कनेक्टिव्हीटी वाढवणाऱ्या सहा वंदे भारत गाडयांना हिरवा झेंडा दाखवून केले रवाना
टाटानगर-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून टाटानगर, झारखंड येथे 660 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध रेल्वे प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण केले. त्यांनी 32 हजार प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण (PMAY-G) लाभार्थ्यांना मंजुरी पत्रे वितरित केली. तत्पूर्वी मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे टाटानगर जंक्शन रेल्वे स्थानक येथे सहा वंदे भारत गाडयांना हिरवा झेंडा दाखवला.
बाबा बैद्यनाथ, बाबा बासुकीनाथ आणि भगवान बिरसा मुंडा यांच्या भूमीसमोर नतमस्तक होऊन पंतप्रधानांनी भाषणाला सुरुवात केली. त्यांनी झारखंडमधील कर्मपर्वच्या शुभ पर्वाचा उल्लेख केला जे निसर्गाची पूजा करण्यासाठी समर्पित आहे आणि आज रांची विमानतळावर आगमन झाल्यावर एका महिलेने त्यांना कर्मपर्वचे एक प्रतीक भेट दिल्याचे त्यांनी अधोरेखित केले. ते म्हणाले की कर्मपर्वाचा एक भाग म्हणून महिला आपल्या भावांसाठी समृद्ध जीवनाची प्रार्थना करतात. त्यांनी या शुभ प्रसंगी आपल्या शुभेच्छा दिल्या आणि सांगितले की झारखंडला आज सहा नवीन वंदे भारत गाड्या, 600 कोटींहून अधिक खर्चाचे विकास प्रकल्प आणि पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत राज्यातील लोकांसाठी पक्क्या घरांची भेट मिळाली आहे. मोदी यांनी या प्रकल्पांबद्दल झारखंडमधील जनतेचे तसेच आज वंदे भारत कनेक्टिव्हिटी मिळालेल्या इतर राज्यांच्या जनतेचे अभिनंदन केले.
आधुनिक विकास केवळ काही राज्यांपुरता मर्यादित होता आणि झारखंडसारखी शहरे आणि राज्ये मागे राहिली त्या काळाची आठवण पंतप्रधानांनी करून दिली आणि ‘सबका साथ सबका विकास’ या मंत्राने देशाच्या विचारसरणीत आणि प्राधान्यक्रमात परिवर्तन घडवून आणल्याचे अधोरेखित केले. “गरीब, आदिवासी, दलित, वंचित, महिला, तरुण आणि शेतकरी हे देशाचे प्राधान्य आहेत”, असे पंतप्रधानांनी नमूद केले.
आज प्रत्येक शहराला आणि प्रत्येक राज्याला कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी वंदे भारत ट्रेन हवी आहे असे पंतप्रधान म्हणाले. काही दिवसांपूर्वी भारताच्या उत्तर आणि दक्षिणेकडील राज्यांसाठी तीन नवीन वंदे भारत गाडयांना हिरवा झेंडा दाखवून रवाना केल्याची आठवण त्यांनी करून दिली आणि आज सहा नवीन वंदे भारत गाड्यांना हिरवा झेंडा दाखवल्याचा उल्लेख त्यांनी केला. या गाड्यांचा पहिला प्रवास सुरू झाला आहे. पंतप्रधान मोदी यांनी अधोरेखित केले की पूर्व भारतातील रेल्वे कनेक्टिव्हिटीच्या विस्तारामुळे या प्रदेशाची अर्थव्यवस्था मजबूत होईल आणि उद्योग , व्यावसायिक आणि विद्यार्थ्यांना मोठा लाभ होईल. सहा नवीन वंदे भारत गाड्यांमुळे सांस्कृतिक उपक्रमांना चालना मिळणार आहे. याबाबत बोलताना पंतप्रधानांनी नमूद केले की, वाराणसी-देवघर वंदे भारत गाडी सुरु झाल्यामुळे भारतातून आणि जगभरातून काशीला भेट देणाऱ्या यात्रेकरूंना आता देवघरमधील बाबा बैद्यनाथाचे दर्शन घेण्याची संधी मिळणार आहे. ते म्हणाले की यामुळे या प्रदेशातील पर्यटनाला चालना मिळेल तसेच टाटानगरच्या औद्योगिक विकासाला देखील प्रोत्साहन मिळेल आणि त्यातून तरुणांसाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील. आजच्या विविध विकास प्रकल्पांकडे लक्ष वेधून मोदी म्हणाले, “आधुनिक रेल्वे संबंधी पायाभूत सुविधा वेगवान विकासासाठी आवश्यक आहेत ”. त्यांनी देवघर जिल्ह्यातील मधुपूर बायपास लाईनची पायाभरणी केल्याचा उल्लेख केला ज्यामुळे हावडा-दिल्ली मेनलाइनवरील गाड्यांचा खोळंबा टाळण्यास मदत होईल आणि गिरिडीह आणि जसिडीह दरम्यान प्रवासाचा वेळ कमी करण्यात मदत होईल. त्यांनी हजारीबाग जिल्ह्यातील हजारीबाग टाउन कोचिंग डेपोचा देखील उल्लेख केला ज्यामुळे या स्टेशनवर स्थानकावर कोचिंग स्टॉकची देखभाल सुलभ करण्यात मदत होईल. ते म्हणाले की कुरकुरा- कनारोआं मार्गाच्या दुहेरीकरणामुळे झारखंडमधील रेल्वे कनेक्टिव्हिटीला चालना मिळेल आणि पोलाद उद्योगांबरोबर कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत होईल.
झारखंडच्या सर्वांगीण विकास आणि प्रगतीसाठी केंद्र सरकारने तेथील गुंतवणुकीत वाढ केली असून विकासकामांचा वेगही वाढवल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. झारखंडमधील रेल्वे पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणासाठी यावर्षीच्या अर्थसंकल्पात 7000 कोटींपेक्षा अधिक रक्कम मंजूर केल्याचे त्यांनी सांगितले.ही रक्कम दहा वर्षांपूर्वी तरतूद केलेल्या रकमेच्या सोळापट रक्कम असल्याचेही ते म्हणाले. नवीन मार्ग विकसित करणे असो किंवा विद्यमान मार्गांचे विद्युतीकरण, दुपदरीकरण, स्थानकांवर नवीन पायाभूत सुविधांची उभारणी, सर्व कामे वेगाने सुरू असल्याचे सांगून, पंतप्रधानांनी- रेल्वे अर्थसंकल्पातील रक्कम वाढवण्याचे फायदे लोकांना समजावून सांगितले. रेल्वे मार्गांचे 100% विद्युतीकरण झालेल्या राज्यांमध्ये झारखंडचा समावेश असल्याबद्दल त्यांनी झारखंडचे कौतुक केले. अमृत भारत रेल्वे स्थानक योजनेतून झारखंडमधील 50 पेक्षा अधिक स्थानकांना नवे रूप दिले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
प्रधानमंत्री आवास योजना- ग्रामीण (PMAY-G) चा पहिला टप्पा आजपासून सुरू होत असून त्यातून सहस्रावधी लाभार्थ्यांना पक्की घरे मिळतील असे त्यांनी आवर्जून नमूद केले. स्वच्छतागृह, पेयजल, वीज, गॅसजोडणी अशा अन्य सुविधाही PMAY-G च्या बरोबर पुरवल्या जातात असे त्यांनी सांगितले. एखाद्या कुटुंबाला घर मिळाल्यावर त्या कुटुंबीयांचा आत्मविश्वास उंचावतो आणि वर्तमानात स्थैर्य मिळण्याबरोबरच ते अधिक चांगल्या भविष्याचा विचार करू लागतात. पीएम-आवास योजनेतून पक्की घरे पुरवण्याबरोबरच झारखंडच्या गावांत आणि शहरांत हजारोंच्या संख्येने रोजगारनिर्मिती होत असल्याचे पंतप्रधान म्हणाले.
2014 पासून देशातील गरीब, दलित, वंचित आणि आदिवासी कुटुंबांच्या सक्षमीकरणासाठी अनेक महत्त्वपूर्ण पावले उचलल्याचे त्यांनी सांगितले. झारखंडसह देशभरच्या आदिवासी समुदायांसाठी पीएम जनमन योजना चालवली जाते. या योजनेच्या माध्यमातून अत्यंत मागासवर्गीय जमातींपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न केले जात असून, अशा कुटुंबांपर्यंत व्यक्तिशः पोहोचून त्यांना घरे, रस्ते, वीज, पाणी, शिक्षण अशा सुविधा पुरवण्यासाठी अधिकारी प्रयत्न करतात, असे पंतप्रधानांनी सांगितले. असे प्रयत्न म्हणजे, विकसित अशा झारखंडच्या निर्मितीसाठी सरकारने केलेल्या निश्चयाचा एक भाग होत, असे ते म्हणाले. व्याख्यानाचा समारोप करताना पंतप्रधानांनी या निश्चयाची पूर्तता होईल आणि जनतेच्या आशीर्वादाने झारखंडच्या स्वप्नांची परिपूर्ती होईल, असा विश्वास व्यक्त केला. खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर उतरणे शक्य नसल्याने कार्यक्रमाला प्रत्यक्ष उपस्थित राहू नसल्याबद्दल पंतप्रधानांनी विनम्रपणे जनतेची क्षमा मागितली. त्यामुळे प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन दूरदर्शन माध्यमातून करावे लागल्याचे त्यांनी सांगितले.
झारखंडचे राज्यपाल संतोष गंगवार, तसेच केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान यावेळी उपस्थित होते.
पार्श्वभूमी -:
पंतप्रधानांनी 660 कोटींपेक्षा अधिक मूल्याच्या विविध रेल्वे प्रकल्पांचा शिलान्यास आणि लोकार्पण केले. यामध्ये देवघर जिल्ह्यातील मधुपुर बायपास मार्गाचा आणि हजारीबाग जिल्ह्यातील हजारीबाग टाउन कोचिंग डेपोचा शिलान्यास समाविष्ट आहे. मधुपुर बायपासचे काम पूर्ण झाल्यानंतर, हावडा दिल्ली मेन लाईन वरील गाड्या थांबवून ठेवण्याची गरज पडणार नाही. तसेच गिरीडिह ते जसीडिह या प्रवासाचा वेळही वाचेल. तर हजारीबाग टाउन कोच डेपोचे काम पूर्ण झाल्यानंतर येथील डब्यांच्या देखभाल-दुरुस्तीचे काम सोपे होईल.
पंतप्रधान मोदी यांनी कुरकुरा-कनारों दुपदरीकरण प्रकल्पाचे लोकार्पण केले. त्यासह बोंडामुंडा- रांची सिंगल लाईन सेक्शनचा एक भाग, रूरकेला -गोमोह रूट(रांचीमार्गे) याचा एक भाग, तसेच मुरी आणि चंद्रपुरा स्थानके यांचेही लोकार्पण केले. यामुळे मालवाहतूक आणि प्रवासी वाहतूक अधिक सुखकर होणार आहे. याशिवाय रस्त्या खालून जाणाऱ्या चार सेतूंचे लोकार्पणही करण्यात आले असून यामुळे सर्वसामान्य लोकांना अधिक सुरक्षित प्रवास करता येणार आहे.
‘सर्वांसाठी घरे’ या वचनाची पूर्तता करण्याच्या दिशेने पंतप्रधानांनी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण या योजनेसाठी झारखंडमधील लाभार्थ्यांना 32,000 अनुमतीपत्रे वितरित केली. सदर लाभार्थ्यांना अर्थसाहयाचा पहिला हप्ताही त्यांनी सुपूर्द केला. तर 46,000 लाभार्थ्यांचा गृहप्रवेश साजरा करण्याच्या कार्यक्रमातही पंतप्रधान सहभागी झाले.