Home Blog Page 700

सातारा रस्त्यावर डी-मार्टचे समोर पोटाला चाकू लावुन एकाला लुटले

पुणे- स्वारगेट ते कात्रज दरम्यानच्या सातारा या हम रस्त्यावर रांका ज्वेलर्स आणि बडी बडी शोरूम्स असलेला वाळवेकर लॉन्स सारखा परिसर असलेल्या डी मार्ट समोर एकाच्या पोटाला चाकू लाऊन चार चोरट्यांनी एकाची ६१ हजाराची जबरी लुट केली.गणेशोत्सव काळात पहाटे पावणेचार वाजण्याच्या सुमारास हि चोरी अज्ञात चोरट्यांनी केली या प्रकरणी भा. न्या. संहिता कलम ३०९ (४), ३(५) अन्वये एका २१ वर्षीय बिबवेवाडीत राहणाऱ्या तरुणाने पोलिसात तक्रार नोंदविली आहे त्याला लुटणाऱ्या मोटार सायकल वरिल चार अज्ञात भामट्यांचा सहकारनगर पोलीस शोध घेत आहेत.
दि.१०/०९/२०२४ रोजी पहाटे ०३/३५ वा. ये सुमारास पुणे सातारा रोड येथील डी-मार्टचे समोर
पुणे येथे यातील फिर्यादी हे ट्रॅव्हल्स गाडीतून मधून उतरून वर नमुद ठिकाणी थांबले असताना मोपेड गाडी वरून आलेल्या चार अनोळखी इसमांनी फिर्यादी यांना घेरून त्यातील एका इसमाने त्याचेकडील चाकु फिर्यादीच्या पोटाला लावुन त्याचा धाक दाखवुन फिर्यादी यांचे खिशातील रोख ३,०००/- रू.व एक मोबाईल असा एकुण ६१,०००/- रू. किमतीचा मुद्देमाल जबरी चोरी करून नेला आहे.फौजदार सागर पाटील मो.नं.८४२४००३९९२ यापाराक्र्णी अधिक तपास करत आहेत.

मयूरपंख रथा’तून रात्री आठ वाजता निघणार भाऊ रंगारी बाप्पाची विसर्जन मिरवणूक

पुणे : हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती असलेल्या ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’च्या बाप्पाची विसर्जन मिरवणूक दरवर्षीप्रमाणे यंदाही आकर्षक विद्युत रोषणाईने सजवलेल्या मयूरपंख रथामधून निघणार आहे. मंगळवारी रात्री आठ वाजता टिळक पुतळा येथून या विसर्जन मिरवणुकीला सुरवात होईल, अशी माहिती ट्रस्टचे विश्वस्त आणि उत्सव प्रमुख पुनीत बालन यांनी दिली.

‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती’च्या मिरवणुकीबाबत माहिती देताना उत्सवप्रमुख पुनीत बालन म्हणाले, ‘‘दरवर्षीप्रमाणे यंदाही बाप्पाची विसर्जन मिरवणूक लक्षवेधक अशीच असेल.

आचार्य स्वामी गोविंद गिरी महाराज यांच्या हस्ते सकाळी साडेसात वाजता अनंत चतुर्दशीची पूजा होईल. त्यानंतर साडेआठ वाजता वरद विघ्नेश्वर वाडा येथून बाप्पाचा ‘मयुरपंखी रथ’ विसर्जन मिरवणुकीसाठी मंडईतील टिळक पुतळ्याकडे मार्गस्थ होईल. दिवसभरात मानाच्या गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर रात्री आठ वाजता श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या बाप्पाच्या वैभवशाली मिरवणुकीला सुरुवात होईल. या मिरवणुकीसाठी आकर्षक विद्युत रोषणाईने मयूरपंख रथ सजविण्यात आला असून या रथासमोर पारंपरिक पद्धतीने ढोल-ताशा पथके जोरदार वादन करणार आहेत. श्रीराम, शिवमुद्रा आणि समर्थ या ढोल ताशा पथकांबरोबरच मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक होणार आहेत. ” वेळेत विसर्जन मिरवणूक संपविण्याचा आमचा प्रयत्न असेल असेही बालन यांनी सांगितले.


‘‘पुण्यातील बाप्पाची विसर्जन मिरवणूक हे जगभरातील गणेश भक्तांचे प्रमुख आकर्षण असते. त्यामुळे ती मिरवणूक देखणी, आकर्षक आणि दिमाखदार कशा प्रकारे होईल, असा सर्वच गणेश मंडळांचा प्रयत्न असतो. आमचाही असाच प्रयत्न राहणार आहे. अधिकाधिक गणेश भक्तांनी या विसर्जन मिरवणुकीत सहभागी होऊन आनंद घ्यावा आणि बाप्पाला भक्तीभावाने निरोप द्यावा.’’-पुनीत बालन(विश्वस्त व उत्सवप्रमुख, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट)

तरविंदरसिंह मारवा यांच्यावर त्वरित गुन्हा दाखल करा पुणे शहर जिल्हा काँग्रेसची मागणी.

 पुणे –    लोकसभेतील विरोधी पक्षनेते व काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना नुकतीच दिल्ली येथे भारतीय जनता पक्षाचे नेते तरविंदर सिंग मारवा यांनी जीवे मारण्याची धमकी दिली होती. संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीला जर अशा धमक्या भाजपाचे नेते देऊ लागले तर भाजपच्या या राज्यात सामान्य नागरिकांचे काय हाल होत असतील हे आपणास दिसून येते.आज पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने तरविंदरसिंह मारवावर गांधी फॅमिलीवर झालेल्या हल्ल्याची पार्श्वभूमी पाहता कठोरात कठोर कारवाई व्हावी व त्यांच्यावर त्वरित गुन्हे दाखल करावेत या मागणीसाठी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आज पुणे पोलीस सह आयुक्त रंजन कुमार शर्मा यांना निवेदन देण्यात आले.

     यावेळी प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस ॲड. अभय छाजेड, माजी महापौर सौ. कमल व्यवहारे, शिक्षण मंडळाच्या माजी अध्यक्ष संगीता तिवारी, पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित विभागाचे अध्यक्ष सुजित यादव, रफिक शेख, अविनाश साळवे व खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष मनीष आनंद, प्रभाग अध्यक्ष मुन्ना खंडेलवाल इत्यादी उपस्थित होते.

 पुनीत बालन स्टुडिओ निर्मित अ‍ॅक्शनपट ‘रानटी’  रुपेरी पडद्यावर

जंगलात राहणारे सगळेच प्राणी जंगली असतात, पण सगळेच ‘रानटी’ नसतात. काही विशिष्ट प्राण्याचा तो उपजत गुणधर्म असतो. त्याला जगण्यासाठी शिकार करावी लागते, हल्ले करावे लागतात. पण, ह्या हल्ल्याना जेव्हा शांत प्राणी प्रतिकार करतो तेव्हा तो हल्लेखोरापेक्षा अधिक जास्त ‘रानटी’ असतो. या कथेचा नायक असाच ‘रानटी’ बनला. म्हणून… “काही ‘रानटी’ असतात, काही बनतात!

प्रदर्शित झालेल्या ह्या पोस्टरवरनं ‘रानटी’ चित्रपट दिसतोय तेवढाच हिंस्त्र आणि त्याहून अधिक अ‍ॅक्शनने  भरलेला आहे. मराठी सिनेमांत आजपर्यंत कधीही न पाहण्यात आलेल्या दिग्दर्शनाची शैली, थरारक अ‍ॅक्शन दृश्य, जबरदस्त पटकथेचा जॉनर आणि अचूक संकलन हे ‘रानटी’ चित्रपटात पहायला मिळणार आहे. प्रेक्षकांसाठी हे ‘सरप्राईज’ असणार आहे.

शरद केळकर हा हिंदी-मराठी चित्रसृष्टीतील आघाडीचा नट हॉलिवूड चित्रपटातील नायकापेक्षा कमी नाही हे ह्या पोस्टरमधूनही कळतंय आणि त्याचा ‘रानटीपणा’ नेमका किती आहे हे चित्रपट प्रदर्शित झाल्यावर कळेलच. आपल्या भूमिकेबद्दल बोलताना शरद सांगतात की,’अधर्मी वृत्तींचा नाश करणार्‍या विष्णूची भूमिका मी यात केली आहे. अशा प्रकाराची भूमिका साकारणे प्रत्येक कलाकाराचे स्वप्न असते. उत्तम आणि पॉवरफुल दिग्दर्शक समित कक्कड यांच्या तगड्या आणि जबरदस्त ‘रानटी’ चित्रपटाच्या निमित्ताने हा वेगळा रोल मला करता आला याचा अतिशय आनंद आहे.

चित्रपटातील भव्यपणा दाखवण्याची जबाबदारी दिग्दर्शक समित कक्कड ह्यांनी पार पाडलीये. धारावी बँक, इंदोरी इश्क, हाफ तिकीट, आयना का बायना, आश्चर्यचकीत, 36 गुण, अशा भन्नाट कथानकांची स्टाईल हाताळणारा आणि सादर करण्याची कुवत दाखविणाऱ्या या दिग्दर्शकाकडून ‘रानटी’च्या निमित्ताने श्वास रोखून ठेवणारा चित्रपट २२ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

दिग्दर्शक समित कक्कड ज्यांच्या कलाकृतीमध्ये कायम नाविन्यपूर्ण विषय पाहायला मिळतात. आजवरच्या आपल्या कामाद्वारे समित कक्कड यांनी रसिकांसोबतच सिनेसृष्टीचंही मन जिंकलं आहे. मोठ्या पडद्यावर मराठीत आजवर न पाहिलेली पॉवरफुल्ल अ‍ॅक्शन, एंटरटेनमेंट ‘रानटी’ चित्रपटातून पहायला मिळणार आहे. या चित्रपटातून महाराष्ट्रातील न्यू ‘अँग्री यंग मॅन’ शरद केळकरच्या रूपाने मिळणार असल्याचे समित सांगतात. समित कक्कड फिल्म्स प्रॉडक्शन्स आणि सन्स ऑफ सॉईल मीडिया प्रा. लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने येणार्‍या या चित्रपटाच्या निर्मीती पुनीत बालन यांनी केली आहे.

ह्या सिनेमासाठी हृषिकेश कोळी यांचं लिखाण, अजित परब यांचं संगीत, अमर मोहिले यांचं पार्श्वसंगीत, एझाज गुलाब यांची साहसदृष्ये, सेतु श्रीराम यांचं छायाचित्रण, आशिष म्हात्रे यांचं संकलन अशी भक्कम तांत्रिक बाजू असलेली टीम ह्या चित्रपटाला लाभलेली आहे.

आपल्या निर्मिती संस्थेच्या माध्यमातून कायम उत्तम कलाकृतीला पाठिंबा देणारे निर्माते पुनीत बालन म्हणाले की, ‘रानटी’ चित्रपटाच्या निमित्ताने एक चांगली टीम झाली आहे. दिग्दर्शक समित कक्कड याने नेहमीच आपल्यातील वेगळेपण दाखविला आहे. त्याच्या साथीने मराठीत एक वेगळा प्रयत्न आम्ही ‘रानटी’ चित्रपटाच्या निमित्ताने केला आहे. हा प्रयत्न प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.२२ नोव्हेंबरला हा चित्रपट आपल्या नजीकच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होतोय. 

अखिल भारतीय टेबल टेनिस स्पर्धेतनैशा रेवसकर‌ हिला रौप्य पदक

पुणे – नैशा रेवसकर‌ या पुण्याच्या खेळाडूने हिमाचल प्रदेश मध्ये आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या अखिल भारतीय मानांकन टेबल टेनिस स्पर्धेतील पंधरा वर्षाखालील मुलींच्या गटात रौप्य पदक पटकाविले‌.

अखिल भारतीय टेबल टेनिस महासंघाच्या मान्यतेने हिमाचल प्रदेश टेबल टेनिस संघटनेने कांगरा येथे ही स्पर्धा आयोजित केली होती. नैशा हिला अंतिम फेरीत दिव्यांशी भौमिक हिच्याकडून ४-११,८-११,२-११ असा तीन गेम्स मध्ये पराभव पत्करावा लागला. उपांत्य फेरीत नैशा हिने आरुषी नंदी हिच्यावर ६-११,११-९,११-९,११-६ अशी मात केली होती तर उपांत्यपूर्व फेरीत तिने प्रीती पॉल हिचा चुरशीच्या लढतीनंतर १३-११, ११-६,१०-१२,४-११,११-९ असा पराभव केला होता.

नैशा हिला रौप्यपदकाबरोबरच अकरा हजार दोनशे रुपयांचे पारितोषिकही मिळाले. ती एम्स अकादमीत नीरज होनप यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते आजपर्यंत तिने जिल्हा व राज्यस्तरावरील अनेक स्पर्धांमध्ये विजेतेपद पटकाविले आहे.

आरोग्य विभाग कर्मचाऱ्यांचा उत्सव मित्र मंडळकडून सत्कार

पुणे : उत्सव मित्र मंडळ,नवी पेठ यांच्याकडून महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करून त्यांना भेटवस्तू देण्यात आल्या.तसेच श्रींची आरती कसबा-विश्रामबाग विभागाचे वरीष्ठ आरोग्य निरीक्षक अशोक बंडगर,आरोग्य निरीक्षक संतोष कदम ,मुकादम महादेव अडागळे, आरोग्य सेवक व सेविका,मंडळाचे हितचिंतक.भरत यादव,अतुल प्रधान यांच्या शुभहस्ते संपन्न झाली.मंडळाकडून आरोग्य विभागाच्या ५ पुरुष कर्मचारी व ५ महिला कर्मचाऱ्यांना .भरत यादव व अतुल प्रधान यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.
या प्रसंगी मंडळाचे कार्याध्यक्ष  सुधीर काळे अध्यक्ष अतुल धर्मे,सुमित काळे,विनय कदम,सचिन गायकवाड,तुषार सस्ते,सुनिल वाबळे,सुनिल पाटील,संदीप खराटे, विजय लोणकर,शैलेश कदम,आकाश खराटे,बाळासाहेब कांबळे आदी  पदाधिकारी उपस्थित होते.’ज्यांचा सत्कार केला आहे ते सर्व घरचा उत्सव व सण विसरून  संपूर्ण परिसर नेहमी स्वच्छ ठेवण्याचे काम करतात.त्यांच्या योगदानासाठी सामाजिक भावना मनात ठेवून सत्कार करण्यात आला आहे’,असे सुधीर काळे यांनी सांगितले 

विसर्जन मिरवणुकीत घुमणार ‘अयोध्यापती ताल’ 

समर्थ प्रतिष्ठान ढोल ताशा ध्वज आणि ढाल-तलवार पथकातर्फे नवा ताल
पुणे : अयोध्यापती प्रभू रामचंद्र यांचे ‘रामजी की निकली सवारी’ आणि ‘भारत का बच्चा बच्चा’ या गीतांवर आधारित नवीन ठेका यंदा विसर्जन मिरवणुकीत घुमणार आहे. तालवादनाने याचा प्रारंभ नुकताच झाला.

मानाचा दुसरा गणपती श्री तांबडी जोगेश्वरी येथे उत्सवमंडपात या नवीन तालाचे वादन झाले. समर्थ प्रतिष्ठानच्या रौप्य महोत्सवी (२५) वर्षाचे औचित्य साधत हिंदी दिनानिमित्त हिंदी भाषिक उत्तर प्रदेशातील गीतांवर आधारित हा नवीन ताल रचण्यात आला आहे.

यावेळी ‘भगवाधारी’ या पथकाच्या नवीन नाम फलकाचे उद्घाटन देखील करण्यात आले. श्री तांबडी जोगेश्वरी गणपती मंडळाचे अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी, खजिनदार प्रशांत टीकार, विश्वास नेऊरगावकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय सातपुते यांच्या संकल्पनेतून हा ताल बसवण्यात आला आहे.

मराठवाडा मुक्तीसंग्रामाची संघर्षगाथा आज १६ सप्टेंबर रोजी सह्याद्री वाहिनीवर

महाराष्ट्र चित्रपट,रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाची निर्मिती

भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळालं तरी मराठवाडा निजामाच्या विळख्यातून मुक्त झाला नव्हता. मराठवाड्यातील जनतेने त्यासाठी उभारलेल्या अभूतपूर्व लढ्याला अखेर यश येऊन १७ सप्टेंबर १९४८ रोजी हैदराबाद निजामाच्या जोखडातून मुक्त झाला. या घटनेला १७ सप्टेंबरला ७६ वर्षं पूर्ण होत आहेत. या खास दिनाचे औचित्य साधत ‘मुक्तीसंग्राम- कथा मराठवाड्याच्या संघर्षाची’ हा ७५ मिनिटांचा नाट्य माहितीपट येत्या १६ सप्टेंबर रोजी सह्याद्री वाहिनीवर दु.२ वाजता आपल्या भेटीला येणार आहे. जास्तीजास्त प्रेक्षकांनी हा नाट्य माहितीपट पाहावा असे आवाहन राज्याचे सांस्कृतिक मंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.

महामंडळाची निर्मिती असलेल्या या माहितीपटाचे दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांनी केले आहे. या माहितीपटात अजय पुरकर, समीर विद्वान्स, समीर धर्माधिकारी, सचिन देशपांडे, श्रीकांत भिडे, अभिजीत श्वेतचंद्र, अक्षय वाघमारे, पूजा पुरंदरे, विक्रम गायकवाड, स्मिता शेवाळे, बिपीन सुर्वे, ऋषी सक्सेना, ऋतुजा बागवे, दिप्ती धोत्रे, विराजस कुलकर्णी, आस्ताद काळे, आदिनाथ कोठारे, आशुतोष वाडेकर यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.

मराठवाड्यातील मुक्तिसंग्रामाचा ऐतिहासिक कालखंड सर्वांना पाहता यावा यासाठी विविध माध्यमातून या माहितीपटाचे प्रसारण करण्याचे नियोजन शासन करत आहे. यातील एक भाग म्हणजे सहयाद्री वाहिनीवर प्रेक्षपण करत आहोत.: स्वाती म्हसे पाटील,व्यवस्थापकीय संचालिका

माहितीपटाचे दिग्दर्शक दिग्पाल सुनिल लांजेकर म्हणतात, ”इतिहास हा माझा अतिशय जिव्हाळ्याचा विषय असून या माहितीपटाच्या माध्यमातून आपल्या स्वातंत्र्यवीरांचा संघर्ष प्रेक्षकांसमोर आणण्याचा मी प्रयत्न केला आहे. या ऐतिहासिक माहितीपटात तगड्या कलाकारांनी भूमिका साकारली असून यानिमित्ताने आम्ही मुक्तीसंग्राममध्ये सहभागी झालेल्या वीरांना आदरांजली वाहात आहोत.”

कोथरूड मध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

कोथरुडकरांनी लुटला गणेशोत्सवाचा मनमुराद आनंद!

नामदार चंद्रकांतदादा पाटील यांचा उपक्रम

पुणे: यंदाचा गणेशोत्सवाचा कोथरुडकरांचा आनंद खऱ्या अर्थाने द्विगुणित झाल्याचे पाहायला मिळाले. कोथरुडकरांना गणेशोत्सवात सांस्कृतिक मेजवानीचा मनसोक्त आनंद लुटता यावा यासाठी नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या संकल्पनेतून कोथरुड, बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुतारवाडी, सोमेश्वरवाडी भागातील नागरिकांसाठी ‘प्रथम तुला वंदितो!’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचा मतदारसंघातील सर्व नागरिकांनी मनमुराद आनंद लुटला.

गणेशोत्सव म्हणजे आनंद आणि उत्साहाचा सण. दहा दिवस या काळात विविध धार्मिक कार्यक्रमांसह, सामाज प्रबोधनपर आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. पुणे ही राज्याची सांस्कृतिक राजधानी आहे. त्यामुळे संपूर्ण देशभरातून नागरिक पुण्याचा गणेशोत्सव पाहण्यासाठी येत असतात. कोथरूड हे या सांस्कृतिक राजधानीचे माहेरघर असल्याने, इथल्या गणेशोत्सवाला एक वेगळीच परंपरा मिळालेली आहे.

गणेशोत्सवाच्या या परंपरेचं वैभव वाढविण्यासाठी नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या संकल्पनेतून ‘प्रथम तुला वंदितो कार्यक्रमा’चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाअंतर्गत विविध सांस्कृतिक, सांगितीक आणि करमणुकीचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

यामध्ये प्रामुख्याने प्रा. डॉ. लक्ष्मण जोशी लिखित आणि अभिनेते संदीप पाठक यांनी सादरीकरण असलेले वऱ्हाड निघाले लंडनला नाटकाचा प्रयोग, हिंदी मराठी गीत संगीत आणि विनोदाने नटलेला आनंदोत्सव, आधी वंदू तुज मोरया, सहवास सुरांचा, रंगात रंग, पारिवारिक संगीत मैफल गीतों का सफर आदी सांगितीक कार्यक्रम; प्रसिद्ध स्टॅंण्ड अप कॉमेडियन राजा रॅंचो हा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना खळखळून हसवणारा कार्यक्रम, विश्वास पठवर्धन यांचा स्वभाव राशींचे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तसेच, गणेशोत्सव काळात पुण्याच्या पारंपरिकतेचं वैभव असलेल्या ढोल ताशा पथकांचे स्थिर वादन, महिलांसाठी खेळ पैठणींचा आदी कार्यक्रमांचे आयोजन केले होते.

या सर्व कार्यक्रमांचा कोथरुडकरांनी मदमुराद आनंद लुटला. सांगितीक कार्यक्रमात अनेक जुन्या गाण्यांवर ज्येष्ठ नागरिकांनी ताल धरला. तर स्टँड अप कॉमेडी आणि वऱ्हाड निघाले लंडनला नाट्यप्रयोगाने कोथरुडकर रसिकांना खळखळून हसवले‌. त्याशिवाय विविध सोसायटीत आयोजित ढोल ताशा पथकांच्या स्थिर वादनांवर तरुणाई थिरकली‌‌. या सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे कोथरुडकरांचा गणेशोत्सवाचा उत्साह अतिशय द्विगुणित झाला होता.

स्मार्ट सिटी नव्हे तर स्मार्ट व्हिलेज झाले पाहिजेत ..तेव्हाच देश आत्मनिर्भर – नितीन गडकरी

पुणे : ‘ग्रामीण अर्थव्यवस्थेकडे लक्ष न दिल्याने पुण्यासारख्या शहराची स्थिती बिकट झाली आहे. त्यामुळे देशात ‘स्मार्ट सिटी’ नाही, तर ‘स्मार्ट व्हिलेज’ झाले पाहिजेत,’ अशी स्पष्ट भूमिका केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी मांडली. गाव, गरीब, कामगार, शेतकरी संपन्न होत नाही, तोपर्यंत देश आत्मनिर्भर होण्यात अडचण आहे, असेही त्यांनी नमूद केले.
सीओईपी तंत्रशास्त्र विद्यापीठ आणि सीओईपी माजी विद्यापीठाच्या सीओईपी अभिमान पुरस्कार प्रदान कार्यक्रमात गडकरी बोलत होते. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, विद्यापीठाच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी, कुलगुरू डॉ. सुनील भिरूड, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष भरत गिते, प्रा. सुजीत परदेशी या वेळी उपस्थित होते. ज्येष्ठ उद्योगपती पी. एन. भगवती यांना सीओईपी जीवनगौरव पुरस्कार, तर अभिनेता वैभव तत्ववादी, राज्याच्या पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, सिक्कीमचे कॅबिनेट मंत्री राजू बसनेत, अमेरिकेतील जे.पी. मॉर्गन चेसच्या कार्यकारी संचालक मोनिका पानपलिया आणि अमेरिकेतील टेस्ला मोटर्सचे वरिष्ठ संचालक हृषीकेश सागर यांना सीओईपी अभिमान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

गडकरी म्हणाले, की ज्ञानाचे संपत्तीमध्ये रुपांतर हेच भविष्य आहे. संशोधन, नावीन्य या आधारे देशाचा विकास मोजला जातो. काही वर्षांपूर्वी देशातील वाहनोद्योग सात लाख कोटी रुपयांची उलाढाल असलेला आणि जगात सातवा स्थानी होता. आता वाहनोद्योगात जपानला मागे टाकून भारत तिसऱ्या स्थानी आहे. सध्या २२ लाख कोटी रुपयांची होणारी उलाढाल ५५ लाख कोटी रुपयांवर नेण्याचे उद्दिष्ट आहे. त्यात संशोधनाची भूमिका मोलाची ठरणार आहे.

आजही सुमारे ६५ टक्के नागरिक ग्रामीण भागात राहतात आणि कृषी अर्थव्यवस्था हा त्यांच्या उदरनिर्वाहाचा मुख्य स्त्रोत आहे. संशोधन आणि तंत्रज्ञानाची जोड देत कृषी अर्थव्यवस्थेला आपणास पाठबळ द्यावेच लागेल कारण कृषी अर्थव्यवस्थेला अव्हेरून आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण होणार नाही, असे मत नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.

नितीन गडकरी म्हणाले की, शेतकरी हा केवळ अन्नधान्याचा उत्पादक राहिलेला नसून तो ऊर्जादाताच्या भूमिकेतही शिरला आहे. कृषी क्षेत्रात देखील अनंत संधी दडलेल्या असून आपली इंधनाची सध्याची आणि भविष्यातली देखील गरज भागवण्याची क्षमता कृषी उद्योगात आहे. ग्रामीण भागाच्या गरजा आणि गरजवंतांचा मानवी चेहरा केंद्रस्थानी ठेवून संशोधन करीत तंत्रज्ञानाचा विकास झाल्यास ग्रामीण भागातून येणारे लोंढे गावातच थांबतील आणि त्यांना स्थानिक पातळीवरच रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतील. कृषी आणि ग्रामीण भागाचा जीडीपी केवळ पंधरा ते सोळा टक्के आहे, ते योगदान वाढण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध करून देणे आपल्याला शक्य आहे. कृषी उद्योगाला ऊर्जा निर्मितीचाही पर्याय दिल्यास अधिक क्षमतेने प्रगती करता येईल, असा मला विश्वास आहे.

मुंबई-बंगलोर हा १४ पदरी द्रुतगती महामार्गाचे बांधकाम सहा महिन्यात सुरू करणार

मुंबईतील अटल सेतूपासून मुंबई-बंगलोर हा १४ पदरी द्रुतगती महामार्ग नव्याने बांधण्यात येणार असून हा महामार्ग पुणे रिंगरोडला जोडणारा असणार आहे. या नव्या महामार्गाची निविदा निघाली आहे.येत्या सहा महिन्यात महामार्गाचे बांधकाम सुरू होईल,” अशी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केली.या नव्या महामार्गामुळे मुंबईहून निघालेली अनेक वाहने पुणे शहरात न येता यामार्गे पुढे जातील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील आणि यामार्गे शहरात येणारी वाहतूक कोंडी कमी होऊ शकेल, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे येत्या काळात मुंबई-पुणे प्रवास अधिक वेगवान होण्याची चिन्हे आहेत.सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ आणि सीओईपी माजी विद्यार्थी संघटना यांच्या वतीने आयोजित ‘सीओईपी अभिमान पुरस्कार’ सोहळा गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी ते बोलत होते. ”मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग बांधला, त्यावेळी पुढील ५० वर्षात आपल्याला काही करावे लागणार नाही, असे आम्ही म्हणायचे.परंतु, नागपूरमधून मी निघालो आणि पुण्यात पोचलो. पण माझा मुलगा आणि सून मुंबईमधून निघाले आणि लोणावळ्यात एक तास अडकले. बरं झाले मी नवीन द्रुतगती महामार्ग निर्माण करण्याची घोषणा केली.” असेही गडकरी यांनी आवर्जून सांगितले.गडकरी म्हणाले,”मुंबईतील अटल सेतू पुलावरून उतरल्यावर तेथून थेट बंगलोरला जाणारा एक १४ पदरी द्रुतगती महामार्ग बांधण्याची निविदा निघाली आहे. हा महामार्ग थेट मुंबईहून निघून पुण्याच्या रिंग रोडला जोडून ‘मुंबई-पुणे रिंगरोड मार्गे- बंगलोर’ असा असेल.या महामार्गामुळे सध्याच्या ‘मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील अर्ध्याहून अधिक वाहतूक ही या मार्गाने पुढे जाईल. मुंबईतील अटल सेतूवरून खाली उतरल्यास लगेचच वाहने या १४ पदरी मुंबई- बंगलोर महामार्गाला लागतील, याचमार्गाने पुणे रिंग रोडमार्गे पुढे बंगलोरला जाणे शक्य होईल. तसेच या रस्त्याने पुढे दोन तासात वाहने छत्रपती संभाजीनगर रस्त्याला जोडली जातील.”

हमारी बरबादीयों का शोर है,सितमगर को उसकी खबर तक नही…माणूसपण उंचावत नेणाऱ्या शायरीला मिळाली दिलखुलास दाद

पुणे फेस्टिव्हल अंतर्गत सलग २७ व्या वर्षी रंगला मुशायरा

पुणे-‘आपल्या समाजात भेद आहेत, असे म्हणणार्यांना पुणे फेस्टिव्हलमधील ऑल इंडिया मुशायर्याचे दृष्य दाखवा. गंगाजमनी सभ्यतेचे जिवंत उदाहरण इथे पाहायला मिळेल’, असे गौरवोद्गार माजी परराष्ट्रमंत्री सलनाम खुर्शीद यांनी शनिवारी येथे काढले.३६ व्या पुणे फेस्टिव्हल अंतर्गत राष्ट्रीय एकात्मता आणि धार्मिक सलोखा जोपासणारा ‘ऑल इंडिया मुशायरा’ १४ सप्टेंबर रोजी श्रीगणेश कला क्रीडा रंगमंच येथे रात्री सादर झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सलमान खुर्शीद आलम बोलत होते.

पुणे फेस्टिव्हलचे मुख्य समन्वयक अॅड. अभय छाजेड, ज्येष्ठ नेते उल्हास पवार, उपस्थित होते. डॉ पी ए इनामदार विद्यापीठाचे कुलपती व ज्येष्ठ शिक्षणतज्ञ आणि संयोजक डॉ पी. ए. इनामदार आणि  निमंत्रक डेक्कन मुस्लिम इन्स्टिट्यूटच्या अध्यक्ष सौ. आबेदा इनामदार यांनी याचे आयोजन केले होते व निमंत्रित शायर आदी मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

खुर्शीद पुढे म्हणाले, ‘इनामदार यांनी पुढाकार घेऊन सलग २७ वर्षे हा उपक्रम सुरू ठेवला आहे. इथली गर्दी या उपक्रमाची लोकप्रियता सांगते आहे. सामाजिक सलोखा निर्माण करणार्या अशा उपक्रमांसाठीचे कार्य प्रशंसनीय आहे’, असेही ते म्हणाले.अभय छाजेड म्हणाले, ‘पुणे हे सांस्कृतिक राजधानीचे शहर आहे. इथल्या उत्सवात सर्वधर्मीय कार्यकर्ते एकत्र काम करतात. पुणे फेस्टिव्हलमध्ये सर्व कलांना प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न असतो. मुशायरा हे गंगाजमुनी तेहजीब चे उत्तम उदाहरण आहे’.

मान्यवरांनी मुशायर्याची शमा रोशन केल्यावर सुरू झालेली ही मैफल उत्तरोत्तर रंगत गेली.  मुशायर्यामध्ये अनिस शौक (शेगाव), अहमद कमाल हाश्मी (कोलकाता), रफीक सरवर (मालेगाव), मारूफ रायबरेल्वी (निजामत), काशिफ सय्यद (भिवंडी), विशाल बाग (पुणे), शाहिद आदिली (हैदराबाद), शाहिस्ता सना , हाशमी फिरोझाबादी (फिरोझाबाद) हे देशातील नामवंत शायर सहभागी झाले होते. मुशायराचे सूत्रसंचालन मारुफ रायबरेलवी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. उज्मा तसनीम यांनी केले.

कुठेही भटकत गेलो, कुठल्याही धर्म, जात, पंथात जन्माला आलो आणि कुठलीही भाषा बोलत असलो, तरी आपण माणूसपणाचा परिघ जपला पाहिजे. सामाजिक बंधुभाव टिकवून धरणे, ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, असा संदेश विविध शेर, नज्म, गजल यातून देणारा शानदार मुशायरा पुणे फेस्टिव्हलमध्ये शनिवारी रात्री रंगला. देशाच्या विविध राज्यांतून आणि राज्याच्या अनेक जिल्ह्यांतून आवर्जून आलेल्या शायर मंडळींनी यंदा उर्दू भाषेतील प्रेम, प्रेयसी, शराब अशा लोकप्रिय घटकांऐवजी समाज म्हणून आपण एकत्र असावे, हा आशय व्यक्त करणार्या रचना पेश करत हाऊसफुल सभागृहाची दिलखुलास दाद मिळवली.

हम ख्वाब देखते है,

वो देखते है सपना…

अशा प्रकारची शब्दांची पुनरुक्ती करत अर्थांचे वैविध्य सांगणार्या रचनाही भाषांमधील भगिनीभाव सांगणार्या होत्या.

हमारी बरबादीयों का शोर है

सितमगर को उसकी खबर तक नही, असे म्हणणारा शायर दाद मिळवून गेला.

समाजातील स्त्रीजीवनाचे चित्रण करणारी, वेदनेविषयी बोलणारी, अन्यायाविरुद्ध लढणारी, प्रेरणा देणारी आणि सोबतच आपल्या माणूसपणाची व्याप्ती विस्तृत करत नेणारी शायरी रसिकांनी डोक्यावर घेतली.

पहाटे उशिरा पर्यंत हा कार्यक्रम रंगला.

तर डेक्कन मुस्लिम इन्स्टिट्यूटच्या शाहेदा शेख यांनी आभार प्रदर्शन केले.

काँग्रेस मविआचे सरकार आल्यानंतर मंत्रीमंडळाच्या पहिल्याच बैठकीत जुनी पेन्शनचा निर्णय: नाना पटोले.

मुंबई/शिर्डी, दि. १५ सप्टेंबर
सरकारी कर्मचा-यांची जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी राज्यातील व केंद्रतील भाजपा सरकारला टेन्शन वाटते.
आता भाजपा सरकारने सुरु केलेली पेन्शन योजना कर्मचा-यांना मान्य नाही पण पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटे सांगून हीच पेन्शन योजना सरकारी कर्मचा-यांनी मान्य केल्याचा ढोल बडवत आहेत. जुनी पेन्शन योजनाच लागू करावी या सरकारी कर्मचा-यांच्या मागणीला काँग्रेसचा पाठिंबा आहे. काँग्रेस मविआचे सरकार सत्तेस आल्यानंतर मंत्रीमंडळाच्या पहिल्याच बैठकीत जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहे.

शिर्डी येथील पेन्शन राज्य महाअधिवेशनात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले बोलत होते. यावेळी ते पुढे म्हणाले की, जुनी पेन्शन हा सरकारी कर्मचा-यांचा हक्क आहे, तुमचाच पैसा निवृत्तीनंतर तुम्हाला दिला जातो, सरकार काही उपकार करत नाही परंतु जुनी पेन्शन योजना लागू केली तर राज्याची तिजोरी रिकामी होईल असे भाजपा सरकार म्हणते. उद्योगपती अनिल अंबानी यांचे 1700 कोटी रुपयांचे कर्ज माफ करते त्यावेळी सरकारची तिजोरी रिकामी होत नाही का? असा सवाल नाना पटोलेंनी उपस्थित केला. राज्यात 2.5 लाख सरकारी पदे रिक्त आहेत पण महायुती सरकार ती पदे भरत नाही. काँग्रेस मविआचे सरकार आल्यानंतर ही रिक्त पदेही भरली जातील. काँग्रेसचे सरकार असताना विलासराव देशमुख यांनी गाव वस्तीवर शाळा सुरू करुन गाव खेड्यातील गरीब कुटुंबातील मुला मुलींपर्यंत शिक्षण पोहचवण्याचा प्रयत्न केला. आज हे महायुती सरकार जिल्हा परिषदेच्या या शाळा बंद करत आहे. सरकार MPSC मार्फतची नोकर भरती करत नाही उलट त्या विद्यार्थांवर पोलीस लाठीचार्ज करून त्यांचे आंदोलन दडपून टाकले.

जुनी पेन्शन योजना ही काँग्रेसच्या काळात सुरु होती ती अटल बिहारी वाजपेयी सरकारने बंद केली आहे. व भाजपा काँग्रेसवर आरोप करत आहे. काँग्रेसचे सरकार ज्या राज्यात आहे तेथे जुनी पेन्शन योजना लागू केली आहे. महाभ्रष्ट युती सरकारने महाराष्ट्र 10 वर्षे मागे नेला व केंद्रातील मोदी सरकारच्या 10 वर्षांच्या कारभारानेही देशाची व राज्याची पिछेहाट झाला. महाराष्ट्र पुन्हा उभा करण्यासाठी सर्व योजना लागू करून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारी कर्मचा-यांची गरज आहे असेही पटोले म्हणाले.

या अधिवेशनाला माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे, आ. सुधाकर आडबाले, आ. अभिजित वंजारी, आ. सत्यजित तांबे. किरण सरनाईक, रविकांत तुपकर, नितेश खांडेकर आदी उपस्थित होते.

आवाजाला ठेवा मर्यादा अन लेसर लाईटच्या वापराला बंदी

पुणे: डीजेमध्ये वेगवेगळ्या मोठ्या आवाजासाठी ‘प्रेशर मीड’ उपकरणाचा वापर केला जातो. कर्णकर्कश आवाजामुळे ध्वनी प्रदूषण होते. त्याचे मानवी शरीरावर घातक परिणाम होतात. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी असे प्रेशर मीड वापरणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.
तसेच डीजेवर लेसर लाईट लावल्यास जागेवरच डीजे जप्त करून गुन्हे दाखल करण्याचा इशारा देखील पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे. लेसर लाईटमुळे गेल्यावर्षी अनेकांच्या डोळ्यांना मिरवणुकीत गंभीर इजा झाल्या होत्या.
ध्वनिप्रदूषणाबाबत सर्वोच्च न्यायालय, तसेच राष्ट्रीय हरित न्यायाधीकरणाने निर्देश दिले आहेत. आदेशाचे उल्लंघन केल्यास विसर्जन मिरवणुकीत उच्च क्षमतेची ध्वनिवर्धक यंत्रणा वापरणारे डीजे, तसेच ध्वनिवर्धक पुरवठादारांविरोधात कारवाई करण्यात येईल. त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करुन डीजे यंत्रणा जप्त करण्यात येईल, असे विशेष शाखेचे पोलिस उपायुक्त जी. श्रीधर यांनी आदेशात म्हटले आहे.रात्री १२ वाजता ध्वनिवर्धक बंदच ठेवावे लागतील अन्यथा कोणाचेही मंडळ असो तत्क्षणी कारवाई होईल असे त्यांनी म्हटले आहे.

ड्रोनच्या वापरासाठी पोलिसांची परवानगी गरजेची..

ड्रोन कॅमेऱ्यांच्या वापरास पोलिसांकडून परवानगी मिळविणे आवश्यक आहे. विसर्जन मिरवणुकीत ड्रोन कॅमेरा वापरणाऱ्यांनी विशेष शाखेच्या पोलिस उपायुक्तांकडे अर्ज करावेत. परवानगीशिवाय ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर केल्यास भारतीय न्याय संहिता कलम २२३ अन्वये कारवाई करण्यात येईल. विनापरवानगी ड्रोन वापरणाऱ्यांविरोधात कारवाईच्या सूचना शहरातील सर्व पोलिस ठाण्यांना देण्यात आल्या आहेत.

घातक लेसर लाईटवरही कारवाई…

गेल्या वर्षी विसर्जन मिरवणुकीत लेसर लाईटचा वापर करण्यात आला होता. घातक लेसर लाईटमुळे अनेकांना त्रास झाल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. कोल्हापूरमध्ये लेसर झोतांमुळे तिघांच्या डोळ्यांना इजा पोहोचल्याची घटना नुकतीच घडली होती. विसर्जन मिरवणुकीत लेसर लाईटचा वापर करणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचा इशारा देण्यात आला आहे. दहीहंडीनिमित्त आयोजित कार्यक्रमावेळी लेसर दिव्यांचा वापर करणाऱ्यांविरुद्ध हडपसर पोलिसांकडून नुकतेच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

अनंत चतुर्दशीला दुपारी ४ च्या दरम्यान सहभागी होणार ‘दगडूशेठ’चा श्री उमांगमलज रथ

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळच्यावतीने उत्सवाच्या १३२ व्या वर्षानिमित्त आयोजित गणेशोत्सवाची सांगता मिरवणूक अनंत चतुर्दशीला मंगळवार, दिनांक १७ सप्टेंबर रोजी थाटात निघणार आहे. यंदा श्री उमांगमलज रथामध्ये दगडूशेठचे गणपती बाप्पा विराजमान होणार असून आकर्षक विद्युतरोषणाईने हा रथ उजळून निघणार आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण यांनी दिली.विसर्जन मिरवणुकीत दगडूशेठ गणपती बाप्पा यंदाही दुपारी ४ च्या दरम्यान सहभागी होणार आहे. मागील अनेक वर्षे दगडूशेठ गणपती बाप्पा विसर्जन मिरवणूक परंपरेप्रमाणे रात्री लक्ष्मी रस्त्यावर पोलिस प्रशासनाने मार्ग उपलब्ध करून दिल्यावर सहभागी होत आले आहेत. परंतु दरवर्षी निघायला होणारा उशीर खूपच वाढत चालला होता. त्यामुळे मागील वर्षी दुपारी ४ वाजता श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा सहभागी झाले होते. यंदा देखील भाविकांच्या भावनांचा विचार करून तसेच ज्या वेळेत गणेश मंडळे मिरवणुकीत सहभागी व्हायला फारशी उत्सुक नसतात, अशावेळी दुपारी ४ च्या दरम्यान श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा विसर्जन मिरवणुकीत लक्ष्मी रस्त्याने सहभागी होईल.

श्री उमांगमलज रथातून निघणार ‘दगडूशेठ’ गणेशोत्सवाची सांगता मिरवणूक
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे १३२ वे वर्ष ; यंदा देखील दुपारी ४ वाजता सहभागी होणार

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने उत्सवाच्या १३२ व्या वर्षानिमित्त आयोजित गणेशोत्सवाची सांगता मिरवणूक अनंत चतुर्दशीला मंगळवार, दिनांक १७ सप्टेंबर रोजी थाटात निघणार आहे. यंदा श्री उमांगमलज रथामध्ये दगडूशेठ चे गणपती बाप्पा विराजमान होणार असून आकर्षक विद्युतरोषणाईने हा रथ उजळून निघणार आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण यांनी दिली.

यंदाची प्रतिकृती असलेल्या जटोली शिवमंदिराच्या विषयाप्रमाणे सांगता मिरवणूक रथाची मांडणी करण्यात आली आहे. श्री उमांगमलज रथाच्या माथ्यावर जटा सोडलेली शंकराची मूर्ती असणार आहे. त्याच्या बाजूला त्रिशूळ आणि डमरु देखील आहे. कळस म्हणून मोठा रुद्राक्ष दाखविण्यात आला आहे. नागाच्या फण्यावर हा तोललेला आहे, बाजूला २१ छोटे कळस लावण्यात आले आहेत. तर, रथावर २३ नंदींचे चेहरे बसविण्यात आले आहेत. तसेच रथावर तब्बल १८ क्रिस्टलचे झुंबर लावण्यात येतील.

रथावर ८ खांब साकारण्यात आले आहेत. प्रत्येक खांबांवर बेलाच्या पानांचे डिझाईन साकारण्यात आले आहे. रथाचा आकार १५ बाय १५ फूट असून उंची २४ फूट इतकी आहे. रथावर एलईडी व पार लाईटचे फोकस लावण्यात येणार आहेत. रथामध्ये बाप्पा ज्या ठिकाणी विराजमान होणार आहेत. तेथे मोराची डिझाईन देखील साकारण्यात आली आहे. युवा कलादिग्दर्शक विराज खटावकर यांनी हा रथ साकारला आहे.

सांगता मिरवणुकीबाबत माहिती देताना माणिक चव्हाण म्हणाले, मिरवणुकीत रुग्णसेवा रथ अग्रभागी असणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदा सामाजिक विषयांतर्गत आरोग्यविषयक जनजागृती रथावरुन केली जाणार आहे. याखेरीज मिरवणुकीत प्रभात ब्रास बँड, दरबार ब्रास बँड, स्वरूप वर्धिनीचे ढोल-ताशा पथक, सनई-चौघडा असा लवाजमा असेल. तसेच पुरुष भाविकांसह महिला गणेशभक्त मोठया संख्येने सहभागी होणार आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय वर्षा निवासस्थानी श्री गणेशाची विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली आरती….

मुंबई/पुणे दि. १४ : गणेश उत्सव मोठ्याप्रमाणात महाराष्ट्रात कोरोनाच्यानंतर होत आहे. तसाच उत्साह मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी दिसत आहे. देशातील अनेक नेते, सामाजिक कार्यकर्ते, अभिनेते, विविध पक्षांचे कार्यकर्ते व पदाधिकारी, सामान्य नागरिक यांनी वर्षावर जाऊन दर्शन घेतले आहेत. काल विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी वर्षा निवासस्थानी जाऊन दर्शन घेतले व त्यांच्या हस्ते आरती देखील झाली. यादरम्यान डॉ. गोऱ्हे यांच्या वाढदिवसाच्यानिमित्त मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी खा.श्रीकांत शिंदे, आ.सदा सरवणकर, आ.दिलीप लांडे, माजी आ.राम पाटील, गोपकिशन बाजोरिया, शिवसेना उपनेत्या कला शिंदे आदी आमदार व पदाधिकारी उपस्थित होते.