दानाची पावतीच मिळाली नाही; ‘चंपत राय म्हणाले – मी काही करू शकत नाही, जिथे जायचे तिथे जा’ असा आरोप
अयोध्या | प्रतिनिधी
अयोध्या राम मंदिरातील देणगी चोरीच्या प्रकरणाची चर्चा सुरू असतानाच माजी केंद्रीय गृहसचिव तथा माजी IAS अधिकारी लक्ष्मी नारायण यांनी सुमारे पाच कोटी रुपये किमतीच्या सुवर्णजडित रामचरितमानसाच्या कथित गायब होण्याबाबत गंभीर आरोप केले आहेत. राम मंदिर ट्रस्टला दान दिलेल्या रामचरितमानसाची आजपर्यंत पावती मिळाली नसून काही महिन्यांतच तो ग्रंथ मंदिरातून गायब झाल्याचा दावा त्यांनी केला आहे.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना लक्ष्मी नारायण म्हणाले की, ८ एप्रिल २०२४ रोजी चैत्र नवरात्रीच्या पहिल्या दिवशी त्यांनी १.२५ क्विंटल वजनाचे सुवर्णजडित रामचरितमानस राम मंदिर ट्रस्टला दान केले होते. काही महिन्यांनंतर त्यांचे नातेवाईक अयोध्येला गेले असता मंदिरात तो ग्रंथ दिसला नाही. त्यानंतर त्यांनी स्वतः अयोध्येत जाऊन चौकशी केली.
त्यांच्या म्हणण्यानुसार, राम मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी त्यांना तब्बल नऊ तास प्रतीक्षा करायला लावली. त्यानंतर झालेल्या भेटीत त्यांनी विनंती केली की, “ही माझ्या आयुष्यभराची कमाई आहे. माझ्या आईचे दागिने वापरून हा ग्रंथ तयार केला आहे. कृपया तो रामलल्लाजवळ ठेवा.” मात्र, चंपत राय यांनी “अनेक लोक विविध वस्तू दान करतात, त्या सर्व प्रदर्शनात ठेवायच्या का?” असा सवाल केल्याचा दावा त्यांनी केला.
लक्ष्मी नारायण यांनी सांगितले की, या रामचरितमानसावर सुमारे ८०० ग्रॅम सोन्याचा मुलामा असून तो तयार करण्यासाठी मोठे परिश्रम घेण्यात आले. नवीन संसद भवनातील ‘सेंगोल’ तयार करणाऱ्या कारागिरांनीच हा ग्रंथही तयार केला, असे त्यांनी सांगितले.
त्यानंतर त्यांनी मंदिर बांधकाम समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा, ट्रस्ट सदस्य गोपाल राव तसेच इतर संबंधितांशी संपर्क साधला. ५० हून अधिक व्हॉट्सॲप संदेश आणि १० ते १२ पत्रे पाठवूनही कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप त्यांनी केला.
पुन्हा अयोध्येला गेल्यानंतर चार तास प्रतीक्षा करून चंपत राय यांची भेट घेतली असता, “मी काही करू शकत नाही, तुम्हाला जिथे जायचे असेल तिथे जा,” असे उत्तर मिळाल्याचा दावा त्यांनी केला. त्यानंतर उत्तर प्रदेश सरकारच्या एका सल्लागाराने “देणगी दिली आहे, ती विसरून जा,” असा सल्ला दिल्याचेही त्यांनी सांगितले.
लक्ष्मी नारायण यांनी सांगितले की, नंतर राम मंदिरातील देणग्यांबाबतचे वृत्त समोर आल्यानंतर त्यांनी पुन्हा हा विषय उपस्थित करण्याचा निर्णय घेतला. आजही दानाची अधिकृत पावती मिळालेली नसल्याचा त्यांनी दावा केला आहे.
दरम्यान, या आरोपांवर राम मंदिर ट्रस्टकडून अधिकृत स्पष्टीकरण किंवा प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही.

