पुणे-मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (Special Intensive Revision – SIR) कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीच्या अनुषंगाने आज, दि. ३ जुलै रोजी महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न झाली.
या बैठकीस जिल्हाधिकारी पुणे जितेंद्र डुडी, अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) ओमप्रकाश दिवटे तसेच सर्व खातेप्रमुख, पुण्यातील सर्व मतदान नोंदणी अधिकारी, सर्व सहाय्यक आयुक्त व इतर संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
बैठकीमध्ये प्रारूप (Draft) मतदार यादीतील प्रत्येक मतदाराची मतदानासाठी पात्रता काटेकोरपणे पडताळण्या बरोबरच वगळण्यात आलेल्या (Deleted) मतदारांची अचूक नोंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत आणि त्रुटीमुक्त करण्यासाठी सर्व संबंधितांनी जबाबदारीने कार्य करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.
विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत घरपोच (House-to-House) भेटीद्वारे गणना (Enumeration) फॉर्मचे वितरण व संकलन तातडीने सुरू करून निर्धारित कालावधीत पूर्ण करण्यावर विशेष भर देण्यात आला. गणना फॉर्म केवळ प्रत्यक्ष उपस्थित असलेल्या नागरिकांनाच वितरित करावेत तसेच प्रत्येक दिवशी किमान १० टक्के फॉर्मचे वितरण पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
बैठकीत निवडणूक नोंदणी अधिकारी (ERO), सहाय्यक नोंदणी अधिकारी (ARO), सहाय्यक निवडणूक नोंदणी अधिकारी (AERO) तसेच मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांनी दैनंदिन कामकाजाचा नियमित आढावा घेऊन निर्धारित कालमर्यादेत सर्व कामे पूर्ण होतील याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले. ARO यांनी क्षेत्रभेटी करून कामाची प्रत्यक्ष पाहणी करावी, AERO यांनी संबंधित कामांचा नियमित समन्वय साधावा, तर ERO यांनी संपूर्ण प्रक्रियेचा सातत्याने आढावा घ्यावा. तसेच BLO यांच्या कामाचा नियमित आढावा घेऊन आवश्यक ते मार्गदर्शन करावे, असेही सांगण्यात आले.
प्रत्येक BLO यांना काम अधिक प्रभावीपणे पार पाडण्यासाठी तीन सहाय्यक नियुक्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच आवश्यकतेनुसार महिला बचत गट,अंगणवाडी सेविका आणि इतर स्थानिक स्वयंसेवी घटकांचे सहकार्य घेण्याचे आवाहन करण्यात आले.
ज्या भागांमध्ये कामाची गती अपेक्षेपेक्षा कमी आहे, त्या क्षेत्रांचा विशेष आढावा घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या. बैठकी दरम्यान अधिकारी, कर्मचारी व शिक्षकांच्या अडचणी जाणून घेत त्यांचे निराकरण करण्या बरोबरच मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी समन्वयाने, नियोजनबद्ध व जबाबदारीने कार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.
यावेळी आयुक्त, पुणे महानगरपालिका नवल किशोर राम म्हणाले,
“मतदार यादी ही लोकशाही प्रक्रियेचा मूलभूत आधार आहे. त्यामुळे प्रत्येक पात्र नागरिकाची अचूक नोंदणी होणे आणि अपात्र नोंदी वगळणे ही सर्व संबंधित यंत्रणांची सामूहिक जबाबदारी आहे. विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम नियोजनबद्ध, पारदर्शक आणि वेळेत पूर्ण करण्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समन्वयाने कार्य करावे.”
तसेच जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी म्हणाले,
“मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण अभियानाची यशस्वी अंमलबजावणी ही प्रत्येक क्षेत्रीय अधिकाऱ्याच्या सक्रिय सहभागावर अवलंबून आहे. घरपोच भेटीद्वारे पात्र मतदारांची अचूक नोंदणी, नियमित क्षेत्रीय पाहणी, दैनंदिन आढावा आणि निर्धारित कालमर्यादेचे काटेकोर पालन यांना सर्वोच्च प्राधान्य देऊन प्रत्येक काम गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करावे.”

