Home Blog Page 677

मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कार:8 ऑक्टोबर रोजी 70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात होणार सन्मान


यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार मिथुन चक्रवर्ती यांना देण्यात येणार आहे. नुकतेच केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी त्याची अधिकृत घोषणा केली आहे.

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या अधिकाऱ्याने ही घोषणा केली आहे. म्हणाले- आम्हाला हे जाहीर करताना अभिमान वाटतो की दादासाहेब फाळके निवड ज्युरीने भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल या वर्षी दिग्गज अभिनेते श्री मिथुन चक्रवर्ती यांना हा पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे.8 ऑक्टोबर 2024 रोजी होणाऱ्या 70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात मिथुन चक्रवर्ती यांना हा सन्मान देण्यात येणार आहे.

350 हून अधिक चित्रपट केले, 3 राष्ट्रीय पुरस्कार जिंकले

16 जून 1950 रोजी कोलकाता येथे जन्मलेल्या मिथुनदा यांनी बंगाली, हिंदी, तमिळ, तेलगू, कन्नड, ओडिया आणि भोजपुरी अशा विविध भाषांमध्ये 350 हून अधिक चित्रपट केले आहेत. तीन वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि दोनदा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे.मिथुन चक्रवर्ती यांना त्यांचा पहिला राष्ट्रीय पुरस्कार ‘मृगया’ चित्रपटासाठी मिळाला. बुद्धदेव दासगुप्ता यांच्या ‘तहादर कथा’ या बंगाली चित्रपटासाठी दुसरा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. या चित्रपटात मिथुन यांनी स्वातंत्र्यसैनिकाची भूमिका साकारली होती.

तिसरा राष्ट्रीय पुरस्कार ‘स्वामी विवेकानंद’ चित्रपटासाठी मिळाला. या चित्रपटात मिथुन यांनी रामकृष्ण परमहंस यांची भूमिका साकारली होती. काही कारणांमुळे हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होऊ शकला नाही. जानेवारी २०२४ मध्ये मिथुन चक्रवर्ती यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.मिथुन चक्रवर्ती यांचे 1989 साली 19 चित्रपट प्रदर्शित झाले होते, ज्यामध्ये ते मुख्य अभिनेता म्हणून दिसले होते. त्यांच्या या विक्रमाची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. या घटनेला जवळपास 35 वर्षे झाली आहेत, परंतु आजपर्यंत एकही अभिनेता हा विक्रम मोडू शकलेला नाही. 1982 मध्ये आलेला डिस्को डान्सर हा 100 कोटींची कमाई करणारा हिंदी चित्रपटातील पहिला चित्रपट आहे.

दि नाना स्पॉट हॉटेल जवळ पकडली पाच गावठी पिस्तुलं…

पुणे- ( प्रतिनिधी )
शिरूर शहरांतील दि नाना स्पॉट हॉटेल जवळ दोघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी करून झाडाझडती घेताच त्याच्याकडे पाच गावठी पिस्तुलांसह चार जिवंत काडतूसे मिळून आली असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.
शिरुर तालुक्यात अनेक ठिकाणी पिस्तुल घेऊन फिरणाऱ्या सराईतावर पोलीस प्रशासनाने कारवाया केलेल्या असताना नुकतेच शिरुर शहरात पाच पिस्तुल घेऊन आलेल्या दोघांना पोलिसांनी पाच पिस्तुलसह जेरबंद केल्याने तालुक्यात पिस्तुलांचा बाजार भरला आहे का? अशी शंका येत आहे.
अनिकेत विलास गव्हाणे (वय २० वर्षे रा. गव्हाणवाडी गोपाळवस्ती ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर) व मंगेश दादाभाऊ खुपटे (वय २० वर्षे रा. जवळा ता. पारनेर जि. अहमदनगर) या दोघांवर गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे.या बाबत पोलिसांनी दिलेली माहिती पुढीलप्रमाणे शिरुर शहरातील बायपास रोड लगत असलेल्या दि नाना स्पॉट हॉटेल जवळ दोघे युवक पिस्तुल घेऊन येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांना मिळाली, त्यांनतर पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, शिरूर उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले, यांचें मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांचे सुचनेने सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंतराव गिरी, पोलीस हवालदार नाथा जगताप, रघुनाथ हळनोर, निखील रावडे, विजय शिंदे, निरज पिसाळ यांसह आदींनी सदर ठिकाणी जाऊन सापळा रचला असता त्यांना दोन संशतीय युवक आल्याचे दिसून आल्याने पोलिसांनी त्यांच्या जवळ जात त्यांची चौकशी करत झडती घेतली असता त्यांच्या जवळ तब्बल पाच गावठी पिस्तुलांसह चार जिवंत काडतूस मिळून आले, दरम्यान पोलिसांच्या पथकाने त्यांच्या जवळील सर्व पाच पिस्तुल व जिवंत काडतुसांसह त्यांना ताब्यात घेत अनिकेत गव्हाणे, मंगेश खुपटे अशी त्यांची नावे असून, फिर्यादीवरुन त्याच्यावर आर्म ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून,पुढील तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंतराव गिरी हे करत आहे.
शिरूर शहराचे नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी शिरूर पोलीस स्टेशनचा कारभार हाती घेतात रोड रोमिओ, गाड्यांच्या काळ्या काचावाले भाई दादा, अल्पवयीन वाहन चालक, यास अनेक गुन्हेगारांनी त्यांच्या कारवाईचा धसका घेतला आहे .

‘एमआयटी एडीटी’ विद्यापीठात रक्तदान शिबिर

अभियंता दिनाच्या निमित्ताने आयोजन; विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद 

पुणेः राष्ट्रीय अभियंता दिनाच्या निमित्ताने येथील एमआयटी एमआयटी आर्ट, डिझाइन, आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठात, राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) व राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. विद्यापीठाच्या या सामाजिक आवाहनाला विद्यार्थ्यांनीही उदंड प्रतिसाद देल्याने या शिबिरातून तब्बल १५० रक्त पिशव्या संकलीत करण्यात आल्या. 

या रक्तदान शिबिराचे उद्घाटन समारंभात विद्यापीठाचे प्र.कुलगुरु डॉ.रामचंद्र पुजेरी यांच्या हस्ते तर डॉ. रजनीश कौर सचदेव बेदी, डॉ. विपुल दलाल,  डॉ. वीरेंद्र शेटे, डॉ. सुदर्शन सानप, डॉ सूराज भोयर, एनसीसी समन्वयक मेजर सुमन कुमारी, एनएसएस समन्वयक प्रा.विशाल पाटील, प्रा. डॉ. हनुमंत पवार, प्रा. डॉ. सचिन पवार यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी, सर्व कार्यक्रम आधिकारी, राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक, एनसीसी कॅडेट्स उपस्थित होते.

यावेळी उपस्थित प्रत्येक मान्यवराने रक्तदानाचे महत्व विशद करताना, एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या सामाजिक उपक्रमाचे व विद्यार्थ्यांच्या सामाजिक बांधीलकीचे भरभरून कौतुक केले. एमआयटी-एडीटी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष आणि कुलगुरू प्रा. डॉ. मंगेश कराड यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करून महाविद्यालयीन जिवनात आपण समाजाचे काहीतरी देणं लागतो, हा संदेश विद्यार्थ्यांना देण्यात आला. 

डॉ .डी.वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय आणि संशोधन केंद्रामध्ये “तंबाखू व्यसन मुक्ती केंद्राचे” उद्घाटन

पुणे: देशभरातील विविध वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये उभारण्यात आलेल्या तंबाखू सेसेशन सेंटर (टीसीसी) अर्थात तंबाखू व्यसनमुक्ती केंद्रांचे उद्घाटन करून आज राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत  तंबाखूमुक्त युवा अभियानातील दुसरा महत्त्वपूर्ण टप्पा गाठण्यात आला. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या या उपक्रमाअंतर्गत केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी आज थेट प्रक्षेपणाद्वारे या केंद्रांचे उद्घाटन केले पिंपरी येथील डॉ.डी.वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयातही हे केंद्र उभारण्यात आले आहे. तंबाखूचे व्यसन सोडू इच्छिणाऱ्या लोकांना यातून बाहेर काढण्यासाठी मानसिक, वैद्यकीय व आवश्यक ते सर्व साह्य प्रदान करणे हा या केंद्रांचा उद्देश आहे.

राष्ट्रव्यापी उद्घाटनाच्या अनुषंगाने मंगळवारी (ता.२४) डॉ.डी.वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील केंद्राचे अधिकृत उद्घाटन करण्यात आले. संस्थेतील सामुदायिक औषध विभाग आणि मानसोपचार विभागाच्या समन्वयाने हे केंद्र सुरू करण्यात आले आहे. या उदात्त उपक्रमाचा भाग असल्याचा संस्थेला अभिमान वाटतो.

डॉ डी वाय पाटील दंतचिकित्सा महाविद्यालयांमध्ये २०१८ मध्ये तंबाखू व्यसनमुक्ती केंद्र सुरू करून या उपक्रमाची पायाभरणी करण्यात आली होती. आता वैद्यकीय संस्थांचा समावेश करून सार्वजनिक आरोग्य आणि तंबाखू नियंत्रणासाठी सरकारच्या वचनबद्धतेला बळकटी देण्यात येत आहे. सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, ही केंद्रे तंबाखू चे व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी आवश्यक गुणवत्तापूर्ण वैद्यकीय सेवा प्रदान करण्याबरोबर डॉक्टरांचे मार्गदर्शन, समुपदेशन या सेवा दिल्या जात आहे.

डॉ.डी.वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय आणि संशोधन केंद्राने नेहमीच निरोगी आरोग्याबरोबर सामाजिक जबाबदारीचे भान बाळगत, समाजाचे ऋण फेडण्यास प्राधान्य दिले आहे, अशी भावना डॉ.डी.वाय. पाटील विद्यापीठाचे विश्वस्त डॉ. यशराज पाटील यांनी यावेळी व्यक्त केली. ते म्हणाले,  “आमच्या संस्थेत आम्ही नेहमीच सामाजिक जबाबदारीवर विश्वास ठेवला आहे. नॅशनल टोबॅको सेसेशन सेंटर उपक्रमात आम्ही सक्रिय सहभाग घेऊन तंबाखूमुक्तीबरोबर  समाजाच्या सर्वांगीण कल्याणासाठी आम्ही सुलभ आरोग्य सेवा देत जनसामान्यात जागरुकता कार्यक्रम राबविण्यासाठी वचनबद्ध आहोत. हा उपक्रम तंबाखूमुक्त भविष्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे आणि त्याचा एक भाग असल्याचा आम्हाला अभिमान वाटतो.”
डॉ डी वाय पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता  डॉ. जे.एस. भवाळकर म्हणाले, “आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचा हा उपक्रम समाजसेवा आणि सार्वजनिक आरोग्याला चालना देण्याच्या आमच्या दृष्टिकोनाशी सुसंगत आहे. देशभरातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये तंबाखूमुक्ती केंद्रे स्थापन केल्याने या व्यसनाच्या आहारी गेलेल्या व अनावधानाने व्यसनाच्या विळख्यात सापडलेल्या रुग्णांना याचा फायदा होईल.  तंबाखूच्या व्यसनावर मात करण्यासाठी आवश्यक त्यासर्व सेवा देण्याची आम्ही कटिबद्ध आहोत.
सामुदायिक औषध विभागाच्या प्रमुख डॉ. हेतल राठोड म्हणाल्या, “तंबाखू सेसेशन सेंटर केवळ व्यावसायिक सहाय्यच प्रदान करणार नाही, तर लोकांना योग्य मार्गदर्शन करून तंबाखू सोडण्यासाठी सक्षम करेल.  या परिवर्तनीय उपक्रमाचा भाग असल्याचा आम्हाला अभिमान आहे.”

सामुदायिक औषध विभागाच्या सहाय्यक प्राध्यापिका डॉ. कविता विश्वकर्मा म्हणाल्या, “डॉ. डी.वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील या केंद्राच्या माध्यमातून तंबाखूच्या व्यसनातून मुक्त होण्यासाठी लोकांना मदत करण्यात सक्रिय भूमिका बजावण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. येथे येणाऱ्या व्यक्तींना-मग ते रुग्ण असोत की त्यांना भेटायला येणारे नातेवाईक, मित्र कोणीही असो, त्यांना मार्गदर्शन करणे, प्रत्येक पायरीवर योग्य माहिती देणे हे आमचे ध्येय आहे. आमचा हा उपक्रम तंबाखूमुळे होणाऱ्या गंभीर आजारांना आळा घालण्याच्या राष्ट्रीय अभियानाशी सुसंगत आहे. आम्हाला विश्वास आहे की  योग्य सुविधा, समुपदेशन सेवा आणि उपचारपश्चात्त देखभाल प्रदान करून, आम्ही तंबाखूच्या व्यसनातून मुक्त करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकतो. आमचे ध्येय केवळ रूग्णांवर उपचार करणे नाही तर त्यांना निरोगी जीवनशैली निवडण्यासाठी शिक्षित आणि सक्षम करणे हे आहे.”

तंबाखूच्या व्यसनावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये तंबाखू निरसन केंद्रांची स्थापना हा एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरतो आहे, असे डॉ. सुप्रकाश चौधरी, प्राध्यापक आणि विभागप्रमुख, मानसोपचार विभाग, डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर, पिंपरी यांनी स्पष्ट केले. तंबाखूचे व्यसन शारीरिक आणि मानसिक आव्हान असल्याचे सांगून डॉ. चौधरी यांनी या केंद्रांमध्ये पुराव्यावर आधारित उपचार आणि वैयक्तिक सल्लामसलत दिली जाणार असल्याचे सांगितले, ज्यात तंबाखू सोडण्याच्या मानसिक व भावनिक पैलूंवर विशेष लक्ष केंद्रित केले जाईल. “आम्ही तंबाखूपासून मुक्त होऊ इच्छिणाऱ्या लोकांना सातत्यपूर्ण आधार प्रदान करून त्यांचे आरोग्य आणि कल्याण पुन्हा मिळवून देण्यास कटिबद्ध आहोत,” असेही त्यांनी सांगितले. या उपक्रमाचा उद्देश समाज जागृती मोहिमा आणि शैक्षणिक उपक्रमांद्वारे तरुणांमध्ये तंबाखूच्या व्यसनाबद्दल जनजागृती करणे आहे.

या उपक्रमाचे उद्दिष्ट जागृती मोहिमेद्वारे आणि शैक्षणिक उपक्रमांद्वारे समुदायांपर्यंत पोहोचणे हे आहे. विशेषत: तरुणांना पहिल्यापासूनच तंबाखूपासून दूर राहण्यासाठी जागरुक करणे हे ध्येय आहे. सरकारने सोशल मीडिया एन्फ्ल्यूएन्सरनादेखील या अभियानाचा भाग होणे अनिवार्य केले असून, युवकांमध्ये जागरूकता वाढविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

फार्मासिस्ट हा आरोग्य व्यवस्थेचा एक महत्वाचा आधारस्तंभ

पुणे : सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन संचालित सूर्यदत्त कॉलेज ऑफ फार्मसी हेल्थकेअर अँड रिसर्चमध्ये (एससीपीएचआर) जागतिक फार्मासिस्ट दिवस साजरा करण्यात आला. ‘सूर्यदत्त’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांच्या मार्गदर्शनाखाली उपाध्यक्षा सुषमा चोरडिया व सहयोगी उपाध्यक्षा स्नेहल नवलखा यांच्या नेतृत्वात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आरोग्य क्षेत्रात फार्मासिस्टची महत्वपूर्ण भूमिका आणि त्याचे समर्पण याविषयी जागृतीपर कार्यक्रम उत्साहात झाला.

इंटरनॅशनल फार्मास्युटिकल फेडरेशनने जाहीर केलेल्या (एफआयपी) ‘फार्मासिस्ट : मीटिंग ग्लोबल हेल्थ नीड्स’ संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमातून फार्मासिस्टचे समुपदेशन किती उपयुक्त आहे, यावर प्रकाश टाकण्यात आला. अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त गिरीश हुकारे यांच्या विशेष मार्गदर्शनाने पदविका व पदवीच्या विद्यार्थ्यांच्या, शिक्षकांच्या व आरोग्य क्षेत्रातील व्यावसायिकांच्या ज्ञानात भर घातली. फार्मासिस्टच्या जबाबदाऱ्या, रुग्णाची काळजी, औषधांची सुरक्षितता आणि सार्वजनिक आरोग्याचे सक्षमीकरण यावर त्यांनी मार्गदर्शन केले. फार्मासिस्ट हा आरोग्यसेवेचा एक महत्वाचा आधारस्तंभ असल्याचे ते म्हणाले.

बावधन परिसरात भव्य रॅली काढत विद्यार्थ्यांनी जागोजागी पथनाट्य सादर केले. औषधांचे विविध उपयोग आणि फार्मासिस्टचे महत्व यामधून विशद करण्यात आले. सल्लागार समितीचे सदस्य व मेंटॉर प्रसन्न पाटील यांनी विद्यार्थ्यांना फार्मासिस्टची शपथ दिली. फार्मासिस्ट दिवसाच्या निमित्ताने ई-पोस्टर, रील्स, ई-प्रश्नमंजुषा, घोषवाक्य लेखन, रांगोळी अशा विविध स्पर्धांचे आयोजन केले होते. प्राचार्य डॉ. हेमंत जैन, कार्यक्रम समन्वयक डॉ. सारिका झांबड व दीपाली कुदळे यांनी सर्व सहभागी विद्यार्थीं, शिक्षक, प्रायोजक यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

याप्रसंगी बोलताना प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “डॉक्टरांच्या सल्ल्याने रुग्णाला औषधोपचार दिले जातात. मात्र, त्याचे वितरण व पुरवठा करण्याचे मोलाचे काम फार्मासिस्ट करतात. आरोग्य व्यवस्थेतील हा एक प्रमुख घटक आहे. गावखेड्यात, जिथे डॉक्टर वेळेवर उपलब्ध होत नाही, तिथे फार्मासिस्ट डॉक्टारांप्रमाणे योग्य औषधोपचार देण्याचे काम करतो. समर्पित भावनेने काम करणारे फार्मासिस्ट घडविण्यावर सूर्यदत्त संस्थेने नेहमीच भर दिला आहे.”

मागेल त्याला सौर कृषी पंप, महावितरणच्या वेबसाईटला शेतकऱ्यांचा उदंड प्रतिसाद

0

मुंबई, – मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेत शेतकऱ्यांनी अर्ज करण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सुरु केलेल्या महावितरणच्या वेबसाईटला उदंड प्रतिसाद मिळाला असून केवळ चौदा दिवसात १ लाख २२ हजार शेतकऱ्यांनी त्यावर नोंदणी केली आहे, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिली.
राज्य सरकारने मागेल त्याला सौर कृषी पंप ही योजना शेतकऱ्यांसाठी सुरू केली आहे. त्यासाठीची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज करता यावा यासाठी महावितरणने वेबसाईट तयार केली असून तिचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दि. १३ सप्टेंबर रोजी मुंबईत समारंभपूर्वक झाले होते. त्यानंतर केवळ १४ दिवसात दि. २७ सप्टेंबरपर्यंत राज्यातील १,२२,४२१ शेतकऱ्यांनी वेबसाईटवर अर्ज दाखल केले होते.
मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेत वेबसाईटवर अर्ज दाखल करण्यामध्ये जालना जिल्ह्याने बाजी मारली आहे. जालना जिल्ह्यातून ५२,०६७ अर्ज दाखल झाले आहेत. त्यानंतर राज्यात मराठवाड्यातील बीड (२४,५२६ अर्ज), परभणी (१५,०४३ अर्ज), छत्रपती संभाजीनगर (६,८८८ अर्ज) आणि हिंगोली (५,०७९ अर्ज) या जिल्ह्यांचा क्रम लागतो.
या योजनेत शेतकऱ्यांना जमिनीच्या क्षेत्रफळानुसार तीन ते साडेसात एचपीपर्यंतचे पंप मंजूर होतात. शेतकऱ्यांना सौर ऊर्जा निर्मिती पॅनेल्स व कृषी पंप असा सर्व संच केवळ दहा टक्के रक्कम भरून मिळतो. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांसाठी लाभार्थी हिस्सा केवळ पाच टक्के आहे. शेतकऱ्यांना ऊर्वरित रक्कम केंद्र व राज्य सरकारकडून सबसिडीच्या स्वरुपात मिळते. सौर ऊर्जा निर्मिती पॅनेल्समधून २५ वर्षे वीजनिर्मिती होत असल्याने एकदा संच बसविला की, शेतकऱ्याला २५ वर्षे हक्काचे व स्वतंत्र सिंचनाचे साधन मिळते. शेतकरी पारंपरिक ग्रीडमधून मिळणाऱ्या वीज पुरवठ्यावर अवलंबून राहत नाही तसेच त्याला बिलही येत नाही. सिंचनासाठी केवळ दिवसा वीज पुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांच्या सोईचे होते. राज्य सरकारने ही योजना जाहीर केल्यानंतर शेतकऱ्यांकडून तिला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.
या वेबसाईटवर नोंदणी करा-मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी https://www.mahadiscom.in/solar_MTSKPY/index_mr.php या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज दाखल करावा. वेबसाईटवर योजनेविषयी संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. तसेच शेतकरी वीज ग्राहकांचे शंका समाधान करण्यासाठी सविस्तर प्रश्नोत्तरेही आहेत. अर्ज दाखल केल्यानंतर पुढील प्रगतीची माहितीही वेबसाईटवर तपासता येते.

दक्षिण पुण्यात ५७ लाखाचे अफिम पकडले

पुणे- भारती विदयापीठपोलिसांनी दक्षिण पुण्यातील आंबेगाव भागात कारवाई करुन ५६,९०,०००/- रु किंमतीचा अफिम हा अंमली पदार्थ जप्त केला आहे आणि एकाला अटक केली आहे.

या संदर्भात पोलिसांनी दिलेली माहिती अशी कि,’पोलीस आयुक्त यांनी पुणे शहरातील अंमली पदार्थाचे समुळ उच्चाटन करणेबाबत सुचना दिले असून त्या अनुषंगाने दि.२८/०९/२०२४ रोजी पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड तसेच अधिनस्त पोलिस अधिकारी व पोलिस अंमलदार असे पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील पोलीस ठाणेच्या परीसरात पेट्रोलींग करीत असताना पोलीस अंमलदार योगेश मांढरे यांना मिळालेले बातमीनुसार १०/४५ वा आंबेगाव, पुणे येथील सार्वजनिक रोडवर सार्वजनिक ठिकाणी देविलाल शंकरलाल आहीर, वय ४२ वर्ष रा. कात्रज, पुणे याला पकडून त्याच्या ताब्यातुन एकुण ५६,९०,०००/- रु.कि.चा २ किलो ८४५ ग्रॅम अफिम हा अंमली पदार्थ तसेच माल लपविण्याकरीता वापरलेली अॅक्टीव्हा गाडी व मोबाईल जप्त करण्यात आला आहे..
हि कारवाई ही पोलीस आयुक्त,अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त, रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे शैलेश बलकवडे, पोलीस उप- आयुक्त, गुन्हे, निखील पिंगळे सहा पोलीस आयुक्त, गुन्हे २ श्री. राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक २, गुन्हे शाखा, पुणे शहर कडील पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहा. पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, पोलीस उप-निरीक्षक दिगंबर चव्हाण, पोलीस अंमलदार योगेश मांढरे, चेतन गायकवाड, प्रशांत बोमादंडी, संदिप जाधव, उदय राक्षे, दिशा खेवलकर, संदिप शेळके, नितीन जगदाळे, युवराज कांबळे, दिनेश बास्टेवाड यांनी केली आहे.

नर्सिंग करू इच्छिणाऱ्या गरजू विद्यार्थिनींना ‘सूर्यदत्त’ देणार मोफत शिक्षण-सुषमा चोरडिया

बारावी उत्तीर्ण झालेल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आरोग्य क्षेत्रात सेवेची संधी

पुणे : नर्सिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या ग्रामीण भागातील गरीब, गरजू व हुशार विद्यार्थिनींना सूर्यदत्त कॉलेज ऑफ नर्सिंगच्या वतीने मोफत शिक्षण देण्यात येणार आहे. त्यामुळे बारावी उत्तीर्ण विद्यार्थिनींना आरोग्य क्षेत्रात सेवा करण्याची संधी मिळणार आहे, अशी माहिती सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या उपाध्यक्षा सुषमा चोरडिया यांनी दिली.

पुण्यातील सूर्यदत्त कॉलेज ऑफ नर्सिंगतर्फे विद्यार्थ्यांना नर्सिंग क्षेत्रात उच्च दर्जाचे शिक्षण व व्यापक प्रशिक्षण दिले जात असून, नर्सिंग क्षेत्रात कुशल आणि तज्ज्ञ व्यावसायिक निर्माण करण्याच्या उद्देशाने यंदापासून ही संस्था सुरु झाली आहे. अत्याधुनिक शिक्षण तंत्र, वैद्यकीय सुविधा आणि प्रत्यक्ष अनुभव यांचा संगम साधून विद्यार्थ्यांसाठी आदर्श व्यासपीठ उभारले आहे.

प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांच्या कुशल नेतृत्वात व मार्गदर्शनात नर्सिंग क्षेत्रात सूर्यदत्तने पाऊल टाकले आहे. इथे केवळ नर्सिंगचे पुस्तकी धडे शिकवले जात नाहीत, तर प्रत्यक्ष रुग्णसेवा करताना परिचारिका म्हणून कसे काम करावे, याचे प्रात्यक्षिक ज्ञान व प्रशिक्षण दिले जाते. काळानुरूप शिक्षणात झालेल्या आमूलाग्र बदलांनुसार नावीन्यपूर्ण तांत्रिक साधने आणि उपकरणे विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली जातात. नर्सिंग क्षेत्रातील अद्ययावत अभ्यासक्रम आणि विविध तांत्रिक कौशल्ये आत्मसात करण्यासाठी महाविद्यालयात अत्याधुनिक प्रयोगशाळा, सुसज्ज प्रयोगशाळा आणि संगणक सुविधा आहेत.

सूर्यदत्त कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये वैद्यकीय क्षेत्रातील अनुभवी व कुशल प्राध्यापक असून, त्यांच्याकडून विद्यार्थ्यांना नर्सिंगच्या तांत्रिक बाबींचा सखोल अभ्यास करण्याची संधी मिळते. वैद्यकीय क्षेत्रातील संशोधन, नावीन्यता आणि सर्जनशीलतेवर मार्गदर्शन करतात. यामुळे विद्यार्थ्यांना वैद्यकीय सेवा क्षेत्रात उत्तम तज्ज्ञ होण्यासाठी आवश्यक कौशल्ये मिळतात. यासह ‘सूर्यदत्त’च्या विद्यार्थ्यांना विविध नामांकित रुग्णालयांमध्ये प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेता येणार आहे. रुग्णांची काळजी कशी घ्यावी, उपचारांची योजना कशी करावी आणि रुग्णांची मानसिक तसेच शारीरिक स्थिती कशी हाताळावी, याचे ज्ञान विद्यार्थ्यांना या रुग्णालयांतून मिळेल. त्यातून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढण्यासह त्यांना व्यावसायिक जीवनात सक्षमपणे काम करण्यास प्रेरणा मिळेल, असे सुषमा चोरडिया म्हणाल्या.

शैक्षणिक अभ्यासक्रमासह व्यक्तिमत्व विकासावरही सूर्यदत्तमध्ये भर दिला जातो. पदवीधर विद्यार्थ्यांना विविध नामांकित रुग्णालयांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात. महाविद्यालयाच्या प्लेसमेंट सेलद्वारे विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवरही काम करण्याची संधी मिळते. नर्सिंग प्रवेशासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत २० ऑक्टोबर २०२४ अशी आहे. सूर्यदत्त कॉलेज ऑफ नर्सिंग, पॅरामेडिकल सायन्सेस अँड टेक्नॉलॉजी, सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स, बावधन, ता. मुळशी, जि. पुणे-४११०२१ या पत्त्यावर अर्ज व शिफारस पत्र पाठवावेत. अधिक माहितीसाठी www.scnpst.org/ या संकेतस्थळावर, तसेच ७७७६०७२०००, ८९५६९३२४०० किंवा ८९५६३६०३६० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे संस्थेच्या वतीने कळवण्यात आले आहे.

गरजू मुलींच्या शिक्षणासाठी ‘सूर्यदत्त’चा पुढाकार : चोरडिया

“नर्सिंग क्षेत्रात करिअर करण्याचे स्वप्न असलेल्या विद्यार्थ्यांसाठी सूर्यदत्त कॉलेज ऑफ नर्सिंग हे एक उत्तम ठिकाण आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी आणि रुग्णसेवेचा वसा घेण्याची इच्छा असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याचे येथे स्वागत होईल. आधुनिक काळात वैद्यकीय सेवेची व्याप्ती वेगाने बदलत असून, त्यानुसार येथे शिक्षण देण्याची सुविधा केली आहे. महाराष्ट्रातील गरजू विद्यार्थिनी, ज्यांना आर्थिक परिस्थितीअभावी शिक्षण घेणे जिकिरीचे होते, अशा मुलींना सूर्यदत्त संस्थेने नेहमीच मोफत शिक्षण देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. आपल्या भागातील अशा गरजू मुलींची शिफारस आपण सूर्यदत्तकडे करावी.”

– प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, संस्थापक अध्यक्ष, सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन

३० दिवसात लोणीकंद पोलसांनी ८ देशी बनावटीचे पिस्तुल व २६ जिवंत काडतुसे केली जप्त

पुणे- पुण्यात पिस्तुल आणि कोयते सहजासहजी मिळू लागल्याचे स्पष्ट झाले असून गेल्या ३० दिवसात लोणीकंद पोलिसांनी ८ देशी बनावटीचे पिस्तुले आणि त्याच्या २६ गोळ्या (जिवंत काडतुसे )जप्त केली आहे .

लोणीकंद पोलीसांनी जबरी चोरी करणारे दोघांकडुन एक वाहन, ०१ देशी बनावटीचे पिस्तुल व ०३ जिवंत काडतुसे केली हस्तगत.
-लोणीकंद पोलीस स्टेशन, गु.र.नं.८८५/२०२४ भारतीय न्याय संहीता कलम ३०९ (४),१२६(२), ३५१ (२),३ (५),३२४(४) अन्वये दाखल गुन्हयातील फिर्यादी हे त्यांचे ताब्यातील मंहिद्रा कंपनीची XUV 300 गाडीने नगरकडुन पुणे कडे येत असताना आरोपीतांनी फिर्यादीची गाडी अडवुन त्यांचा मोबाईल व गाडी जबरीने चोरी करुन घेवुन गेले म्हणुन दिनांक १४/०९/२०२४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दाखल गुन्हयात अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, मनोज पाटील, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ४ पुणे शहर हिम्मत जाधव, व सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग, पुणे शहर श्रीमती प्रांजली सोनवणे, यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोणीकंद पोलीस स्टेशन, पुणे शहर पंडीत रेजितवाड यांना सदरचा गुन्हा उघडकीस आणणे बाबत मार्गदर्शन करुन सुचना दिल्या.
नमुद गुन्हयाचा तपास चालू असताना दिनांक २८/०९/२०२४ रोजी पहाटे पोलीस नाईक स्वप्निल जाधव यांना त्यांचे गोपनिय बातमीदारा मार्फत मिळालेल्या माहीती नुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडीत रेजितवाड, सपोनि रविंद्र गोडसे व पोलीस अंमलदार पोलीस नाईक स्वप्निल जाधव, कैलास साळुंके, अजित फरांदे, पोलीस अमंलदार साईनाथ रोकडे, विशाल गायकवाड यांनी बांगर वस्ती रोड, केसनंद या ठिकाणी सापळा रचुन दोन इसम नामे १) सचिन राजाराम ढोरे, वय ३८ वर्षे, रा. ढोरे वस्ती, मौजे केसनंद ता. हवेली जि.पुणे २) मंथन दत्तात्रय धुमाळ, वय २६ वर्षे, रा. साईनगर, खराडी चंदननगर पुणे यांना शिताफिने ताब्यात घेतले. त्यांचेकडुन गुन्हयात वापरलेली एक मारुती स्विप्ट कार तसेच अंगझडतीमध्ये ०१ देशी बनावटीचे पिस्तुल व ०३ जिवंत काडतुसे असा एकुण ५,२३,०००/- रुपयेचा मुददेमाल जप्त करुन नमुद आरोपी यांना दाखल गुन्हयात दिनांक २८/०९/२०२४ रोजी अटक करुन गंभीर स्वरुपाचा गुन्हा उघडकीस आणला आहे. अदयापावेतो झालेल्या तपासात यापुर्वी ०१ आरोपी पोलीस कस्टडीत असुन अटक केलेल्या दोन आरोपीना न्यायालयाने दिनांक ३०/०९/२०२४ रोजी पर्यंत ०२ दिवसांची पोलीस कस्टडी रिमांड सुनावली आहे. पुढील तपास सहा. पो. निरि. रविंद्र गोडसे हे करीत आहेत.

भीम पुष्पांजलि मधून गडपायले याना अभिवादन!

पुणे:आंबेडकरी चळवळीला काव्य आणि गायनातून अपूर्व योगदान देणाऱ्या राजानंद गडपायले आणि शांताबाई गडपायले या दांपत्याला शनिवारी अभिवादन कार्यक्रमातून अभिवादन करण्यात आले. पुणे स्टेशन येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोर प्रांगणात अभिवादन सभा झाली.राहुल शिंदे यांच्या सहकारी मंडळी यांनी  गडपायले यांची गीते सादर करून अभिवादन केले.

 अभिवादन सभेचे अध्यक्ष आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते वसंतराव साळवे होते.कार्यक्रमाचे संयोजन सम्यक पुरस्कार समितीच्या वतीने नागेश भारत भोसले आणि सहकाऱ्यांनी केले.अभिवादन सभेचे प्रास्ताविक युवक क्रांती दलाचे राज्य कार्यवाह जांबुवंत मनोहर यांनी केले, राहुल नागटिळक, हेमलताताई भालेराव, प्रदीप दादा चव्हाण, वंचित बहुजन आघाडी पुणे शहराध्यक्ष एड. अरविंद तायडे,राहुल डंबाळे,अनिल हातागळे, शकुंतलाताई शेलार , सतीश गायकवाड, यशवंत धनविजय यांनी अभिवादन त्यांच्या कार्याचा उजाळा मांडला.

अभिवादन सभेकरता त्यांच्या घरातील तिन्ही नातवंड,सुना व जवळचे नातेवाईक राजेश राऊतसह इतर नातेवाईक उपस्थित होतेयावेळी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) शहराध्यक्ष शैलेंद्र चव्हाण, बहुजन समाज पार्टीचे नेते दिलीप कुसाळे, दलित पॅंथरचे नेते अशोक पगारे, भारतीय बौद्ध महासभेचे भगवान शिंदे,एड.भाई विवेक चव्हाण, काँग्रेस अनुसूचित जाती जमाती सेलचे सुजित यादव, शैलेश मोरे, शाम गायकवाड, सुहास बनसोडे, यशवंत नडगम, सचिन बगाडे, सुवर्णाताई डंबाळे, राजेंद्र चौधरी इ. मान्यवर उपस्थित होते.

 अभिवादन सभेचे सुत्रसंचलन दिपक म्हस्के यांनी केले. तर आभार दीपक गायकवाड यांनी मानले. कार्यक्रमाचे संयोजन सम्यक पुरस्कार समितीच्या वतीने नागेश भारत भोसले आणि सहकाऱ्यांनी केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत गायनाची संधी मिळालेले कवी राजानंद गडपायले यांच्या पत्नी ज्यांनी संपूर्ण आयुष्य आपल्या गायकीतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीचा गावोगावी जाऊन प्रसार केला अशा शांताबाई राजानंद गडपायले यांची हीअभिवादन सभा ‌ होती

शिवाजीनगर मतदार संघात आमदार विशेष निधीद्वारे अनेकविध कामांचे भूमिपूजन संपन्न


पुणे : छत्रपती शिवाजीनगर मतदार संघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या आमदार विशेष निधीमधून पीएमसी कॉलनी, पांडवनगर, वडारवाडी याबरोबरच खिलारेवाडी वसाहत, रामोशीवाडी व गोखलेनगर या भागांमध्ये तब्बल २ कोटी १० लाख रुपयांच्या कामांना सुरुवात झाली असून नुकतेच या कामांचे भूमिपूजन शिरोळे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.

या अंतर्गत पीएमसी कॉलनी येथे विविध विकास कामे, पांडवनगर डोंगरे हॉल समोर, नरेगल मठ येथे, बसवेश्वर मठ मागे, मयुरेश्वर मित्र मंडळ ८८३ वडारवाडी, चाळ नं ३२ गोखलेनगर आणि रामोशीवाडी येथील न्यूजन मित्र मंडळ, रामोशीवाडी वेताळ झोपडपट्टी, वेताळ मित्र मंडळ येथे नवीन ड्रेनेज लाईन टाकणे, रामोशीवाडी येथे कॉंक्रीटीकरण करणे, हेल्थ कॅम्प चाळ नं ३ व ९ येथील नळकोंढाळा दुरुस्त करीत  नवीन ड्रेनेज लाईन टाकणे, खिलारेवाडी वसाहत भागातील प्लॉट नं १५, प्लॉट नं १७ व नदीपात्रालगत परिसरात विविध विकास कामे करणे, पंचमुखी सेवाभावी ट्रस्ट गोखलेनगर येथे पेव्हिंग ब्लॉक बसविणे आदी महत्त्वाच्या कामांचा समावेश आहे.

यावेळी भारतीय जनता पक्ष व महायुतीचे छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते. याशिवाय शिरोळे यांच्या हस्ते जनवाडी, निलज्योती या भागातील कामांचे भूमीपूजन झाले तर डोंगरे हॉल येथे मनपा ‘स्वच्छ’च्या कर्मचारी यांना रेनकोट, हॅन्डग्लोज या विविध वस्तू वाटपाचा कार्यक्रम देखील संपन्न झाला.

पत्नीने प्रियकराचे मदतीने केला पतीचा खुन पत्नीस व प्रियकारास ४८ तासात अटक

भारती विद्यापीठ तपास पथकाची कामगीरी

पुणे- प्रियकराच्या मदतीने विवाहितेने आपल्या पतीचा खून करून अकस्मात मयत दाखविण्याचा प्रयत्न केल्यावर पोलिसांनी तपास करून या दोघांचा गुन्हा ४८ तासात उघडकीस आणून त्यांना अटक केली आणि न्यायालयापुढे हजरही केले . या स्नाद्र्भात पोलिसांकडून देण्यात आलेली माहिती अशी कि,’
दिनांक २३/०९/२०२४ रोजी भारती हॉस्पिटल कात्रज पुणे येथुन भारती विदयापीठ पोलीस ठाणे येथे खबर मिळाली की, इसम गोपीनाथ बालु इंगुळकर वय ३७ वर्षे रा. दुगडशाळे जवळ सच्चाईमाता मंदिर जवळ कात्रज पुणे यांना बेशुध्द अवस्थेत भारती हॉस्पिटल येथे आणले असता डॉक्टर यांनी उपचारापूर्वी मयत घोषीत केले. आकस्मात मयत रजि.२२९/२०२४ प्रमाणे दाखल करण्यात आले व ससुन हॉस्टिटल येथे मयताचे शव विच्छेदन झाल्यानंतर मयतास मरण हे गळा दाबल्याने आल्याचे निष्पन्न झाले. त्यावरुन मृत्यु संशयास्पद असल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री दशरथ पाटील यांनी तात्काळ सदर मयताबाबत सखोल तपास करणे बाबत भारती विद्यापाठ पोलीस ठाणे तपास पथक यांना आदेश दिले वरुन तपास प्रमुख सपोनि समिर कदम यांनी वपोनि यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकामधील अंमलदार यांच्या चार वेगवेगळ्या टिम तयार करुन रवाना केल्या.
त्यावरुन स.पो. फौ. नामदेव रेणुसे व सतिश मोरे यांनी मयताचे राहते घराचे ठिकाणी तसेच मयत व मयताची पत्नी यांचे मुळ गावी जावून गोपनीय रित्या माहिती घेतली असता मयताची पत्नी नामे राणी गोपीनाथ इंगुळकर वय ३२ वर्षे रा. दुगड शाळेजवळ सच्चाई माता मंदिर कात्रज पुणे हिचे बाहेर अनैतिक संबंध असले बाबत माहिती मिळाल्याने मयताचे पत्नीस चौकशी कामी पोलीस ठाणे येथे बोलावून तिचेकडे सखोल कौशल्यपुर्वक विचारपुस केली असता तिने प्रथम उडवाउडवीची व असमाधाकारक उत्तरे दिली असता संशय आल्याने आम्ही अधिक सखोल तपास करुन विश्वासात घेवुन विचारता तिने तिचा प्रियकर नामे नितिन शंकर ठाकर रा. कुरण ता. वेल्हा जि.पुणे याने आणि मी संगनमत करुन माझा पती गोपीनाथ बाळु इंगुळकर याचा आम्ही दोघांनी मिळून हात-पाय धरुन गळा दाबुन खुन केल्याची कबुली दिली.
यावरुन लागलीच नितिन शंकर ठाकर याचा शोध घेत असताना सपोफौ नामदेव रेणुसे व सतिश मोरे यांनी गोपनीय माहिती घेतली असता तो त्यांचे गावी पळून जाणार असल्याची माहिती मिळताच पोउपनिरी निलेश मोकाशी, सपाफौ नामदेव रेणुसे, पोलीस अंमलदार निलेश ढमढेरे व सतिश मोरे यांनी स्वारगेट या ठिकाणी सापळा रचुन शिताफिने आरोपीस ताब्यात घेतले. त्याचेकडेही सखोल कौशल्यपुंवक तपास करता तो ही प्रथम उडवा-उडवीची व असमाधाकारक उत्तरे देत होता. त्यास विश्वासात घेवुन तपास करता त्याने ही सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. सदर बाबत भारती विद्यापीठ पोलीस ठाणे गु.र.नं.७८७/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम १०३. ३ (५) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल असुन आरोपी १. राणी गोपीनाथ इंगुळकर वय ३२ वर्षे रा. दुगड शाळेजवळ सच्चाई माता मंदिर कात्रज पुणे. मुळ गांव सुरवड/वांगणी ता. वेल्हे जि. पुणे २. नितिन शंकर ठाकर वय ४५ वर्षे रा. कुरण ता. वेल्हा जि.पुणे यांना अटक करण्यात आली असून त्यांची न्यायालयाने दिनांक ३०.०९.२०२४ रोजी पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड देण्यात आली असुन
सदरच्या पोलीस कस्टडीमध्ये आरोपी राणी गोपीनाथ इंगुळकर व तिचा प्रियकर नितिन शंकर ठाकर यांचे प्रेमसंबध गेले १० वर्षापासुनअसुन पतीची अडसर येत असल्याने दोघांनी कट रचुन खुन केल्याची कबुली दिली आहे. पुढील तपास सपोनि भोजलिंग दोडमिसे हेकरीत आहेत. मयताचे पत्नी व प्रियकराने मयतास अकस्मात मयत दाखवण्याचा बनाव करुन पोलीसांची दिशाभुल करण्याचा प्रयत्न केला
होता परंतु पोलीसांनी सखोल तपास व आपले कौशल्य वापरुन सदर खुनाचा गुन्हा उघड केला आहे.
सदरची कामगिरीअपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे शहर प्रविणकुमार पाटील. पोलीस उप आयुक्त परिमंडळ २ श्रीमती स्मार्तना पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे श्रीमती नंदिनी वग्यानी वरीष्ठ पोलीस निरीक्षक, भारती विदयापीठ पोलीस ठाणे पुणे दशरथ पाटील, पो.नि.गुन्ह शरद झिने, यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि समीर कदम, पोउनि निलेश मोकाशी, स.पो. फौ. नामेदव रेणुसे, शैलेंद्र साठे पोलीस अंमलदार चेतन गोरे, हनुमंत मासाळ, महेश बारावकर, निलेश ढमढेरे, निलेश जमदाडे, मंगेश पवार, सतीश मोरे, नक्थाथ भोसले, आबासाहेब खाडे, अवधतु जमदाडे, सचिन सरपाले, निलेश खैरमोडे, धनाजी धोत्रे, सचीन गाडे, मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे यांच्या पथकाने केली आहे.

वस्तूंच्या पुनर्वापरासाठी सस्टेनेबिलिटी इनिशिएटिव्हज संस्थेचा स्तुत्य उपक्रम


पुणे: पर्यावरण क्षेत्रात काम करणारी सस्टेनेबिलिटी इनिशिएटिव्हज या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून ‘प्रीलव्हड इको हाट’ या आगळ्यावेगळ्या उपक्रमाची सुरवात पुण्यातील नामवंत व्हीके ग्रुपच्या कर्मचारांनी केली. ‘प्रीलव्हड इको हाट’ या उपक्रमाद्वारे आपल्याकडील वस्तू जी वापरात नाही पण ती इतर कोणी वापरण्यायोग्य असेल तर ती ह्या प्रदर्शनामध्ये ठेवली जाते. त्यामुळे वापरलेल्या उत्पादनांची, कपड्यांची अदलाबदल, विक्री आणि दान एकाच व्यासपीठावर होणे शक्य असते. बोर्ड गेम्स, पुस्तके, शूज, ज्वेलरी, शो पिसेस आणि कपड्यांपासून ते बॅग, पर्स आणि पेंटिंगपर्यंत, अनेक वस्तू या प्रदर्शनात आहेत. सेनापती बापट रोडवरील व्हीके ग्रुपच्या कार्यालयात दर महिन्याच्या चौथ्या सोमवार, मंगळवार आणि बुधवारी या वस्तू प्रदर्शित केल्या जातात. या उपक्रमास खूप चांगला प्रतिसाद मिळत असून तापर्यंत या प्रदर्शनाद्वारे २३० हुन अधिक वस्तुंची देवाणघेवाण झाली आहे. हा उपक्रम केवळ वापरलेल्या वस्तूंची अदलाबदल करणे, विक्री करणे किंवा देणगी देण्याबद्दल नव्हे तर एक अर्थपूर्ण मार्गाने टिकाऊपणा स्वीकारण्यासाठी एकत्र येण्याबद्दल आहे.

सस्टेनेबिलिटी इनिशिएटिव्हजच्या ट्रस्टी पूर्वा केसकर, अनघा परांजपे पुरोहित, ह्रिषीकेश कुलकर्णी, अपूर्वा कुलकर्णी, विजय साने, अमोल उंबरजे तसेच व्हीके ग्रुपच्या वैशाली आठवले व मेघना पिंगळे यांच्या समन्वयातून हा उपक्रम राबविला जातोय.

सस्टेनेबिलिटी इनिशिएटिव्हजच्या ट्रस्टी अपूर्वा कुलकर्णी म्हणाल्या की, पर्यावरणासाठी एक पाऊल पुढे जाऊन आम्ही ह्या उपक्रमाची सुरवात केली. पूर्वी भारतात वस्तूंची देवाणघेवाण खूप होत असे, आपण दुकानदाराकडे साड्या देऊन भांडी घ्यायचो, मोठ्यांचे कपडे छोट्या भावंडांना वापरायला दयायचो, धान्य देऊन किराणा माल घ्यायचो. त्यामुळे सर्व वस्तूंचा पुनर्वापर होत असे. सस्टेनेबिलिटी घराघरात राबवली जाई. याची एक समांतर अर्थव्यवस्था होती. ही संस्कृती टिकून रहावी यासाठी आम्ही आमच्या ऑफिस मध्ये ह्या उपक्रमाची सुरवात केली. आपल्याला आवश्यक नसलेल्या वस्तूंना नवीन जीवन देऊन, आपण एकत्रितपणे कचरा कमी करू शकतो आणि पर्यावरणावर सकारात्मक परिणाम करू शकतो.

कर्मचाऱ्यांमध्ये शाश्वत मानसिकता निर्माण करण्यासाठी प्रीलव्हड इको हाट सारखे उपक्रम महत्त्वाचे आहेत. आमच्यासाठी एकत्र येण्याची, एकमेकांना आधार देण्याची आणि आमच्या शाश्वतता उद्दिष्टांमध्ये योगदान देण्याची ही एक उत्तम संधी आहे. अश्या प्रकारचे उपक्रम अनेक कार्यालयामध्ये राबविले पाहिजे. हे उपक्रम जर आपल्या कोणत्या ऑफिस मध्ये सुरु करावयाचे असल्यास आम्ही सस्टेनेबिलिटी इनिशिएटिव्हजच्या माध्यमातून सहकार्य करू असे आयोजक सस्टेनेबिलिटी इनिशिएटिव्हजचे अमोल उंबरजे आणि व्हीके ग्रुपच्या वैशाली आठवले व मेघना पिंगळे यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील महिला उद्योजकांचे ‘एमएलए नवरात्र उत्सव प्रदर्शन’

महाराष्ट्रीयन लेडीज असोसिएशन तर्फे आयोजन ; निवृत्त पोलीस अधिकारी प्रतिभा जोशी यांच्या हस्ते उद्घाटन

पुणे :  महाराष्ट्रीयन लेडीज असोसिएशन तर्फे राज्यातील महिला उद्योजकांना व्यासपीठ मिळावे, यासाठी  ‘एमएलए नवरात्र उत्सव प्रदर्शना’ चे आयोजन करण्यात आले. विविध कलात्मक शोभेच्या वस्तू, रेडिमेड रांगोळी, कोरीव काम केले सुंदर दागिने, पेंटिंगचे विविध प्रकार, हाताने तयार केलेल्या बॅग, कपडे आणि विविध खाद्यपदार्थांचे प्रदर्शन पुण्यात आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाला विनामूल्य. प्रवेश असून महाराष्ट्रातील विविध भागातील महिलांनी सहभाग घेत कलागुणांचे देखील सादरीकरण केले.
जंगली महाराज रस्त्यावरील हॉटेल सेंट्रल पार्क येथे हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले. प्रदर्शनाचे उद्घाटन निवृत्त पोलीस अधिकारी प्रतिभा जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजिका अभिलाषा बेलुरे, योगिता सिंघ, अपूर्वा पाटकर, दिशा जोशी, नम्रता जाधव टीकारे आदी उपस्थित होते.
पुण्यासह संगमनेर, धाराशिव, धुळे, नगर, लोणावळा, संभाजी नगर,ठाणे, संगमनेर , श्रीरामपूर, नाशिक या ठिकाणाहून महिला उद्योजिका प्रदर्शनास सहभागी झाल्या असून विविध प्रकारचे ७५ स्टॉल्स  प्रदर्शनात आहेत. प्रदर्शनात मुलांसाठी आणि महिलांसाठी विविध स्पधेर्चे देखील आयोजन करण्यात आले होते. 
नऊवारी ठसका, लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा, दोन दिवसीय विनामूल्य गरबा कार्यशाळा देखील घेण्यात आली. प्रदर्शनात नवरात्र आणि दिवाळीसाठी लागणारे कपडे दागिने वेगवेगळ्या प्रकारचे सजावटीचे साहित्य लहान मुलांची खेळणी अशा अनेक गोष्टी पुणेकरांना खरेदी करता आले. 

म.गांधीची सर्वसमावेशक राष्ट्र निर्माणाची प्रक्रिया हाच खरा राष्ट्रवाद  – डाॅ. कुमार सप्तर्षी 

पुणे –  भारत हे अखंड राष्ट्र कधीच नव्हते. इथे 700 राज्ये होती. स्वातंत्र्य मिळाले तेव्हा महात्मा गांधीजींनी भारत हे अखंड राष्ट्र निर्माणाची प्रक्रिया सुरू केली. हे सर्व समावेशक राष्ट्र असावे ही त्यांची पक्की धारणा होती. इथे सर्वांनी रहावे, तुमच्या जाती धर्मानुसार जे करायचे ते उंबरठ्याच्या आत, बाहेर सर्वजण एकच आहेत, हा त्यांचा राष्ट्रवादाचा सिध्दांत होता. पण त्याची उजळणी आजच्या मतांच्या राजकारणात काँग्रेसने केली तरच सत्तेत येईल, असे परखड मत महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष ज्येष्ठ गांधीवादी डाॅ. कुमार सप्तर्षी यांनी आज म. गांधी विचार धारा प्रदर्शनाच्या उदघाटन प्रसंगी व्यक्त केले.

पुणे शहर जिल्हा  काँग्रेस कमाटीच्यावतीने महात्मा गांधी जयंतीनिमित्त आयोजित केलेल्य “म. मांधीच्या जीवनावर आधारित विचार धारा” या छायाचित्र प्रदर्शनाच्या उदघाटन डाॅ सप्तर्षी यांच्या हस्ते सारसबागे जवळच्या बाळासाहेब ठाकरे कलादालनात झाले.  माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे,माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर,आमदार रवींद्र धंगेकर,शहर काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे, संजय बालगुडे, महिला काॅग्रेसच्या अध्यक्षा पूजा आनंद, प्रदर्शनाचे मुख्य आयोजक अभय छाजेड व्यासपीठावर उपस्थित होते.
 कार्यक्रमाला  कमल व्यवहारे, अविनाश बागवे, अजित दरेकर, मुख्तार शेख आदी काँग्रेसचे आजीमाजी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. 
डाॅ. सप्तर्षी म्हणाले, गांधीच्या भोवती अनेक राज्यातील विविध विचारांचे, जातींचे नेते असायचे. ते मतभिन्नता असेल तर गांधीजींशी भांडायचे. हे भांडण कुठपर्यंत तर, गांधीजी निर्णय घेत नाहीत तोपर्यंत. त्यांनी एकदा का निर्णय घेतला की सर्वजण तो मान्य करायचे. त्यानंतर सगळेच त्या निर्णयानुसार कृती करायचे. आज त्या उलट चाललं आहे. जाती धर्माच्या नावाने वेगवेगळी डिपार्टमेन्ट केली आहेत. आपल्याला गांधीचा राष्ट्रवाद रूजवावा लागेल. तेव्हाच मतांच्या राजकारणात काँग्रेस पुन्हा सत्तेवर येईल.अरविंद शिंदे म्हणाले, गांधीजींनी प्रत्येक संदेश आपल्या कृतीतून दिला आहे हेच सध्या आपण लक्षात घेऊन त्यावर चिंतन करणे आवश्यक आहे. आपणच काँग्रेसजनांनी गांधीजींचे विचार समाजासमोर पुन्हा मांडले पाहिजेत.अभय छाजेड म्हणाले, जगात आज अनेक युद्ध सुरू आहेत. त्यात भरच पडत असताना गांधीजींचा अहिंसेचा संदेश जगासाठी महत्वाचा  ठरतो. त्यामुळेच गांधीजींचे विचार नव्या पिढीसमोर मांडण्याचा, त्यांना गांधी समजावून सांगण्याचा प्रयत्न म्हणजे हे प्रदर्शन आहे.
संजय बालगुडे यांनीही मनोगत व्यक्त केले. आभार प्रदर्शन पूजा आनंद यांनी केले.
या प्रदर्शनात महात्मा गांधीजींच्या जीवनातील विविध प्रसंगांची सुमारे 100 पेक्षा जास्त छायाचित्रे मांडण्यात आली आहेत. सारसबागे जवळच्या बाळासाहेब ठाकरे कलादालनात हे प्रदर्शन 2 ऑक्टोबर पर्यंत दिवसभर विनामूल्य  सर्वांसाठी खुले रहाणार आहे.