भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सच्या विद्यार्थ्यांचे सादरीकरण : ३६ वा पुणे फेस्टिवल
पुणे : अभंग, गवळण सह कव्वाली आणि गझल च्या दमदार सादरीकरणासोबतच कथकचे सौंदर्य उलघडणारे पारंपारिक चालीतील बंदिश असणारे चतुरंग आणि फ्रेंच संगीतावर आधारित शास्त्रीय नृत्य संयुज, आसामी प्राचीन नृत्यशैली सत्रीय नृत्याचे सादरीकरण अशा विविध कलाकृतींचा एकत्रित कलाविष्कार बघण्याची पर्वणी पुणेकरांना बालगंधर्व रंगमंदिरात मिळाली. भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सच्या हरहुन्नरी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलाविष्काराला पुणेकरांनी भरभरून दाद दिली.
भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सच्या विद्यार्थ्यांचा ३६ व्या पुणे फेस्टिवल मध्ये ‘आविष्कार भारती’ कार्यक्रम सादर झाला. यावेळी भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे कुलपती प्रो.डॉ. शिवाजीराव कदम, स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सचे संचालक डॉ. शारंगधर साठे, पुणे फेस्टिव्हलचे मुख्य समन्वयक अभय छाजेड, समन्वयक मोहन टिल्लू उपस्थित होते.
गुरु पंडिता रोहिणी भाटे, पंडिता मनीषा साठे, डॉ. सुचेता चापेकर,पंडिता शमा भाटे, डॉ. स्वाती दैठणकर अरुंधती पटवर्धन व डॉ देविका बोरठाकूर या ज्येष्ठ गुरूंच्या शिष्या जे स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्टसचे विद्यार्थी आहेत त्यांनी कार्यक्रमात सादरीकरण केले. सुरंजन खंडाळकर व शुभम खंडाळकर आणि नंदिनी गायकवाड व अंजली गायकवाड यांनी गायन केले.
कार्यक्रमाची सुरुवात प्रथम तुला वंदितो या गणेश वंदनेने झाली. त्यानंतर अंजली गायकवाड हिने सादर केलेल्या ‘मन मंदिरा तेजाने’ या गाण्याला पुणेकरांनी वन्स मोर म्हणत दाद दिली. रघुनाथ खंडाळकर यांनी संगीत दिलेला ‘बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल’ हा अभंग सुरंजन खंडाळकर याने सादर केला. ‘वृंदावनी वेणू वाजे’ ही अंजली गायकवाड यांनी सादर केलेल्या गवळणीला रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. या संगीत मैफिलीत पुढे सादर झालेल्या गुलाम अली यांची गझल आणि यार इलाही या कव्वालीला देखील श्रोत्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमातील दुसऱ्या भागाची सुरुवात गणेश वंदनेने झाली. हिंदुस्तानी आणि कर्नाटकी संगीताचा सुंदर मिलाफ असणाऱ्या ‘जय रंग रंग’ या नृत्याच्या नयनरम्य सादरीकरणाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. पंडिता रोहिणी भाटे यांनी रचलेल्या शिवस्तुतीवर विद्यार्थिनींनी सादरीकरण केले त्यानंतर देवीची विविध रूपे श्लोकात गुंफून देवीला वंदन करण्यात आले. शुद्ध नृत्याची रचना त्रिवट विद्यार्थिनींनी सादर करुन अप्रतिम नृत्याचा आनंद दिला. वैष्णव सांप्रदायावर आधारित ईशान्य भारतातील सत्रिय नृत्य शैलीत कलाकारांनी श्रीकृष्ण वंदना सादर केली. फ्रेंच संगीतकार रावेल यांच्या बोलेरो या रचनेवर हिंदुस्थानी संगीताचा साज असलेल्या कथकनृत्याला रसिकांनी दाद दिली. अभिनय या रचनेतील ‘सुनो द्रौपदी शस्त्र उठाओ गोविंद अब नही आयेंगे’ या महिलांच्या सशक्तिकरणावर भाष्य करणारे सादरीकरण वैशिष्ट्यपूर्ण ठरले. मल्हार जाम या रचनेच्या कथक नृत्यातील सुंदर प्रस्तुतीने कार्यक्रमाचा समारोप झाला. कार्यक्रमाचे निवेदन स्वरदा कुलकर्णी यांनी केले.
शारंगधर साठे म्हणाले, विद्यार्थ्यांना त्यांची कला सादर करण्यासाठी चांगले व्यासपीठ मिळवून देण्यासाठी महाविद्यालय नेहमीच प्रयत्नशील असले. रसिकांनी देखील विद्यार्थ्यांना भरभरुन दाद दिली.