अखिल मंडई मंडळ : गणेशोत्सवाचे १३१ वे वर्ष
पुणे : अखिल मंडई मंडळाची विसर्जन मिरवणूक ‘आदिशक्ती’रथातून निघणार आहे. रौद्र रुपातील कालीमातेची १५ फूट उंचीची मूर्ती यामध्ये असेल. दरवर्षी मिरवणूकीत श्री शारदा गजाननाचे फक्त समोरुनच दर्शन घेता येते त्यामुळे यंदा प्रथमच शारदा गणपतीची मूर्ती ६० अंशात फिरणार असून दोन्ही बाजूने भाविकांना दर्शन घेता येणार आहे. रथाची उंची कमी करण्यासाठी हायड्रोलिक तंत्रज्ञानाचा देखील वापर करण्यात आले आहे. गणेशोत्सवाची सांगता मिरवणूक अनंत चतुर्दशीला मंगळवार, दिनांक १७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता निघणार आहे. अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात यांनी दिली.
मंडळाचे गणेशोत्सवाचे यंदा १३१ वे वर्ष आहे. रथाचा आकार १४ बाय १८ आणि उंची २७ फूट आहे. मेट्रोच्या लकडीपूल येथील पूलामुळे हायड्रोलिक तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. कलादिग्दर्शक विशाल ताजणेकर आणि सहकाऱ्यांनी रथ साकारला आहे.
आदिशक्ती रथावर आकर्षक विद्यूत रोषणाई करण्यात आली आहे. मिरवणूकीच्या अग्रभागी जयंत नगरकर बंधू यांचे नगारावादन त्यामागे गंधर्व बँड तसेच शिवगर्जना आणि शिवमुद्रा वाद्य पथकाचे वादन मिरवणूकीत होणार आहे.