मुंबई-मुंबई-ठाण्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसादरम्यान आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. साकीनाका येथील मॅनहोल दुर्घटनेनंतर आता मुंब्र्यात एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. रस्त्यावर साचलेल्या पावसाच्या पाण्यात हायव्होल्टेज करंट उतरल्याने एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेने संपूर्ण मुंब्रा परिसर हादरून गेला असून, प्रशासनाविरोधात नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
नेमकं काय घडलं?
मुंब्र्यातील कादर पॅलेस परिसरातील ‘यास्मिन पार्क’ इमारतीबाहेर काल (गुरुवारी) रात्री ८.३० वाजताच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. आलिया मोहम्मद साजिद चांदीवाला (वय १७) ही मुलगी काही कामानिमित्त इमारतीबाहेर पडली होती. सलग दोन दिवस पडणाऱ्या पावसामुळे रस्त्यावर पाणी साचले होते. पाण्याच्या खोलीचा अंदाज येत नसल्याने ती पाण्यातून वाट काढत पुढे जात असतानाच, पाण्यात उतरलेल्या विजेचा तिला जोरदार धक्का लागला. तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र त्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता.
या घटनेनंतर घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी करत संताप व्यक्त केला. एमआयएमचे नगरसेवक शोएब डोंगरे यांनी एका खाजगी कंपनीच्या निष्काळजीपणामुळेच या निष्पाप मुलीचा जीव गेल्याचा गंभीर आरोप केला आहे. दरम्यान, या प्रकरणी मुंब्रा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, हा शॉक खाजगी कंपनीच्या चुकीमुळे लागला की अन्य कोणत्या कारणामुळे, याचा सखोल तपास सुरू असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
सलग दुर्घटनांनी नागरिकांमध्ये संताप
साकीनाका दुर्घटना: कालच गुरुवारी कुर्ला-साकीनाका परिसरातील खैराणी रोडवर एका व्यक्तीचा उघड्या मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाला.
विजेचे धक्के: बुधवारी साचलेल्या पाण्यातून जाताना दोन तरुणींना शॉक लागून त्या बेशुद्ध पडल्याची घटना घडली होती. या घटनेला २४ तास उलटत नाहीत तोच मुंब्र्यात आलियाचा बळी गेला आहे.
दोन विद्यार्थिनींना विजेचा धक्का प्रकरण; नवी मुंबई महापालिकेच्या कार्यकारी अभियंत्यावर निलंबनाची कारवाई
नेरूळ एल.पी. नाका उड्डाणपुलाखाली पावसाच्या पाण्यातून जात असताना दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनींना विजेचा धक्का लागल्याच्या गंभीर घटनेप्रकरणी नवी मुंबई महापालिकेने मोठी प्रशासकीय कारवाई करत परिमंडळ-१ येथील विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रवीण गाडे यांना तात्काळ निलंबित केले आहे. संबंधित ठिकाणी विद्युत केबलचा पावसाच्या पाण्याशी संपर्क आल्याने हा अपघात घडल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले असून, कार्यालयप्रमुख म्हणून कामावर नियंत्रण न ठेवणे आणि कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आली आहे.

