंचे लोकार्पणही करण्यात आले असून यामुळे सर्वसामान्य लोकांना अधिक सुरक्षित प्रवास करता येणार आहे.

‘सर्वांसाठी घरे’ या वचनाची पूर्तता करण्याच्या दिशेने पंतप्रधानांनी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण या योजनेसाठी झारखंडमधील लाभार्थ्यांना 32,000 अनुमतीपत्रे वितरित केली. सदर लाभार्थ्यांना अर्थसाहयाचा पहिला हप्ताही त्यांनी सुपूर्द केला. तर 46,000 लाभार्थ्यांचा गृहप्रवेश साजरा करण्याच्या कार्यक्रमातही पंतप्रधान सहभागी झाले.

स्वत: पैसे जमवून कार्यकर्त्यांकडून गणरायाला १३ तोळ्याचे सुवर्ण दंत भेट 

पुणे : आकर्षक फुलांनी सजविलेले शारदा गजानन मंदिर. शारदा गणपतीने परिधान केलेले देखणे भरजरी वस्त्र… गणपती बाप्पा मोरया चा गजर अशा उत्साही वातावरणात शारदा गजाननाचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यानी वर्षभर पैसे जमवून तयार केलेले १३ सुवर्णदंत गणरायाला भेट दिले.

अखिल मंडई मंडळाच्या शारदा गजाननाच्या प्रासादिक मूर्तीचा वाढदिवस दरवर्षी साजरा करण्यात येतो. तब्बल  १३१ किलो वजनाचा केक पुनीत बालन ग्रुपचे पुनीत बालन यांच्या हस्ते यावेळी कापण्यात आला. मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात,  खजिनदार संजय मते, कार्याध्यक्ष अभय थोरात, उपाध्यक्ष मिलिंद काची, सचिव विश्वास भोर, विश्वस्त देविदास बहिरट, जयंत किराड, सुरज थोरात यावेळी उपस्थित होते.

कार्यकर्त्यांकडून गणरायाला १३ तोळ्याचे सुवर्ण दंत भेट – अखिल मंडई मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या लाडक्या गणरायाला वर्षभर पैसे जमवून १३ तोळ्याचे सुवर्णदंत वाढदिवसानिमित्त भेट दिले आहेत. कार्यकर्त्यांनी वर्षभरापासून जमतील त्या पद्धतीने पैसे जमा करून २४ कॅरेट सोन्यापासून हे सुवर्णदंत तयार केले आहेत त्यावर आकर्षक नक्षीकाम देखील आहे. यापूर्वी कार्यकर्त्यांनी गणरायाला १० तोळ्याचे सोन्याचे कडे देखील अर्पण केले होते. याशिवाय यशोधन साखरे यांनी सोन्याचे जानवे आणि गणेश सणस यांनी सोन्याचे बाजूबंद शारदा गजाननाला अर्पण केले.  

‘आदिशक्ती’ रथातून निघणार शारदा गजाननाची विसर्जन मिरवणूक

अखिल मंडई मंडळ : गणेशोत्सवाचे १३१ वे वर्ष
पुणे : अखिल मंडई मंडळाची विसर्जन मिरवणूक ‘आदिशक्ती’रथातून निघणार आहे. रौद्र रुपातील कालीमातेची १५ फूट उंचीची मूर्ती यामध्ये असेल. दरवर्षी मिरवणूकीत श्री शारदा गजाननाचे फक्त समोरुनच दर्शन घेता येते त्यामुळे यंदा प्रथमच शारदा गणपतीची मूर्ती ६० अंशात फिरणार असून दोन्ही बाजूने भाविकांना दर्शन घेता येणार आहे. रथाची उंची कमी करण्यासाठी हायड्रोलिक तंत्रज्ञानाचा देखील वापर करण्यात आले आहे. गणेशोत्सवाची सांगता मिरवणूक अनंत चतुर्दशीला मंगळवार, दिनांक १७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता  निघणार आहे. अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात यांनी दिली. 
मंडळाचे गणेशोत्सवाचे यंदा १३१ वे वर्ष आहे. रथाचा आकार १४ बाय १८ आणि उंची २७ फूट आहे. मेट्रोच्या लकडीपूल येथील पूलामुळे हायड्रोलिक तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. कलादिग्दर्शक विशाल ताजणेकर आणि सहकाऱ्यांनी रथ साकारला आहे. 
आदिशक्ती रथावर आकर्षक विद्यूत रोषणाई करण्यात आली आहे. मिरवणूकीच्या अग्रभागी जयंत नगरकर बंधू यांचे नगारावादन त्यामागे गंधर्व बँड तसेच शिवगर्जना आणि शिवमुद्रा वाद्य पथकाचे वादन मिरवणूकीत होणार आहे.

 विविध कलाकृतींच्या एकत्रित कलाविष्कारातून साकारला ‘आविष्कार भारती’ 

भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सच्या विद्यार्थ्यांचे सादरीकरण :  ३६ वा पुणे फेस्टिवल 
पुणे : अभंग, गवळण सह कव्वाली आणि गझल च्या दमदार सादरीकरणासोबतच  कथकचे सौंदर्य उलघडणारे पारंपारिक चालीतील बंदिश असणारे चतुरंग आणि फ्रेंच संगीतावर आधारित शास्त्रीय नृत्य संयुज, आसामी प्राचीन नृत्यशैली सत्रीय नृत्याचे सादरीकरण अशा विविध कलाकृतींचा एकत्रित कलाविष्कार बघण्याची पर्वणी पुणेकरांना बालगंधर्व रंगमंदिरात मिळाली. भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सच्या हरहुन्नरी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलाविष्काराला पुणेकरांनी भरभरून दाद दिली.

भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सच्या विद्यार्थ्यांचा ३६ व्या पुणे फेस्टिवल मध्ये ‘आविष्कार भारती’ कार्यक्रम सादर झाला. यावेळी भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे कुलपती  प्रो.डॉ. शिवाजीराव कदम,  स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सचे संचालक डॉ. शारंगधर साठे, पुणे फेस्टिव्हलचे मुख्य समन्वयक अभय छाजेड, समन्वयक मोहन टिल्लू उपस्थित होते.

गुरु पंडिता रोहिणी भाटे, पंडिता मनीषा साठे, डॉ. सुचेता चापेकर,पंडिता शमा भाटे, डॉ. स्वाती दैठणकर अरुंधती पटवर्धन व डॉ देविका बोरठाकूर या ज्येष्ठ गुरूंच्या शिष्या जे स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्टसचे विद्यार्थी आहेत त्यांनी कार्यक्रमात सादरीकरण केले. सुरंजन खंडाळकर व शुभम खंडाळकर आणि नंदिनी गायकवाड व अंजली गायकवाड यांनी गायन केले.

कार्यक्रमाची सुरुवात प्रथम तुला वंदितो या गणेश वंदनेने झाली. त्यानंतर अंजली गायकवाड हिने सादर केलेल्या ‘मन मंदिरा तेजाने’ या गाण्याला पुणेकरांनी वन्स मोर म्हणत दाद दिली. रघुनाथ खंडाळकर यांनी संगीत दिलेला ‘बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल’ हा अभंग सुरंजन खंडाळकर याने सादर केला. ‘वृंदावनी वेणू वाजे’ ही अंजली गायकवाड यांनी सादर केलेल्या गवळणीला रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.  या संगीत मैफिलीत पुढे सादर झालेल्या गुलाम अली यांची गझल आणि यार इलाही या कव्वालीला देखील श्रोत्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कार्यक्रमातील दुसऱ्या भागाची सुरुवात  गणेश वंदनेने झाली. हिंदुस्तानी आणि कर्नाटकी संगीताचा सुंदर मिलाफ असणाऱ्या ‘जय रंग रंग’ या नृत्याच्या नयनरम्य सादरीकरणाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. पंडिता रोहिणी भाटे यांनी रचलेल्या शिवस्तुतीवर विद्यार्थिनींनी सादरीकरण केले त्यानंतर देवीची विविध रूपे श्लोकात गुंफून देवीला वंदन करण्यात आले. शुद्ध नृत्याची रचना त्रिवट विद्यार्थिनींनी सादर करुन अप्रतिम नृत्याचा आनंद दिला. वैष्णव सांप्रदायावर आधारित ईशान्य भारतातील सत्रिय नृत्य शैलीत कलाकारांनी श्रीकृष्ण वंदना सादर केली. फ्रेंच संगीतकार रावेल यांच्या बोलेरो या रचनेवर हिंदुस्थानी संगीताचा साज असलेल्या कथकनृत्याला रसिकांनी दाद दिली. अभिनय या रचनेतील ‘सुनो द्रौपदी शस्त्र उठाओ गोविंद अब नही आयेंगे’ या महिलांच्या सशक्तिकरणावर भाष्य करणारे सादरीकरण वैशिष्ट्यपूर्ण ठरले. मल्हार जाम या रचनेच्या कथक नृत्यातील सुंदर प्रस्तुतीने कार्यक्रमाचा समारोप झाला. कार्यक्रमाचे निवेदन स्वरदा कुलकर्णी यांनी केले.
शारंगधर साठे म्हणाले, विद्यार्थ्यांना त्यांची कला सादर करण्यासाठी चांगले व्यासपीठ मिळवून देण्यासाठी महाविद्यालय नेहमीच प्रयत्नशील असले. रसिकांनी देखील विद्यार्थ्यांना भरभरुन दाद दिली. 

आता बास या महिला हिंसाचारविरोधी नाटकाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे (प्रतिनिधी): “महिलांवरील गेल्या काळातील वाढते हिंसाचार पाहता रात्री बाहेर पडायची भीती वाटते.” “या घटनांमुळे आम्हाला घरच्यांकडून सतत विचारणा होत असते, ‘कुठे आहेस? कोणाबरोबर आहेस? फार उशीर करू नकोस.'” हे अनुभव आहेत, एका मध्यमवयीन महिलेचा आणि दुसरा नुकत्याच नोकरीला लागलेल्या मुलीचा. त्या बोलत होत्या त्याला निमित्त होतं अभिव्यक्ती आयोजित महिला हिंसाचारविरोधी सडेतोड सडक नाटक ‘आता बास’ याचे.महिलांवरील वाढत्या हिंसाचारा विरोधात अभिव्यक्ती संघटना गणेश उत्सवात बाजीराव रोड येथे आता बास नावाचे नाटक सादर करत आहे. नाटक वाढत्या हिंसाचाराच्या मुळाशी जी स्त्री पुरुष असमानतेची व्यवस्था आहे त्यावर बोलते. जे लोकांना प्रश्न पडायला उद्युक्त करते आणि स्त्री पुरुष दोघेही आपले, आपल्या आसपासचे अनुभव सांगतात. नाटकानंतर मी शपथ घेतो/घेते की,
मी महिलांचा सन्मान करेन, मी महिलांशी आदराने वागेन महिलांवर होणारा हिंसाचार मी खपवून घेणार नाही. कोणत्याही ठिकाणी जर महिलांवर छेडछाड किंवा अत्याचार होत असेल तर मी त्याविरोधात आवाज उठवेन.
ही शपथ घेण्यात नागरिक सामील होत आहेत. तसेच, त्याच ठिकाणी स्त्री पुरुष समानता रुजवण्यासाठी काही आकर्षक खेळ खेळण्यातही नागरिक उत्तम प्रकारे सामील होत आहेत.

पाच हजार सॅनिटरी पॅडचे वाटप करीत आरोग्यविषयक जनजागृती

पुणे : सदाशिव पेठेतील नागनाथ पार येथील संयुक्त मित्र मंडळाने या वर्षी महिलांच्या पाळी या संवेदनशील विषयाला जीवंत देखाव्याच्या माध्यमातून वाचा फोडली असून याचे निमित्त साधून महिला, मुलींना सॅनिटरी पॅडचे वाटप करण्यात येत आहे. पाच हजार सॅनिटरी पॅडचे वाटप करून स्वच्छतेविषयी जनजागृती केली जात आहे.
देखाव्याची संकल्पना, लेखन, नेपथ्य व दिग्दर्शन मंडळाचे सल्लागार पियूष शहा यांचे आहे. डॉ. पूनम शाह, प्रमुख पाहुण्या म्हणुन म्हणुन उपस्थित होत्या मुलींना तरुणींना आणि महिलांना खूप सोप्या भाषेत आपण पाळी दरम्यान स्वचछता कशी राखावी , काय काळजी घ्यावी , पाळी पुढें जण्या करिता गोळ्या नाही घेणे अना मुळात पाळी म्हणजे कलंक पाप बिलकुल नाही खूप सोप्या भाषेत उत्तम सादर केले . आणि त्यावर कार्य करत पाच हजार सॅनिटरी पॅडचे वाटप करत महिलांचा योग्य सन्मान करत आहात खऱ्या अर्थाने शाह आणि मंडळाच्या कार्यर्कत्यांना तिच्या संवेदना समजल्या… या प्रसंगी सौ कल्याणी सराफ, स्वाती ओतारी, प्रज्ञा केळकर, गंधाली शाह, डॉ. श्रीकांत गबाले यांची प्रमुख उपस्थिती होती.
महिलांच्या मासिक पाळी विषयीच्या कल्पना, विचार, वेदना, चुकीच्या संकल्पना असा आगळावेगळा विषय घेऊन गणेश मंडळ प्रथमच उत्सवाच्या काळात सादरीकरण करत पॅड्स वाटप करत आहे. या निमित्त विविध घटकातील महिलांना व पूर्व-उत्तर भागातील तरुणींना, आश्रम शाळेतील मुलींना, सॅनिटरी पॅडचे वाटप करून स्वच्छतेविषयी मार्गदर्शन करण्यात येत आहे.
संयुक्त मित्र मंडळाचे अध्यक्ष निलेश पायगुडे, कार्याध्यक्ष हृषीकेश रिसबूड, जंयत बनकर, राजेश मारणे, आदित्य मारणे, चैतन्य मारणे आणि मंडळाचे सभासद व कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार पीयुष शाह यांनी मानले….

चैन स्नॅचिंग करणाऱ्या जोडीला चतु:शृंगी पोलिसांनी केले गजाआड

पुणे- चैन स्नॅचिंग करणाऱ्या दोघा मित्रांना चतु:शृंगी पोलीस स्टेशन तपास पथकाने शिताफीने पकडून गजाआड केले आहे त्यांच्याकडून , दोन लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. १) संजय रमेश बाबरे, वय 29 वर्ष, रा. मु पो लोणी बुद्रुक, हसनापुर रोड, विखे वस्ती, ता. राहता, जि. अहमदनगर व २) राहुल रमेश मावस, वय 24 वर्ष, रा. मु. नादी, पो. वीरगाव, ता. वैजापूर, जि. छत्रपती संभाजीनगर अशी या दोघांची नावे आहेत

या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’दिनांक ११/०९/२०२४ रोजी चतुशृंगी पोलीस स्टेशन कडील गु र क्र ७३७/२०२४ भा न्या सं कलम ३०९(४),३(५) या जबरी चोरीच्या गुन्ह्याचा तपास पथकातील अधिकारी व अंमलदार हे तपास करत असताना सपोनी नरेंद्र पाटील व पो शि भांगले यांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासून व गोपनीय बातमीदाराकडून माहिती काढून सदरचा गुन्हा हा संजय बाबरे व राहुल मावस यांनी केला असून ते बालेवाडी येथे त्यांच्या नातेवाईकांकडे आल्या बाबत माहिती मिळाली. सदरबाबत चतु:शृंगी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी यांना माहिती दिली असता त्यांनी आरोपींना ताब्यात घेऊन कायदेशीर कारवाई करण्याबाबत आदेश दिल्याने सपोनि नरेंद्र पाटील, पोलीस हवालदार दुशिंग, पोलीस हवालदार दुर्गे, पोलीस शिपाई भांगले व तरंगे यांनी बालेवाडी, पुणे येथे सापळा रचून इसम नामे १) संजय रमेश बाबरे, वय 29 वर्ष, रा. मु पो लोणी बुद्रुक, हसनापुर रोड, विखे वस्ती, ता. राहता, जि. अहमदनगर व २) राहुल रमेश मावस, वय 24 वर्ष, रा. मु. नादी, पो. वीरगाव, ता. वैजापूर, जि. छत्रपती संभाजीनगर यांना शिताफीने पाठलाग करून ताब्यात घेतले.

या चोरट्यांना अटक करून पोलीस कस्टडी दरम्यान त्यांनी जबरी चोरी केलेले एक लाख रुपये किमतीचे दीड तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र व गुन्हा करताना वापरलेली एक लाख रुपये किमतीची पल्सर मोटरसायकल असा एकूण २,००,०००/- रु कि चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.हि मोटरसायकल ही देखील चोरी केल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाल्याने येवला तालुका पोलीस स्टेशन, नाशिक ग्रामीण, गु. नों. क्र. २१०/२०२४ भा द वि कलम ३७९ हा वाहन चोरीचा गुन्हा देखील उघड करण्यात आला आहे.
हि कारवाई ही पोलीस आयुक्त, अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील, पोलीस उपायुक्त परिमंडळ 4 हिम्मत जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त खडकी विभाग अनुजा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी चतुशृंगी पोलीस स्टेशन, पोलीस निरीक्षक गुन्हे युवराज नांद्रे, विजयानंद पाटील, सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील व तपास पथकातील अंमलदार पोलीस हवालदार दुशिंग, दुर्गे, पो शि भांगले,पोलीस शिपाई खरात,तरंगे यांनी केली आहे.

गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये वीजसुरक्षेबाबत सतर्क राहा

पुणे, दि. १५ सप्टेंबर २०२४पुणेकरांच्या सर्वाधिक उत्साहाच्या व आनंदाच्या गणेशोत्सवामध्ये मंडळांनी उभारलेले देखावे, विद्युत रोषणाई पाहण्यासाठी भाविकांची गर्दी वाढली आहे. या उत्सवात सुरळीत वीजपुरवठा व वीज सुरक्षेसाठी महावितरणची पुणे परिमंडल अंतर्गत यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. पुणे व पिंपरी चिंचवड शहर तसेच मुळशी, वेल्हे, हवेली, आंबेगाव, जुन्नर, खेड व मावळ तालुक्यांमध्ये सुमारे ४ हजार ५७५ अभियंते, तांत्रिक कर्मचारी तसेच दुरुस्ती कामांसाठी नेमलेल्या कंत्राटदारांचे कर्मचारी आवश्यक साहित्य व साधनसामुग्रीसह वीज ग्राहकांना सेवा देत आहेत. गणेशोत्सव व विसर्जन मिरवणुकीमध्ये वीजसुरक्षेसाठी विशेष खबरदारी घेण्यात यावी असे आवाहन महावितरणने केले आहे.

गणेशोत्सवामध्ये मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार वीजपुरवठ्याचा सातत्याने आढावा घेत आहे. तसेच वीजसुरक्षेसाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. यामध्ये सार्वजनिक गणेश मंडळांची ठिकाणे आणि मोठ्या मिरवणुका निघणारे मार्ग या ठिकाणी गणेशोत्सवापूर्वी वीजयंत्रणेची पाहणी करून देखभाल व दुरूस्तीचे कामे करण्यात आली आहेत. गर्दीच्या ठिकाणी किंवा मिरवणुकीच्या मार्गावर नागरिक किंवा लहान मुले फिडर पिलरवर चढू नयेत यासाठी फिडर पिलरवर खिळे लावण्यात आले आहेत. गणेशोत्सवाच्या मंडपामध्ये शॉर्टसर्कीट होणे, विद्युत वायरिंगमध्ये बिघाड होणे आदी कारणांमुळे संभाव्य धोके टाळण्यासाठी तसेच तातडीच्या मदतीची गरज भासल्यास पुणे व पिंपरी चिंचवड शहर, आंबेगाव, जुन्नर, मावळ, खेड, मुळशी, वेल्हे, हवेली तालुक्यांसाठी ७८७५७६७१२३ हा विशेष संपर्क क्रमांक दि. १८ सप्टेंबरपर्यंत उपलब्ध आहे. यासोबतच कोणत्याही तक्रारींसाठी १९१२ किंवा १८००२१२३४३५ किंवा १८००२३३३४३५ हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध राहणार आहे. 

विसर्जन मिरवणुकींच्या कालावधीत मोबाईल व्हॅन व आवश्यक साधनसामुग्रीसह अभियंता व कर्मचाऱ्यांचे पथक उपलब्ध राहणार आहे. शहरातील महत्त्वाच्या लक्ष्मी रोड व टिळक रोडवरील विसर्जन मिरवणुकीसाठी मोदी गणपती परिसरात तात्पुरता नियंत्रण कक्ष सुरू करण्यात येणार आहे. या ठिकाणी अभियंते व कर्मचार्‍यांची विशेष नियुक्ती करण्यात येत आहे. मिरवणूक संपेपर्यंत हा कक्ष कार्यान्वित राहील. तसेच सार्वजनिक गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीतील मार्गावर उच्च व लघुदाबाच्या वीजवाहिन्या, रोहित्र, फिडर पिलर आदी यंत्रणेपासून आबालवृद्धांसह भाविक मंडळी सुरक्षित अंतरावर राहतील यासाठी महावितरणचे कर्मचारी त्या-त्या ठिकाणी देखरेख करणार आहे. प्रामुख्याने लहान मुले तसेच नागरिकांनी देखावे किंवा मिरवणूक पाहण्यासाठी वीजयंत्रणा किंवा फिडर पिलरवर चढू नये किंवा त्याचा आधार घेऊ नये तसेच असा कोणी प्रयत्न करीत असेल तर त्या व्यक्तीस परावृत्त करावे. तसेच ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये उभे राहून उंच झेंडे उंचावताना उपरी वीज वाहिन्यांपासून सावध राहावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

राजेंद्र पवार, मुख्य अभियंता पुणे परिमंडल- ‘सुरळीत वीजपुरवठ्यासोबतच लाखो भाविकांच्या अलोट गर्दीमध्ये सार्वजनिक ठिकाणी असलेली महावितरणची वीजयंत्रणा निर्धोक ठेवण्यासाठी देखभाल व दुरुस्तीच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. प्रामुख्याने विसर्जन मिरवणुकीमध्ये महावितरणचे अभियंते, कर्मचाऱ्यांनी तसेच गणेश मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वीज सुरक्षेबाबत सतर्क व सजग राहावे. तसेच सर्व नागरिकांनी वीजयंत्रणेपासून योग्य सुरक्षित अंतर राखावे’.

धायरीत पदपथ नसल्याने रस्ते बनले मृत्यूचा सापळे पालिकेचे दुर्लक्ष: आम आदमी पक्षाचा आंदोलनांचा इशारा

पुणे:सिंहगड रस्त्यावरील दाट लोकवस्तीच्या धायरी येथील बेनकरमळा, रायकर मळा, महादेव मंदिर , बारांगणी मळा,डीएसके रोड धनगर वस्ती परिसरात पदपथ नसल्याने पदचारी नागरिकांना मोठ्या संकटाना तोंड द्यावे लागत आहे.
वाहतूक कोंडी, वाढत्या अपघातांमुळे दररोज मृत्यूशी झुंज देत नागरिकांनी प्रवास करावा लागत आहे.
या परिसरातील सर्व रस्त्यावर पदपथ करण्यात यावे यासाठी पालिका प्रशासनाकडे गेल्या वर्षभरात पासून वेळोवेळी पाठपुरावा करूनही दुर्लक्ष करण्यात आले आहे. पदपथ तयार करण्याची कार्यवाही तातडीने सुरू करण्यात यावी अन्यथा तीव्र जन आंदोलन करण्याचा इशारा पुणे शहर आम आदमी पक्षाने दिला आहे.या बाबत आम आदमी पक्षाचे शहर अध्यक्ष धनंजय बेनकर यांनीप्रशासनाला निवेदन दिले आहे.

जागा मालक, स्थानिक रहिवासी व बंगले मालकांच्या आडमुठेपणा ,हेकेखोरपणा मुळे नव्याने स्थायिक झालेल्या नागरिकांना अपमानास्पद वागणूक देण्यात येत आहे. आपल्या बंगल्यात , दुकानात पावसाचे पाणी शिरु नये यासाठी रस्त्याच्या कडेला मोठमोठे सिमेंटचे कठडे बांधले आहेत. त्यामुळे पदचाऱ्यांसह नागरिकांना धोकादायक प्रवास करावा लागत आहे.
सर्वसामान्य पदचाऱ्यांना, प्रवाशांना कोणी वाली नसल्याचे गंभीर चित्र धायरी गाव व परिसरात आहे.
.या परिसरात अपघात झाल्यास कठडे बांधणाऱ्या वर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी आम आदमी पक्षाने केली आहे.

रस्त्यावरूनच वृध्द, शाळकरी मुले, महिला नागरिकांना ये जा करावी लागत आहे वाढती वाहतुक व लोकसंख्येमुळे रस्तेही अपुरे पडत आहेत तर दुसरीकडे रस्त्यावर अतिक्रमणे करुन अनेक रहिवाशांनी, दुकानदारांनी सिमेंटचे कठडे,शेड उभारले आहेत. अनेक ठिकाणी मोठ मोठे दगडही ठेवले आहेत.
झाडांच्या काटेरी फांद्याही रस्त्यावर लोंबकळत आहेत . त्यामुळे शाळकरी मुले,नागरिकांना रस्त्यावरून पायी चालताना मोठी कसरत करावी लागत आहे.
आम आदमी पक्षाचे शहर अध्यक्ष धनंजय बेनकर म्हणाले,
मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला शालेय विद्यार्थी,पदचाऱ्यांसाठी पदपथ करण्यात यावेत . रस्त्यावरील रहिवाशांना नोटीसा देऊन उभारण्यात आलेले बेकायदा कठडे शेड काढून टाकवेत तसेच झाडाच्या धोकादायक फांद्या तोडून रस्ता मोकळा करण्यात यावा.