पुणे : ‘ग्रामीण अर्थव्यवस्थेकडे लक्ष न दिल्याने पुण्यासारख्या शहराची स्थिती बिकट झाली आहे. त्यामुळे देशात ‘स्मार्ट सिटी’ नाही, तर ‘स्मार्ट व्हिलेज’ झाले पाहिजेत,’ अशी स्पष्ट भूमिका केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी मांडली. गाव, गरीब, कामगार, शेतकरी संपन्न होत नाही, तोपर्यंत देश आत्मनिर्भर होण्यात अडचण आहे, असेही त्यांनी नमूद केले.
सीओईपी तंत्रशास्त्र विद्यापीठ आणि सीओईपी माजी विद्यापीठाच्या सीओईपी अभिमान पुरस्कार प्रदान कार्यक्रमात गडकरी बोलत होते. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, विद्यापीठाच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी, कुलगुरू डॉ. सुनील भिरूड, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष भरत गिते, प्रा. सुजीत परदेशी या वेळी उपस्थित होते. ज्येष्ठ उद्योगपती पी. एन. भगवती यांना सीओईपी जीवनगौरव पुरस्कार, तर अभिनेता वैभव तत्ववादी, राज्याच्या पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, सिक्कीमचे कॅबिनेट मंत्री राजू बसनेत, अमेरिकेतील जे.पी. मॉर्गन चेसच्या कार्यकारी संचालक मोनिका पानपलिया आणि अमेरिकेतील टेस्ला मोटर्सचे वरिष्ठ संचालक हृषीकेश सागर यांना सीओईपी अभिमान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
गडकरी म्हणाले, की ज्ञानाचे संपत्तीमध्ये रुपांतर हेच भविष्य आहे. संशोधन, नावीन्य या आधारे देशाचा विकास मोजला जातो. काही वर्षांपूर्वी देशातील वाहनोद्योग सात लाख कोटी रुपयांची उलाढाल असलेला आणि जगात सातवा स्थानी होता. आता वाहनोद्योगात जपानला मागे टाकून भारत तिसऱ्या स्थानी आहे. सध्या २२ लाख कोटी रुपयांची होणारी उलाढाल ५५ लाख कोटी रुपयांवर नेण्याचे उद्दिष्ट आहे. त्यात संशोधनाची भूमिका मोलाची ठरणार आहे.
आजही सुमारे ६५ टक्के नागरिक ग्रामीण भागात राहतात आणि कृषी अर्थव्यवस्था हा त्यांच्या उदरनिर्वाहाचा मुख्य स्त्रोत आहे. संशोधन आणि तंत्रज्ञानाची जोड देत कृषी अर्थव्यवस्थेला आपणास पाठबळ द्यावेच लागेल कारण कृषी अर्थव्यवस्थेला अव्हेरून आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण होणार नाही, असे मत नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.
नितीन गडकरी म्हणाले की, शेतकरी हा केवळ अन्नधान्याचा उत्पादक राहिलेला नसून तो ऊर्जादाताच्या भूमिकेतही शिरला आहे. कृषी क्षेत्रात देखील अनंत संधी दडलेल्या असून आपली इंधनाची सध्याची आणि भविष्यातली देखील गरज भागवण्याची क्षमता कृषी उद्योगात आहे. ग्रामीण भागाच्या गरजा आणि गरजवंतांचा मानवी चेहरा केंद्रस्थानी ठेवून संशोधन करीत तंत्रज्ञानाचा विकास झाल्यास ग्रामीण भागातून येणारे लोंढे गावातच थांबतील आणि त्यांना स्थानिक पातळीवरच रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतील. कृषी आणि ग्रामीण भागाचा जीडीपी केवळ पंधरा ते सोळा टक्के आहे, ते योगदान वाढण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध करून देणे आपल्याला शक्य आहे. कृषी उद्योगाला ऊर्जा निर्मितीचाही पर्याय दिल्यास अधिक क्षमतेने प्रगती करता येईल, असा मला विश्वास आहे.
मुंबई-बंगलोर हा १४ पदरी द्रुतगती महामार्गाचे बांधकाम सहा महिन्यात सुरू करणार
मुंबईतील अटल सेतूपासून मुंबई-बंगलोर हा १४ पदरी द्रुतगती महामार्ग नव्याने बांधण्यात येणार असून हा महामार्ग पुणे रिंगरोडला जोडणारा असणार आहे. या नव्या महामार्गाची निविदा निघाली आहे.येत्या सहा महिन्यात महामार्गाचे बांधकाम सुरू होईल,” अशी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केली.या नव्या महामार्गामुळे मुंबईहून निघालेली अनेक वाहने पुणे शहरात न येता यामार्गे पुढे जातील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील आणि यामार्गे शहरात येणारी वाहतूक कोंडी कमी होऊ शकेल, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे येत्या काळात मुंबई-पुणे प्रवास अधिक वेगवान होण्याची चिन्हे आहेत.सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ आणि सीओईपी माजी विद्यार्थी संघटना यांच्या वतीने आयोजित ‘सीओईपी अभिमान पुरस्कार’ सोहळा गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी ते बोलत होते. ”मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग बांधला, त्यावेळी पुढील ५० वर्षात आपल्याला काही करावे लागणार नाही, असे आम्ही म्हणायचे.परंतु, नागपूरमधून मी निघालो आणि पुण्यात पोचलो. पण माझा मुलगा आणि सून मुंबईमधून निघाले आणि लोणावळ्यात एक तास अडकले. बरं झाले मी नवीन द्रुतगती महामार्ग निर्माण करण्याची घोषणा केली.” असेही गडकरी यांनी आवर्जून सांगितले.गडकरी म्हणाले,”मुंबईतील अटल सेतू पुलावरून उतरल्यावर तेथून थेट बंगलोरला जाणारा एक १४ पदरी द्रुतगती महामार्ग बांधण्याची निविदा निघाली आहे. हा महामार्ग थेट मुंबईहून निघून पुण्याच्या रिंग रोडला जोडून ‘मुंबई-पुणे रिंगरोड मार्गे- बंगलोर’ असा असेल.या महामार्गामुळे सध्याच्या ‘मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील अर्ध्याहून अधिक वाहतूक ही या मार्गाने पुढे जाईल. मुंबईतील अटल सेतूवरून खाली उतरल्यास लगेचच वाहने या १४ पदरी मुंबई- बंगलोर महामार्गाला लागतील, याचमार्गाने पुणे रिंग रोडमार्गे पुढे बंगलोरला जाणे शक्य होईल. तसेच या रस्त्याने पुढे दोन तासात वाहने छत्रपती संभाजीनगर रस्त्याला जोडली जातील.”