पुणे: डीजेमध्ये वेगवेगळ्या मोठ्या आवाजासाठी ‘प्रेशर मीड’ उपकरणाचा वापर केला जातो. कर्णकर्कश आवाजामुळे ध्वनी प्रदूषण होते. त्याचे मानवी शरीरावर घातक परिणाम होतात. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी असे प्रेशर मीड वापरणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.
तसेच डीजेवर लेसर लाईट लावल्यास जागेवरच डीजे जप्त करून गुन्हे दाखल करण्याचा इशारा देखील पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे. लेसर लाईटमुळे गेल्यावर्षी अनेकांच्या डोळ्यांना मिरवणुकीत गंभीर इजा झाल्या होत्या.
ध्वनिप्रदूषणाबाबत सर्वोच्च न्यायालय, तसेच राष्ट्रीय हरित न्यायाधीकरणाने निर्देश दिले आहेत. आदेशाचे उल्लंघन केल्यास विसर्जन मिरवणुकीत उच्च क्षमतेची ध्वनिवर्धक यंत्रणा वापरणारे डीजे, तसेच ध्वनिवर्धक पुरवठादारांविरोधात कारवाई करण्यात येईल. त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करुन डीजे यंत्रणा जप्त करण्यात येईल, असे विशेष शाखेचे पोलिस उपायुक्त जी. श्रीधर यांनी आदेशात म्हटले आहे.रात्री १२ वाजता ध्वनिवर्धक बंदच ठेवावे लागतील अन्यथा कोणाचेही मंडळ असो तत्क्षणी कारवाई होईल असे त्यांनी म्हटले आहे.
ड्रोनच्या वापरासाठी पोलिसांची परवानगी गरजेची..
ड्रोन कॅमेऱ्यांच्या वापरास पोलिसांकडून परवानगी मिळविणे आवश्यक आहे. विसर्जन मिरवणुकीत ड्रोन कॅमेरा वापरणाऱ्यांनी विशेष शाखेच्या पोलिस उपायुक्तांकडे अर्ज करावेत. परवानगीशिवाय ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर केल्यास भारतीय न्याय संहिता कलम २२३ अन्वये कारवाई करण्यात येईल. विनापरवानगी ड्रोन वापरणाऱ्यांविरोधात कारवाईच्या सूचना शहरातील सर्व पोलिस ठाण्यांना देण्यात आल्या आहेत.
घातक लेसर लाईटवरही कारवाई…
गेल्या वर्षी विसर्जन मिरवणुकीत लेसर लाईटचा वापर करण्यात आला होता. घातक लेसर लाईटमुळे अनेकांना त्रास झाल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. कोल्हापूरमध्ये लेसर झोतांमुळे तिघांच्या डोळ्यांना इजा पोहोचल्याची घटना नुकतीच घडली होती. विसर्जन मिरवणुकीत लेसर लाईटचा वापर करणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचा इशारा देण्यात आला आहे. दहीहंडीनिमित्त आयोजित कार्यक्रमावेळी लेसर दिव्यांचा वापर करणाऱ्यांविरुद्ध हडपसर पोलिसांकडून नुकतेच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.