पुणे फेस्टिव्हल अंतर्गत सलग २७ व्या वर्षी रंगला मुशायरा
पुणे-‘आपल्या समाजात भेद आहेत, असे म्हणणार्यांना पुणे फेस्टिव्हलमधील ऑल इंडिया मुशायर्याचे दृष्य दाखवा. गंगाजमनी सभ्यतेचे जिवंत उदाहरण इथे पाहायला मिळेल’, असे गौरवोद्गार माजी परराष्ट्रमंत्री सलनाम खुर्शीद यांनी शनिवारी येथे काढले.३६ व्या पुणे फेस्टिव्हल अंतर्गत राष्ट्रीय एकात्मता आणि धार्मिक सलोखा जोपासणारा ‘ऑल इंडिया मुशायरा’ १४ सप्टेंबर रोजी श्रीगणेश कला क्रीडा रंगमंच येथे रात्री सादर झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सलमान खुर्शीद आलम बोलत होते.
पुणे फेस्टिव्हलचे मुख्य समन्वयक अॅड. अभय छाजेड, ज्येष्ठ नेते उल्हास पवार, उपस्थित होते. डॉ पी ए इनामदार विद्यापीठाचे कुलपती व ज्येष्ठ शिक्षणतज्ञ आणि संयोजक डॉ पी. ए. इनामदार आणि निमंत्रक डेक्कन मुस्लिम इन्स्टिट्यूटच्या अध्यक्ष सौ. आबेदा इनामदार यांनी याचे आयोजन केले होते व निमंत्रित शायर आदी मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
खुर्शीद पुढे म्हणाले, ‘इनामदार यांनी पुढाकार घेऊन सलग २७ वर्षे हा उपक्रम सुरू ठेवला आहे. इथली गर्दी या उपक्रमाची लोकप्रियता सांगते आहे. सामाजिक सलोखा निर्माण करणार्या अशा उपक्रमांसाठीचे कार्य प्रशंसनीय आहे’, असेही ते म्हणाले.अभय छाजेड म्हणाले, ‘पुणे हे सांस्कृतिक राजधानीचे शहर आहे. इथल्या उत्सवात सर्वधर्मीय कार्यकर्ते एकत्र काम करतात. पुणे फेस्टिव्हलमध्ये सर्व कलांना प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न असतो. मुशायरा हे गंगाजमुनी तेहजीब चे उत्तम उदाहरण आहे’.
मान्यवरांनी मुशायर्याची शमा रोशन केल्यावर सुरू झालेली ही मैफल उत्तरोत्तर रंगत गेली. मुशायर्यामध्ये अनिस शौक (शेगाव), अहमद कमाल हाश्मी (कोलकाता), रफीक सरवर (मालेगाव), मारूफ रायबरेल्वी (निजामत), काशिफ सय्यद (भिवंडी), विशाल बाग (पुणे), शाहिद आदिली (हैदराबाद), शाहिस्ता सना , हाशमी फिरोझाबादी (फिरोझाबाद) हे देशातील नामवंत शायर सहभागी झाले होते. मुशायराचे सूत्रसंचालन मारुफ रायबरेलवी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. उज्मा तसनीम यांनी केले.
कुठेही भटकत गेलो, कुठल्याही धर्म, जात, पंथात जन्माला आलो आणि कुठलीही भाषा बोलत असलो, तरी आपण माणूसपणाचा परिघ जपला पाहिजे. सामाजिक बंधुभाव टिकवून धरणे, ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, असा संदेश विविध शेर, नज्म, गजल यातून देणारा शानदार मुशायरा पुणे फेस्टिव्हलमध्ये शनिवारी रात्री रंगला. देशाच्या विविध राज्यांतून आणि राज्याच्या अनेक जिल्ह्यांतून आवर्जून आलेल्या शायर मंडळींनी यंदा उर्दू भाषेतील प्रेम, प्रेयसी, शराब अशा लोकप्रिय घटकांऐवजी समाज म्हणून आपण एकत्र असावे, हा आशय व्यक्त करणार्या रचना पेश करत हाऊसफुल सभागृहाची दिलखुलास दाद मिळवली.
हम ख्वाब देखते है,
वो देखते है सपना…
अशा प्रकारची शब्दांची पुनरुक्ती करत अर्थांचे वैविध्य सांगणार्या रचनाही भाषांमधील भगिनीभाव सांगणार्या होत्या.
हमारी बरबादीयों का शोर है
सितमगर को उसकी खबर तक नही, असे म्हणणारा शायर दाद मिळवून गेला.
समाजातील स्त्रीजीवनाचे चित्रण करणारी, वेदनेविषयी बोलणारी, अन्यायाविरुद्ध लढणारी, प्रेरणा देणारी आणि सोबतच आपल्या माणूसपणाची व्याप्ती विस्तृत करत नेणारी शायरी रसिकांनी डोक्यावर घेतली.
पहाटे उशिरा पर्यंत हा कार्यक्रम रंगला.
तर डेक्कन मुस्लिम इन्स्टिट्यूटच्या शाहेदा शेख यांनी आभार प्रदर्शन केले.